शनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता

अलिकडेच प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीच्या बाजूचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. आता पुण्यातील शनिवार वाड्याच्या मस्तानी दरवाजासमोर असलेल्या दर्ग्यावरून वाद सुरु झाला आहे.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी हा दर्गा हटवण्याची मागणी केली आहे. 

ते म्हणाले की, “शनिवारवाडा बांधण्यात आला तेव्हा इथे कोणत्याही प्रकारचा दर्गा किंवा पीर नव्हता. मात्र इंग्रजांनी देश सोडताना अनेक गोष्टींची मोडतोड केली आणि त्याचाच एक भाग म्हणून हा दर्गा बांधला होता. या दर्ग्याची पुरातत्व खात्याकडे कोणतीही नोंद नाही. त्यामुळे हा अनधिकृत दर्गा हटवण्यात यावा.”

आता आनंद दवे यांनी म्हटल्याप्रमाणे इंग्रजांनी वास्तूची मोडतोड करून हा दर्गा बांधला की नाही, याचे पुरावे सध्या तरी प्रकाशात आलेले नाहीत.

पण एका इंग्रज अधिकाऱ्याने थेट अख्खा शनिवार वाडाच पाडून टाकण्याचा प्लॅन बनवला होता.

आजही या वाड्याशी अनेकांच्या भावना जुळलेल्या आहेत. पुण्यातील लोकांच्या अस्मितेचं प्रतीक असणारा हा वाडा एकेकाळी सत्तेचं महत्त्वाचं केंद्र होतं.

पंतप्रधान पेशवे बाजीराव यांनी स्वतःचं निवासस्थान म्हणून हा वाडा बांधून घेतला होता. १७२३ मध्ये हा वाडा बांधून झाला आणि शनिवारच्या दिवशी या वाड्याची वास्तुशांती झाली होती. त्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असं नाव देण्यात आलं, असं सांगण्यात येतं.

पण १८१७ मध्ये पेशवाईच्या अंतानंतर हा वाडा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि वाड्यावर भगव्या ध्वजाऐवजी युनियन जॅक फडकायला लागला. तेव्हा पुणे जिल्ह्याचे पहिले कलेक्टर हेन्री रॉबर्टसन यांनी या वाड्यात जिल्हाधिकारी कार्यालय सुरु केलं. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांचं निवासस्थान म्हणून सुद्धा या वाड्याचा उपयोग केला जात होता.

पण या वाड्याची भव्यता, वैभव आणि सुंदरतेसोबत वाड्याला लागलेल्या आगींचा इतिहास सुद्धा मोठा आहे.

१७२३ ते १८२८ या १०५ वर्षांच्या काळात शनिवार वाड्याला एकूण ४ वेळा आग लागली होती. यात पहिली आग १७९४ मध्ये लागली होती. तर १८०८ मध्ये दुसऱ्यांदा आग लागली. त्यानंतर १८१२ आणि १८२८ मध्ये आगी लागण्याच्या घटना घडल्या. पहिल्या ३ वेळा लागलेल्या आगींमधून हा वाडा वाचला होता. मात्र चौथ्या वेळेस लागलेल्या आगीमुळे या वाड्याची भव्यता इतिहासजमा झाली. 

१८२८ मध्ये या ५ मजली वाड्याला चौथ्यांदा आग लागली आणि आठवडाभर आगीच्या लपटा उठत राहिल्या. या वाड्याच्या वैभवाची इतकी ख्याती होती की, आग शांत झाल्यानंतर सोनं शोधण्यासाठी झारकऱ्यांनी वाड्याची राख खरेदी केली होती. 

वाडा जळून खाक झाल्यानंतर उरलेल्या दगडी चौथऱ्यावर ब्रिटिशांनी एक तुरुंग आणि वेड्यांचं रुग्णालय बांधलं होतं. त्यामुळे ब्रिटिशांच्या नजरेत या वाड्याचा फारसा उपयोग राहिलेला नव्हता. त्यातूनच वाडा पाडण्याची संकल्पना जन्माला आली. 

