पहिल्याच भेटीत महेशला लक्ष्याने झपाटून टाकलं होतं.

आपल्या सगळ्यांचा इन्स्पेक्टर महेश ज्याधव, आणि हवालदार लक्ष्या.

लक्ष्याच्या लाडक्या मयेशला मराठीतला पहिला अर्बन हिरो म्हटल तरी चालेल. वाक्यावाक्यात डॅम ईट सारख्या इंग्रजी वाकप्रचाराचा प्रयोग करणाऱ्या महेशने मराठी सिनेमाचा चेहरा बदलून टाकला. तो चांगला वाईट या वर कोणी वाद करू शकतील पण महेश कोठारे स्टाईलची फिल्म हा एक अभ्यासाचा विषय आहे. पण यापेक्षाही त्याची आणि लक्ष्याची न तुटणारी दोस्ती अख्या महाराष्ट्रासाठी आपुलकीचा विषय.

खरं तर महेश कोठारे-सचिन पिळगावकर हे दोघे हिरो कम दिग्दर्शक  आणि त्यांच्या सोबत लक्ष्या अशोक सराफ या जोडगोळीने मराठीत कॉमेडीला अच्छे दिन आणले. सचिन आणि महेशचा प्रवास देखील एकमेकांना समांतरच. लक्ष्या-अशोक हा त्यांना जोडणारा दुवा. कधी एकमेकाच्या आडवे मात्र आले नाहीत. मराठी पब्लिकचं मनोरंजन करायचं काम मात्र त्यांनी चोख केलं.

महेश कोठारेचे वडील अंबर कोठारे हे अभिनय क्षेत्राशी निगडीत होते. त्याची आई सुद्धा नाटकात काम करायची. सचिनप्रमाणे महेश कोठारेने देखील बालकलाकार म्हणून सिनेमात आगमन केले. गजानन जहागीरदार यांच्या छोटा जवान या सिनेमात लीड रोलमधून त्यांनी धडाकेबाज एंट्री केली. या सिनेमातील जिंकू किंवा मरू हे गान आजही अनेकांच्या ओठात बसलेले आहे.

छोटा जवान हिट झाल्यावर मराठी बरोबर हिंदी सिनेमात बालकलाकार ऑफर मिळायला सुरवात केली.

राजा और रंक या सिनेमातल त्यांचं तू कितनी अच्छी है ओ मां हे गाण गाजलं. बालकलाकार असताना हिट असलेला महेश मोठा झाल्यावर मात्र त्याला अपेक्षित यशच मिळत नव्हत. घरचा भेदीलेक चालली सासरला  सारख्या सिनेमात त्याला निगेटिव्ह शेडचे रोल करावे लागले. महेशची इमेजच वहिनीला जाच देणारा कॉलेजला जाणारा दीर अशी पडत चालली होती.

महेश त्यात खुश नव्हता. त्याला मराठीत ग्रँड काही तरी करून दाखवायचं होतं. त्याकाळचे दिग्दर्शक आणि त्याच व्हिजन हे जुळत नव्हत. त्यासाठी स्वतःलाच सिनेमा बनवावा लागणार हे फायनल त्याच्या डोक्यात बसल होतं. पण पैसे कुठे होते? घरची परिस्थिती खूप चांगली होती असं नाही.

एलएलबी पूर्ण करून वकिलीची प्रॅक्टीस सुरु केली होती पण सिनेमा बनवायचा किडा थांबला नव्हता.

एकदा कुठेतरी त्याला शशी कपूरचा प्यार किये जा हा सिनेमा पहायला मिळाला. किशोर कुमार, मेहमूद यांनी जो धुमाकूळ घातलाय तो मराठीत आणता येईल हे महेश ला जाणवल. रात्रंदिवस तो त्याच सिनेमाचा विचार करू लागला. काही तरी सिनेमासाठी जुळवाजुळव सुरु केली. एका मित्राकडून काही पैसे उधार घेतले आणि प्यार किये जा चा रिमेक करायचं ठरवलं.

किशोर कुमारच्या रोल साठी अशोक कुमार फिट आहे हे त्याला आधी पासून ठाऊक होतं, ओमप्रकाशनी रंगवलेल्या खाष्ट सासऱ्याच्या धनाजी वाकडेच्या रोल साठी शरद तळवळकरना घेतलं. हिरो महेश जवळकरची भूमिका तो स्वतःच करणार होता. बाकी सगळी टीम तयार केली फक्त मेहमूदच्या रोलसाठी त्या तोडीचा कॉमेडी करणारा तगडा कलाकार मिळत नव्हता.   

महेशच्या आईवडीलांच्या आयएनटी ग्रुपच एक जुनं फेमस नाटक होतं “झोप गेलेला जागा झाला”. या नाटकात बबन प्रभू नावाच्या कलाकाराने खूप जबरदस्त काम केलं होतं. या नाटकाचे हजारो प्रयोग झाले होते. त्यांच्या मृत्यू नंतर हे  नाटक परत करायचं असं नाटक ग्रुपने आयएनटीने ठरवलं. त्यासाठी त्यांनी एक नवा कलाकार शोधला, त्याच नाव लक्ष्मीकांत बेर्डे.

महेश हे नाटक बघायला आला होता. त्याला नाटकातलं लक्ष्याच काम खूप आवडल. तेव्हाच तो म्हणाला,

“मला माझा मेहमूद सापडला”

प्रयोग झाल्या झाल्या तो लक्ष्याला भेटला. आपल्या सिनेमाची कन्सेप्ट सांगितली आणि सांगितलं माझ्या सिनेमात टू सोडून दुसर कोणीही काम करू शकत नाही, हा रोल फक्त तुझ्या साठीच बनला आहे. लक्ष्याला ती कथा आवडली. त्याहूनही आपल्या सिनेमासाठी एवढा झपाटलेला माणूस आवडला. लक्ष्या तयार झाला.

