ज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष लागली…

गेल्या १२ वर्षांपासून नाग नदीचं प्रदूषण थांबवण्याची मागणी केली जात आहे. २०१० मध्ये नागपूर खंडपीठाने नाग नदीचं प्रदूषण थांबवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून नाग नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्वतंत्र सिवेज लाईन टाकणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रोजेक्ट अडकून पडला होता.

परंतु आता या १,९२७ कोटी रुपयांच्या प्रोजेक्टला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय.  

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. यात केंद्र सरकार ६० टक्के, राज्य सरकार २५ टक्के आणि नागपूर महापालिका १५ टक्के निधी खर्च करणार आहे. या प्रकल्पामुळे नाग नदी स्वच्छ होईल आणि गोसेखुर्द धरणात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

हा प्रकल्प नागपूरच्या इतिहासात महत्वाचा असेल. पण ज्या नाग नदीच्या किनाऱ्यावर हे शहर वसलं आहे त्या नाग नदीला गोंड राजे, नागपूरकर भोसले आणि ब्रिटिशांच्या काळात फार महत्व होतं. 

याची सुरुवात होते १७०२ सालापासून जेव्हा देवगडच्या बख्त बुलंद शहांनी नागपूरची स्थापन केली होती.

गढ-मांडला आणि देवगढवर राज्य करणाऱ्या बख्त बुलंद शहा यांनी स्वतःची राजधानी देवगढवरून दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा नवीन जागेचा शोध घेताना त्यांना कान्हन नदीच्या जवळ असलेल्या नाग नदीच्या किनाऱ्यावरची जागा आवडली आणि त्यांनी नव्या राजधानीची स्थापना करायला सुरुवात केली.

नाग नदीच्या किनाऱ्यावर वसवण्यात आलं त्यामुळे या शहराला नागपूर असं नाव देण्यात आलं. 

शहर वसवल्यानंतर बाकी गोंड राजांप्रमाणे वेगवेगळे तलाव बांधायला सुरुवात झाली. त्यातच नागपूरच्या इतिहासातील सगळ्यात महत्वाच्या तलावांपैकी एक असलेल्या अंबाझरी तलावाची निर्मिती सुरु झाली. नागपूरजवळ नाग नदीवर पाळ घालून तलाव बांधण्यात आला.

१७३९ मध्ये रघुजी भोसले यांनी विदर्भ भाग जिंकून घेतला आणि नागपूरला भोसले घराण्याचं राज्य स्थापन झालं.

भोसल्यांच्या काळात नागपूर शहराची प्रचंड भरभराट झाली. नागपूरचे राजे पहिले रघुजी भोसले यांचा मुलगा बिंबाजी भोसले यांनी १७३९-५८ च्या काळात नाग नदीवरील या तलावाला भव्य रूप दिलं. तलावाची पाळ उंच करून जास्तीत जास्त पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली. या तलावाचं बांधकाम बिंबाजी यांनी केलं म्हणून तलावाला ‘बिंबाझरी तलाव’ असं नाव देण्यात आलं. नंतर याचंच अपभ्रंश होऊन अंबाझरी शब्द रूढ झाला.

नागपूरला राजाचे सर्व महाल आणि तटबंदी नाग नदीच्या किनाऱ्यावरच वसवण्यात आली होती. नागपूरला पिण्याचं आणि दैनंदिन व्यवहाराचं पाणी देणाऱ्या या नदीच्या काठावर भोसल्यांनी अनेक मंदिरांची आणि घाटांची निर्मिती केली. यात राजघाट आणि काशीबाई घाट हे प्रसिद्ध घाट आहेत.

नाग नदी आणि सीताबर्डी नाल्याच्या संगमाला विशेष महत्व होतं.  

पहिले रघुजी भोसले यांच्यापासून भोसले घराण्यातील सर्व राजपरिवार या संगमावर पूजा करायचा. राजघराण्याचे बरेच धार्मिक संस्कार याच संगमावर व्हायचे. त्यामुळे दुसरे रघुजी भोसले यांची पत्नी चिमणाबाई यांनी संगमावर महादेवाचं एक मंदिर बांधलं.

विजयादशमी हा नागपूरकर भोसल्यांचा सर्वात मोठा सण होता. दसऱ्याच्या दिवशी राजघराण्याचे हत्ती आणि घोडे धुण्यासाठी याच संगमावर आणले जायचे. त्यानंतर संध्याकाळी विजयादशमीच्या हत्तीच्या अंबारीवरून भव्य मिरवणूक निघायची. ही मिरवणूक शहरातून संगमावर पोहोचायची, इथेच नागपूरकर भोसले शस्त्र आणि शमीच्या वृक्षाची पूजा करत होते.

