पुण्यात विमानतळ नसल्याचा फटका एकदा किर्लोस्करांनाही बसला होता

आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार, मात्र कुठं होणार ही जागा अद्याप निश्चित नाही. असे उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच म्हणलं आहे….

पण पुण्यासारख्या प्रतिष्ठित शहराला स्वतःचं एक विमानतळ असू नये का ?

खरं तर, पुण्यात आंतराष्ट्रीय विमानतळाची घोषणा साधारण २००० साली करण्यात आली होती. हे विमानतळ चाकण भागात होईल असे सांगण्यात आले होते. मात्र भूसंपादनसाठी अडचण येत असल्याने हा विमानतळाची जागा बदलण्यात आली. पुरंदर भागात जागा निश्चित करण्यात आली. यासाठी केंद्र सरकार आणि संरक्षण दलाच्या परवानगी मिळण्यासाठी ५ वर्ष लागले. त्यानंतर   ऐकून १७ केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांच्या परवानग्या घेण्यात आल्या. २०१९ पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी  ७० टक्के भूसंपादन झाले. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. त्याचबरोबर विद्यमान आमदार विजय शिवतारे यांचा पराभव झाला. त्यानंतर भूसंपादन रखडले आणि अजूनही त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही.

पुणे शहराचं स्वतःचं असं विमानतळ नाहीये , सद्या तरी पुण्यात जे विमानतळ आहे लष्कराच्या अखत्यारीत येतं त्यामुळे ते लष्कराच्या नियमानुसार आणि वेळेनुसार चालते….हे सगळं सांगण्याचा खटाटोप म्हणजे मेट्रो सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात विमानतळ नसल्यामुळे अनेकांची गैरसोय होते. त्यात मोठ-मोठे उद्योगपती तर होतेच. 

त्यातलं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे कै.शंतनूराव किर्लोस्कर ! 

शंतनुराव हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक विकासामधील त्यांचे योगदान अपूर्व असे होते….पण त्यांच्या कारकिर्दीत पुण्यात विमानतळ नसल्याची हि एक अडचण निर्माण झाली होती…तेच सांगणारा एक किस्सा महत्वाचा आहे..

किर्लोस्कर नावाला सहाव्या दशकात देशात व अन्यत्र जी प्रतिष्ठा प्राप्त झाली त्यामागे शंतनुरावांच्या वागण्याच्या छोट्याछोट्या पद्धती होत्या. पण तितकेच स्वाभिमानाने सौदा करणारे उद्योगपती म्हणून देखील ओळखले जायचे त्याचाही एक प्रसंग सांगते…

हा प्रसंग जर्मनीतला. त्यांना एक विशिष्ट यंत्र पसंत पडले आणि किर्लोस्करांशी चर्चा व्हायची असे ठरले. ते स्वतः व त्यांचे दोन सहकारी उपस्थित होते. पण संबंधित कंपनीचे मात्र अध्यक्ष किंवा डायरेक्टर कोणीच हजर नव्हते. बरोबरचे सहकारी नाराज झाले, परंतु शंतनुरावांनी सौदा पुरा करण्याच्या दृष्टीने प्राथमिक बोलणी केली आणि नंतर अखेरची बोलणी व्हायची ठरली. शंतनुराव नंतर लंडनला गेले आणि तेथून त्यांनी त्या कारखानदाराला तार केली की अंतिम बोलण्पांसाठी येथे या, येथे करार होईल. त्या कारखानदाराला लंडनला धावत जावेच लागले, कारण हा भारतीय स्वाभिमानाने सौदा करणारा होता!

परदेशी जाणारा भारतीय हा भारताचे प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

परदेशातील कारखानदारांनी व विक्रेत्यांनी आपले कारखाने व कार्यपद्धती समक्ष पाहिली तर त्यांच्याशी अधिक चांगले संबंध प्रस्थापित होऊन परिणामी आपल्या मालास उत्तम मागणी येते हा पूर्वीचा अनुभव होता. ब्रिटनमध्ये उत्पादनाचा खर्च अतोनात वाढल्यामुळे आपली इंजिने तेथे लोकप्रिय होण्याची खूप शक्यता आहे हे ओळवून शंतनुरावांनी तिथल्या ओरिजिनल इक्विपमेन्ट मॅन्युफॅक्चरर्सना भारतास भेट देण्यास बोलविण्याचा घाट घातला. 

