शाहरुखने केलेली उमराह प्रथा आणि हज यात्रेत नेमका फरक काय?
काल माझा मित्र सलमान भेटला. काहीतरी पैश्यांची जुळवाजुळव करत होता. मी विचारलं कसले रे पैसे? तर म्हणाला, “मला एकदा तरी हजला जायचंचय. त्यासाठी पैसे जमवतोय” म्हणून मग हज नेमकं काय आहे आणि तिथे जाऊन काय करतात त्याची माहिती मिळवूया म्हणून आज गूगल उघडलं. तर, तिथं बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे फोटो दिसले.
या फोटोत शाहरुख पांढऱ्या रंगाचा कपडा गुंडाळून धार्मिक स्थळी होता. मला वाटलं शाहरूख हजला गेला असेल पण, या फोटोजचं कॅप्शन वाचल्यावर समजल की, शाहरुख हा मुस्लिम धर्मामध्ये उमराह म्हणला जाणारा एक धार्मिक विधी करतोय.
आता हा उमराह आणि हज एकच आहे की, वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे बघूया म्हणून थोडा पाहिलं तर, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याचा समजलं.
हज ही एक यात्रा आहे. या यात्रेला मुस्लिम धर्मामध्ये प्रचंड महत्व दिलंय. ही यात्रासुद्धा सौदी अरोबियामध्येच केली जाते. ही यात्रा पुर्ण करायला ५ ते ६ दिवस लागतात.
उमराह म्हणजे काय? तर, उमराह हा विधी सौदी अरेबियात केला जातो. उमराह विधी केल्यामुळं पापांपासून मुक्ती मिळते असं मुस्लिम समाजात म्हणतात. सौदीच्या बाहेरील मुस्लिमांनाही हा विधी करता येतो. हा विधी करायला जगभरातून मुस्लिम नागरिक सौदी ला येतात. बाहेरच्या मुस्लिमांसाठी एक महिन्याचा खास व्हिजा अरेंज केला जातो.
हज यात्रा आणि उमराह हे दोन्ही विधी अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी केले जातात. मात्र, या दोन्ही विधींमध्ये काही मुख्य फरक आहेत. बघुया ते फरक काय आहेत…
१) हज यात्रा ही मुस्लिम धर्मातील ५ स्तभांपैकी एक मानली जाते. तर, उमराह या पाच स्तंभांपैकी एक नाही.
२) प्रत्येक मुस्लिमाने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जावं असं म्हटलं जातं. उमराह बाबत असं काही नाही. हा विधी पुर्णपणे ऐच्छिक आहे.
३) हज ही हे बऱ्यापैकी खर्चिक आणि वेळ घेणारी यात्रा तर, उमराह कमी खर्चिक तर आहे, आणि वेळपण कमी घेते. हज यात्रेसाठी ५ ते ६ दिवस लागतात तर उमराह एका दिवसात करता येतो.
४) हज यात्रा ही मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रा मानली जाते. उमराह ही याच हज यात्रेचं छोटं स्वरूप मानतात.
५) हज यात्रा करायची असेल तर ती, इस्लामी कॅलेंडरच्या शेवटच्या ‘धुल हिज्जा’ या महिन्यातच करावी लागते. उमराह विधीसाठी असा काहीच नियम नाही. उमराह वर्षभरात कधीही करता येतो.
शाहरुखने घातलेल्या पांढऱ्या कपड्यामागचं कारण काय?
उमराह ही प्रथा करण्यापुर्वी शरीरावरील सर्व दागिने, मेकअप, फॅन्सी कपडे काढावे लागतात. अगदी पर्फ्यूम पण लावायचा नसतो. पुरूषांनी पांढऱ्या शुभ्र रंगाचे दोन कापड शरीरावर घेणं अपेक्षित असतं. हे पांढरे कापड निखळतेचं प्रतिक मानले जातात. एक कपडा कंबरेच्या वरच्या भागावर गुंडाळतात तर, दुसरा कंबरेच्या खालच्या भागात.
स्त्रियांनी उमराह प्रथा करताना साधे, सैल कपडे घालावे. अनेक स्त्रिया काळ्या रंगाचे सैल ड्रेस घालतात. या ड्रेसच्या बाह्या या पूर्ण असतात आणि संपुर्ण शरीर झाकलं जातं याशिवाय स्त्रिया हिजाबही घालतात. उमराह करताना स्त्रियांचा चेहरा झाकलेला नसावा असं मिडल ईस्ट आय या वेबसाईटनं म्हटलंय
उमराह विधी कसा केला जातो?
उमराह विधी करताना तवाफ़ आणि सई हे या दोन महत्वाच्या पायऱ्या आहेत.
- तवाफ़: मक्कामध्ये मस्जिद अल-हरम इथल्या काब्याभोवती ७ वेळा प्रदक्षिणा घातली जाते.
- सई: या प्रथेनुसार सफा आणि मारवाच्या दोन टेकड्यांच्यामध्ये धावायचं असतं. प्रेषित इब्राहिम यांची पत्नी हजर यांनी पाण्यासाठी केलेल्या वणवणीची आठवण म्हणून ही प्रथा केली जाते. सफापासून मारवापर्यंत आणि पुन्हा सफापर्यंत अश्या ७ फेऱ्या मारायच्या असतात.
उमराह आणि हज यात्रा हे दोन्ही विधी मुस्लिम समाज आपल्यावर अल्लाहची कृपा राहावी यासाठी करतो. उमराह हजच्या मानाने सोपा, कमी खर्चीक आणि सोपा विधी आहे. मुस्लिम समाजात हज यात्रा धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च आहे उमराह त्यामानाने कमी पवित्र किंवा हज यात्रेचंच लहान आणि सोपं स्वरूप मानलं जातं.
हे ही वाच भिडू:
- शाहरुखचं सोडा, या घड्याळ्यांच्या किंमती बघून डोळे फिरतील…
- सगळं जुळून आलं असतं, तर DDLJ मध्ये शाहरुख खानच्या जागी टॉम क्रूझ दिसला असता…