कोल्हापूरच्या राजकारणाचा नाद कुठं करताय? अमेरिकेत पण नगरसेविका निवडून आलीय

आपलं कोल्हपूर जगात भारी म्हणत्यात ते उगाच नाही. जगात कुठल्या पण कोपऱ्यात जावा कोल्हापूरकरांचा झेंडा असणारच ओ. 

आता तर कोल्हापूरच्या एका कन्येनं अमेरिकेतल्या होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मान मिळवलाय. हाय कि नई भारी. 

तर ही कोल्हापूरची कन्या आहे मूळची जयसिंगपुरातली. त्यांचं माहेरचं नाव आहे उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर. आणि सासरचं नाव उमा अशोक पुरंदरे. जयसिंगपुरातल्या चौथ्या गल्लीत विजया आणि जनार्दन दामोदर अर्जुनवाडकर यांच्या पोटी या कन्येन जन्म घेतला. त्यांचं बालपण जयसिंगपुरातच गेलं. शिक्षण जयसिंगपूरमध्ये ‘बी’ वॉर्ड शाळा, जयसिंगपूर हायस्कूल आणि जयसिंगपूर कॉलेजमध्ये झालं. त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून पदवीउत्तर शिक्षण पूर्ण केल.

पुढं लग्न झाल्यावर त्या अमेरिकेतील न्युजर्सी राज्यांतील होपवेल इथं स्थायिक झाल्या. तिथं राहत असतानाच त्यांनी सुप्रसिद्ध औषध निर्मिती कंपनीत २५ वर्षं शास्त्रज्ञ म्हणून काम केलं. त्यांच संशोधन कार्य आजपर्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय  वैज्ञानिक मासिके आणि परिषदांमध्ये प्रसिध्द  झाल आहे. त्यांच्या या संशोधनाला आंतरराष्टीय विज्ञान जगतात मान्यता मिळाली आहे.

आपली नोकरी सांभाळून त्यांनी न्यूजर्सी इथ महाराष्ट्रीयन व भारतीय संस्कृती, परंपरा व मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी मराठी शाळा व संस्कार वर्गांची सुरुवात केली. त्यांच्या या होपवेल भागात त्यांनी गणपती उत्सव सुरु केला. आज २५ वर्षं झाली तरी गणपती मोठ्या धुमधडाक्यातच साजरा केला जातो. सण आणि उत्सवांपुरतं मर्यादित न राहता उर्मिला या गर्ल स्काउट्स-लीडर, पालक शिक्षक संघटना पदाधिकारी, होपवेल व्हॅली फूड पॅंट्री आणि ए टू झेड मार्गदर्शन उपक्रम या स्थानिक संस्थाच्या कार्यांत सहभाग घ्यायच्या. समाजकार्य म्हंटल की त्यांच्या भागात उर्मिलांचं नाव सगळ्याच लोकांच्या तोंडी असायचं. 

त्यांचा अश्या बऱ्याच सामाजिक कार्यांत पुढाकार आणि सक्रीय सहभाग होता. पुढं त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांची झोनिंग आणि ऍडजस्टमेंट बोर्डवर सहकारी सहायक सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. सहा वर्षांपासून टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे काम त्या पाहत आहेत. त्यामुळे त्यांना टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे विस्तृत ज्ञान व सखोल जाण निर्माण झाली. त्यातूनच त्यांना या निवडणुकीत उभं राहायचं ठरवलं. आणि तशी त्यांना संधी ही मिळाली. 

होपवेल टाऊनच्या या नगरपरिषदीय निवडणूकीत त्यांचे विरोधी उमेदवार होते एडवर्ड एम. जॅकोवस्की. तिथली निवडणूक त्या भारतीय असल्यानं खूपच चर्चेचा विषय होती. सरतेशेवटी अटीतटीची निवडणूक झाली आणि होपवेल टाउनशिपमध्ये उमा अशोक पुरंदरे निवडून आल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी  एडवर्ड एम. जॅकोवस्की यांना तब्बल एक हजार मतांनी पराभूत केलं. त्यांना या निवडणूकीत ३७०१ मते मिळाली. होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानही उर्मिला यांनी पटकावला आहे. 

त्यांनी या निवडणूकीत दैदिप्यमान यश मिळवून जयसिंगपुरचा आणि भारताचा झेंडा फडकवला. त्यांच्या कामगिरीचे अमेरिकेत विविध स्तरावर कौतुक होत आहे. त्यांचा शपथ विधी कार्यक्रम जानेवारीमध्ये होणार आहे. 

या त्यांच्या यशामध्ये त्यांचे पती अशोक पुरंदरे, मुलगा रोहित व मुलगी राधिका यांचा मोठा वाटा असल्याचं त्या यावेळी सांगायला विसरल्या नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.