किर्लोस्करांची काही इंजिने आधीच इंग्लंडमध्ये जाऊन तेथे त्यांनी मान्यता मिळविली होती. त्याप्रमाणे ब्रिटनमधील तेवीस उत्पादक फेब्रुवारी १९७४ मध्ये हिंदुस्थानात सपत्नीक येऊन दाखल झाले. बंगलोर, हरिहर, किर्लोस्करवाडी आणि पुणे येथील कारखाने त्यांना दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्याबरोबर तांत्रिक विषयाच्या दोन नियतकालिकांचे प्रतिनिधीही भेटीसाठी आले होते. 

त्या सर्वांपैकी बऱ्याच लोकांची ही भारतास पहिलीच भेट होती आणि त्यांना ती जास्तीत जास्त सुखकारक कशी होईल हे किर्लोस्करांनी पाहिले. पुरुष मंडळी कारखान्याची पहाणी करण्यात गुंतलेली असताना बायकांसाठी म्हैसूर व वृन्दावन गार्डनची खास सहल विमानाने आयोजित केली होती. या दौऱ्यातील अनुभव अविस्मरणीय होते असे त्यांच्यापैकी पुष्कळांनी नमूद करून ठेवले आहे. तुमच्या उद्योगधंद्यांबद्दल आमच्या मनात दृढ विश्वास निर्माण करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी झाला आहे, असेही त्यांनी प्रांजळपणे सांगितले.

या भेटीचा ताबडतोबीचा परिणाम म्हणून जागेवरच पंचवीसशे इंजिनांची ऑर्डर नोंदविली गेली आणि नंतरही इंग्लंडमधून सतत मागणी येत राहिली…

इंग्लंडमधील इंजिनांची गरज तातडीची होती. बोटीने इंजिने पाठवावयाची तर त्यात खूप वेळ जाणार होता आणि त्यासाठी लागणारा सर्व तऱ्हेचा खर्च ध्यानात घेता विमानाने इंजिने नेणे आम्हाला परवडेल, असे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्सच्या लोकांनी म्हटले. शंतनुरावांनीही अशी जिद्द धरली की माझी इंजिने जिथे तयार होतात तिथूनच ती निर्यात व्हायला हवीत. 

परंतु पुण्याचा विमानतळ आंतरराष्ट्रीय नसल्याने तेथे जरूर तीं कस्टमची व्यवस्था नव्हती. 

खरेदी करणारे जर विमान पाठवून माल घेऊन जायला तयार आहेत तर त्यांना येथेच माल देण्याची व्यवस्था व्हायला हवी असा शंतनुरावांनी आग्रह धरला आणि ती सर्च खटपट करण्यामध्ये त्यांचा पुतण्या बप्पा किर्लोस्कर यांचे खूपच साहाय्य झाले. ते तेव्हा एअर अॅटॅची म्हणून नुकतेच निवृत्त होऊन भारतात परत आले होते. त्यांनी दिल्लीला हेलपाटे मारून साऱ्या परवानग्या आणल्या आणि मालवाहतुकीच्या विमानांना जरी पुण्याचा विमानतळ लहान होता तरी खास व्यवस्था करून दोनशे इंजिनांची रवानगी पहिल्या खेपेला सरळ पुण्याहून न्यू कॅसलला होऊ शकली. 

विमानात इंजिने भरली जात असताना शंतनुराव सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्वतः उन्हात उभे होते. डिझेल इंजिनावरील त्यांच्या अपत्यवत् प्रेमामुळेच त्यांना या वयातही हा दुर्दम्य उत्साह लाभला असला पाहिजे. नंतर अशा तेरा खेपा झाल्या होत्या….

पण हे सगळे कष्ट वाचले असते, हि प्रक्रिया जलद गतीने झाली असती जर का पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ असले असते तर….आता बघूया पुण्यातील हे बहूप्रतिक्षीत विमानतळ कशी पूर्णत्वास येते ते ….

संदर्भ : कालापुढती चार पाऊले, सविता भावे 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.