महेशची कडकीच सुरु होती पण तरी त्याने खिशातून एक रुपया काढला आणि लक्ष्याला साइनिन्ग अमाऊन्ट म्हणून दिल. पिक्चरच नाव ठरल धूमधडाका.  साल होत १९८५.

याच सिनेमापासून महेश आणि लक्ष्याची दोस्ती सुरु झाली. अशोक सराफच वख्या व्खीवूखू प्रचंड हिट झालं तसच लक्ष्याचा वेंधळा सिनेमाचा किडा चावलेला करेक्टर देखील गाजलं. शरद तळवळकरनां तो जसं भुताची स्टोरी सांगतो त्या एका सीनमधूनच कळाल हे पोरग पुढ जाऊन काय काय कमाल करणार आहे.

या सगळ्या टीमचा कप्तान म्हणून महेश कोठारेचा धूमधडाका मध्ये सिंहाचा वाटा होता.

या सिनेमाच्या निमित्ताने महेशने स्वतःचा देखील मेकओव्हर केला होता. गोऱ्यागोमट्या चेहऱ्यावर एक बारीकशी मिशी ठेवून राउडी लुक आणायचा प्रयत्न केला होता. त्याच्या फायटिंग मध्ये कॉमेडी नसून तो सिरीयस फायटिंग करतोय हे जाणवायचं. मराठी सिनेमाला एका चांगल्या दिग्दर्शकाबरोबर एक देखणा,चांगली अक्टिंग करणारा, न अडखळता इंग्लिश शब्द बोलू शकणारा, डान्स करणारा आणि विशेष म्हणजे फायटिंग करणारा अस्सल हिरो मिळाला होता.

त्याने धूमधडाका पाठोपाठ दे दणादण, थरथराट, धडकेबाज , झपाटलेला अशा पंचाक्षरी सिनेमाची रांग लावली. सगळे सिनेमे सुपरहिट होते.

त्याच्या सिनेमाची एक खासियत होती. त्यात कॉमेडी बरोबर अक्शनसुद्धा असायची.कवट्या महाकाळ, तात्या विंचू, टकलू हैवान असले विचित्र नावाचे व्हिलन, हवालदार किंवा तशाच साध्यासुध्या सर्वसामान्य असणाऱ्या लक्ष्याला मिळणारी एखादी सुपरपॉवर, त्याने घातलेला गोंधळ आणि शेवटी ते सावरायला येणारा इन्स्पेक्टर महेश अशी जमून आलेली भट्टी.

झपाटलेला ने अख्ख्या महाराष्ट्राला झपाटून टाकले. तो आजही कल्ट मानला जातो. महेशच्या पिक्चरमध्य लक्ष्या एका वेगळ्याच एनर्जीने चमकायचा. पुढे तो हिंदी सिनेमात गेला, सलमान बरोबर त्याची जोडी जमली पण महेशला तो कधीच विसरला नाही,

माझा छकुलाचा हिंदीत रिमेक करून महेशने देखील हिंदीत आपल नशीब आजमावल. ” मासूम” देशभरतल्या बालगोपालांच्यात गाजला. पण हे सक्सेस महेशला कन्टीन्यू करायला जमल नाही. मराठीत मात्र त्याची आणि लक्ष्याची जादू सुरुच राहिली.

नव्वदच्या दशकात महेशने आणि त्याच काळातल्या सचिनने मराठी पब्लिकला परत थिएटरमध्ये यायला मजबूर केलं. डबल मिनिंग जोक न करता देखील लोकांना हसवता येत हे या दोघांच्या सिनेमाने प्रुव्ह करून दाखवलं. अलका कुबलच्या रडक्या सिनेमांची लाट अडवून लक्ष्या अशोकच्या कॉमेडी सिनेमाची लाट आली याला हे दोघेच कारणीभूत होते.

महेशने खूप नवीन नवीन टेक्नोलॉजी मराठी सिनेमात आणली. व्हिज्युअल इफेक्ट्स वगैरे वर त्याने अमाप खर्च केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकेतून टेक्नोलॉजी आणली होती, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय त्यालाच जाते. पहिला 3डी मराठी सिनेमासुद्धा त्यांनीच बनवला.

त्याचा आणि लक्ष्याचा एकत्र असलेला पछाडलेला हा शेवटचा सुपरहिट सिनेमा.

लक्ष्याच्या अकाली जाण्यानंतर मात्र हळूहळू महेशची सिनेमा बनवण्याची उर्मी सुद्धा निघून गेली. नाही म्हणायला खतरनाक, शुभ मंगल सावधान सारखे भारी सिनेमे त्याने बनवले पण जबरदस्त, पछाडलेला २ या सिनेमामध्ये लक्ष्याच्या अनुपस्थितीत त्याचे पिक्चर रंगलेच नाहीत.

आज त्यांचा छकुला आदिनाथ सिनेमात हिरोचा रोल करतोय. सून उर्मिला देखील फेमस आहे. महेश कोठारे यांनी निर्माता म्हणून जय मल्हार या टीव्हीवर केलेल्या अचाट प्रयोगाचे कौतुक ही झालं आणि राज्यभरात ही सिरीयल देखील भरपूर गाजली. पण हा इन्स्पेक्टर महेश आता रिटायर झालाय, लक्ष्या अभावी त्याचं सिनेमात मन रमत नाही. आजही कुठल्या मुलाखती मध्ये लक्ष्याचा उल्लेख आला तर त्यांचे डोळे ओलावल्याशिवाय राहात नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.