ब्रिटिशांच्या आगमनानंतर पुण्यात सैनिक छावणी बांधण्यात आली. यामुळे पुण्यात वर्दळ सुद्धा वाढायला लागली होती.

या वर्दळीपुढे शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजूंनी जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीसाठी ते अपुरे पडत होते. तर समोरच्या चौकात बाजार भरत होता. एकूणच हा वाडा अडचणीचा ठरत होता. त्याच दरम्यान पुण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यातील हॉस्पिटलचे उपमहानिरीक्षक डॉ. ए. एच. लिथ यांना पुण्यातील अस्वच्छतेच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याचे आदेश दिले.

डॉ. लीथ यांनी शहराची पूर्ण पाहणी केली. लवकरच सादर करण्यात आलेल्या त्या अहवालात जुन्या वस्तीमधील अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, रस्त्यांवरील गर्दी, सांडपाण्याच्या नाल्यांची दुरावस्था, अरुंद गल्ल्या, एकमेकांना चिकटून असलेल्या इमारतींमुळे कोंडलेली हवा, स्वच्छ पाण्याचा अपुरा पुरवठा, शहरातील लोकांचं अस्वच्छ राहणीमान याचा पूर्ण अभ्यास करण्यात आला होता.

या अहवालामध्ये डॉ. लिथ यांनी पुणे शहरात सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बदल सुचवले होते. 

त्यात सांडपाण्याची व्यवस्था, शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि रस्ते रुंदीकरण यावर त्यांचा विशेष भर होता. त्यांनी शहरातील गर्दीचं नियोजन करण्यासाठी आणि पुरेशा स्वच्छ हवेचा पुरवठा करण्यासाठी दोन मार्गांचं रुंदीकरण करण्याची शिफारस केली होती. यात ओंकारेश्वर मंदिर ते शनिवार पेठेपर्यंतचा पहिला रस्ता आणि बुरुड आळी ते खासगीवाले वाड्यापर्यंतचा दुसरा रस्ता रुंद करण्यात यावा असं सांगितलं होतं.

तर शनिवार वाड्याच्या भिंती पाडून त्याजागी झाडं लावण्यात यावीत, यामुळे पुण्याच्या मध्यभागात पुरेश्या प्रमाणात हवेचा पुरवठा होऊन शहरातील हवा खेळती राहील असा त्यांचा प्लॅन होता. त्यांनी बनवलेला हा प्लॅन नागरिकांच्या आरोग्याला डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आला होता पण यामुळे ऐतिहासिक शनिवारवाडा जमीनदोस्त होणार होता.

लवकरच जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर ब्रार्टर फ्रेरे यांच्याकडे पाठवला. त्यांनी लागलीच हा प्रस्ताव मान्य केला आणि यासाठी निधी सुद्धा मंजूर केला. 

पण प्रशासनाने या अहवालातील अनेक गोष्टींवर अंमलबजावणी केली नाही. सांडपाण्याचा निचरा आणि पाणीपुरवठ्यावर काम करण्यात आलं पण शनिवारवाडा पाडण्यात आला नाही. त्यामुळे भिंती, बुरुजं, दरवाजे आणि चौथऱ्याच्या स्वरूपात ३०० वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा वाडा जमीनदोस्त होण्यापासून वाचला. 

मराठ्यांच्या इतिहासात या वाड्याचं महत्व अनन्यसाधारण मानलं जातं. पेशव्यांच्या हातात सत्तेची सूत्र येण्यापासून पेशवाईच्या अंतापर्यंत सर्व इतिहास या वाड्याने पहिला आहे. ब्रिटिशांच्या काळापासून स्वतंत्र भारतात पुणे शहर कसं बदलत गेलं याचा साक्षीदार म्हणून हा वाडा आजही उभा आहे.

१९१९ मध्ये भारतीय पुरातत्व खात्याने या वाड्याला संरक्षित स्मारक घोषित केलं. त्यानंतर पुरातत्व खातं आणि प्रशासनाच्या माध्यमातून या वाड्याचं सौंदर्यीकरण करण्यात आलं. यासाठी अनेक संस्थांनी सुद्धा मदत केली. यामुळेच शनिवारवाडा अजूनही शाबूत आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.