दुसरे रघुजी भोसले यांच्या काळात या नदीला विशेष महत्व प्राप्त झालं.

दुसरे रघुजी दसऱ्याच्या दिवशी नाग नदीचं शिलंगण करून राजाबक्ष येथील मारुतीच्या दर्शनाला जायचे. त्यांनी या संगमावर तुळशीबाग वसवली आणि त्या बागेत १७७२ मध्ये वेणुगोपाल मंदिर बांधलं. हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या शिल्पकलेचं अप्रतिम उदाहरण म्हणून ओळखलं जातं. त्यांच्यासोबतच राजपरिवाराने आणखी मंदिरांची निर्मिती केली. तर तिसरे रघुजी भोसले यांनी १८३७ मध्ये या संगमावर एक पूल बांधला ज्याला आजही संगम पूल म्हणून ओळखलं जातं. 

मंदिरांसोबतच नागपूरकर भोसल्यांचा राजघाट सुद्धा नाग नदीच्या किनाऱ्यावरच आहे. 

नाग नदीच्या डाव्या किनाऱ्यावर शुक्रवार पेठेला लागून भोसल्यांचा राजघाट बनवण्यात आला होता. हे राजघाट नागपूर आणि संपूर्ण देशभरात अनोखं राजघाट आहे. इथे भोसले घराण्यातील राजपरिवाराचे अंत्यसंस्कार केले जायचे आणि तिथे राजपरिवारातील सदस्यांची समाधी बांधली जायची.

इथे पहिले रघुजी भोसले, दुसरे रघुजी भोसले, दुसऱ्या रघुजींची पत्नी महाराणी बांकाबाई, राजकुमार परसोजी आणि त्यांच्यासोबत सती गेलेल्या काशीबाई भोसले यांची देखणी मंदिरं आहेत. यासोबतच रघुजी भोसले तिसरे यांची आणि भोसले राजपरिवारातील इतर सदस्यांची मंदिरं सुद्धा इथे पाहायला मिळतात. ही मंदिरं भोसल्यांच्या उत्कृष्ट आणि नक्षीदार शिल्पकलेची उदाहरणं आहेत.

नागपूरची शान असलेल्या संत्र्याचं पहिलं रोप सुद्धा नाग नदीच्या किनाऱ्यावर लावण्यात आलं होतं.

नागपूरचे राजे दुसरे रघुजी भोसले जेव्हा पंजाबच्या स्वारीवर गेले होते तेव्हा तिथे त्यांनी संत्रे खाल्ले. त्यांना संत्रे इतके आवडले की, त्यांनी सियालकोटमधून संत्र्याची बीज नागपूरला आणली. नाग नदीच्या किनाऱ्यावर बनवलेल्या तुळशीबागेत त्या रोपांची लागवड केली. याच बागेतून नागपूरचं संत्र सगळीकडे प्रसिद्ध झालं. 

या मुघल पद्धतीच्या तुळशीबागेत त्यांनी एक राजवाडा, थिएटर आणि काही महत्वाच्या इमारती बांधल्या होत्या. दरबारातून परतल्यानंतर दुपारच्या वेळी ते याच बागेत विश्रांती घ्यायचे. दिवाळीच्या दिवशी नाग नदीच्या किनाऱ्यावर दिव्यांची रोषणाई केली जायची. ही रोषणाई बघण्यासाठी संपूर्ण नागपूरकर नदीच्या किनाऱ्यावर गोळा व्हायचे. 

१८६९ सालच्या दुष्काळात नागपूर शहरात पाण्याचा तुटवडा पडला. 

यासाठी अंबाझरी तलावाची पाळ १७ फुटांनी उंच करण्यात आली. आधुनिक पद्धतीने तलावाची बांधणी करण्यात आली आणि पाईपलाईन टाकून शहराला पाणीपुरवठा केला जाऊ लागला. १९५६ पर्यंत ही नदी अतिशय स्वच्छ आणि नितळ पाण्याने वाहत होती. या नदीच्या किनाऱ्यावर अनेक प्रकारचे धार्मिक सण  साजरे केले जायचे. मात्र जसजसं औद्योगिकरण व्हायला लागलं तसतशी नाग नदी नागनाल्यात बदलत गेली.  

नागपूर हायकोर्टाने नाग नदीचं संवर्धन करण्यासोबतच नदीच्या किनाऱ्यावरील सर्व ऐतिहासिक वास्तूंचं आणि मंदिरांचं संवर्धन करण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाला दिले होते. त्यामुळे भोसल्यांच्या काळात वैभव नागपूरच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या या नदीला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळेल का याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

1 Comment
  1. Dhakalu Mahadev Davari says

    खूप छान माहिती.

Leave A Reply

Your email address will not be published.