विधानपरिषदेच्या निवडणुकीत काय राडा होणार, कोण जिंकून येणार, कुणाचा गेम होणार….

राज्यसभा निवडणुकीनंतर आता बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित विधानपरिषदेची निवडणूक आज आहे. मतदान सुरु झालेलं आहे. 

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होत आहे तर ११ उमेदवार मैदानात आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी अन भाजपमध्ये, त्यातल्या त्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगणार आहे. 

राज्यसभेत झालेला सर्व ड्रामा ताजा असतांनाच या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काय राडा होणार कोण जिंकून येणार, कुणाचा गेम होणार या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लागलंय.

आजच्या विधानपरिषदेत फुल्ल ऑन क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे, कारण राज्यसभेच्या निवडणूकीच्या नियमानुसार मतदारांना व्हीप जारी केला जातो मात्र विधानपरिषदेचं तसं  नाही. 

इथे संपूर्ण मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने होते. त्यामुळे कोण फुटला हे त्या पक्षालादेखील लक्षात येत नाही. त्यामुळेच फक्त अपक्ष किंवा छोटेमोठे पक्षच नाहीत तर आपल्याचं आमदारांच टेन्शन इथे प्रत्येक पक्षाला असणार आहे. कारण अलीकडेच आलेल्या बातम्यांनुसार शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी फोन केल्याच्या चर्चा झाल्यात.

आजच्या निवडणुकीचा रणसंग्राम असा आहे 

एकूण १० जागांवर भाजपचे ५, शिवसेनेचे-२, राष्ट्रवादीचे-२, काँग्रेसचे -२ असे उमेदवार मैदानात आहेत.  भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय असे ५ उमेदवार उभे आहेत.  

शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवर सचिन अहिर आणि अमशा पाडवी हे २ उमेदवार उभे आहेत. तर राष्ट्रवादीने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे असे २ उमेदवार उभे आहेत.  प्रश्न उरतो काँग्रेसचा तर कॉंग्रेस पक्षाने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या २ उमेदवारांना उभं केलं आहे.

आजची निवडणूक कशी पार पडणार ? त्यासाठी मतदान कशा पद्धतीने होणार ? निवडून येण्यासाठी मतांचा कोटा काय ठरलेला आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघूया…

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद म्हणतात. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. विधानसभेत एकूण २८८ आमदार आहेत. विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या ही त्या घटक राज्यातील विधानसभेच्या सदस्यसंख्येवरून ठरवली जाते. 

देशातील सर्वच राज्यांमध्ये विधानपरिषद आहे असं नाही. आजच्या दिवसाला एकूण २८ राज्यांपैकी फक्त ६ राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,कर्नाटक, तेलंगणा, बिहार आणि उत्तर प्रदेशात विधानपरिषद आहे तर लवकरच आसाम, ओडिशा या राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

 विधानपरिषदेत कोणकोणत्या घटकांचं प्रतिनिधित्व असतं ? 

  • विधान परिषदेतील ७८ पैकी ३१ सदस्य विधानसभेच्या आमदारांनी निवडून दिलेले असतात.
  • १२ सदस्य राज्यपाल नियुक्त असतात.
  • २१ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात.
  • शिक्षक व पदवीधरमधून प्रत्येकी ७-७ सदस्य निवडून दिले जातात.

दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि त्या रिक्त जागी विधानपरिषदेची निवडणूक लागत असते.

तर आजच्या दहाव्या जागेसाठी खरी लढत आहे. या जागेसाठी भाजपने ५ वे उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांना तर काँग्रेसने भाई जगताप यांना उतरवलं आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढाई होणार आहे.

त्यासाठी पक्षीय संख्याबळ बघूया…

विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला सध्या पहिल्या पसंतीक्रमांकाची २७ मतं आवश्यक आहेत. 

संख्याबळानुसार भाजपचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचा १ , कॉंग्रसेचा १ असे उमेदवार निवडून येऊ शकतात. 

तुम्ही म्हणाल राष्ट्रवादीचा एक कसा? तर जरा थांबा कारण दुसरी जागा निवडून आणायला राष्ट्रवादीला कसरत करायला लागणारे. तसंच काहीसं कॉंग्रेसचं दुसऱ्या जागेबाबत आणि भाजपचं ५ व्या जागेबाबत आहे. कारण सध्या तरी मतांचा कोटा २७ चा आहे. 

मात्र राज्यसभेच्या अनुभवानंतर कोणताही पक्ष आपला मतांचा कोटा काठावर ठेवणार नाही हेच चित्र आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार सुरक्षित करण्यासाठी हा कोटा ३० पर्यन्त वाढवू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

आता संख्याबळ बघूया,

शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ आमदार असं महाविकासआघाडी स्थापन होताना संख्याबळ होतं. 

मात्र त्यात आता अपडेटेड आकडेवारी पाहिल्यास, सेनेच्या एका आमदारचं निधन झालं तर राष्ट्रवादीने पंढरपुरची एक जागा गमावली दुसरीकडे अनिल देशमुख आणि नवाब मलिक असे २ जण तुरूंगात आहेत.  त्यामुळे सध्या सेनेकडे ५५ आमदार,राष्ट्रवादीचे ५१ आमदार आणि काँग्रेसचे ४४ आमदार असं संख्याबळ आहे. 

विधानपरिषदेच्या निवडणूकीतील मतदान प्रक्रिया कशी असते ?

विधानसभेतील आमदार हे थेट जनतेतून निवडले जातात मात्र विधान परिषदेतील आमदार निवडून देण्यासाठी विधानसभेतले आमदार मतदान करत असतात.  सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यसभेत मतदान प्रक्रियेत व्हीप जारी केला जातो, पक्षाच्या एजंटला मत दाखवावं लागतं मात्र विधानपरिषदेच्या मतदानात असं नसतं.

इथे व्हीप जारी केला जात नाही कारण येथील मतदान गुप्त पद्धतीने होत असते. 

यात मतदानासाठी पसंतीक्रमाची पद्धत वापरली जाते. निवडणुकीसाठी जेवढे उमेदवार उभे असतील तेवढय़ा उमेदवारांना मतदार आपल्या पसंतीक्रमानुसार मतदान करत असतात. सर्वात जास्त पसंती असणाऱ्यांना पहिला क्रम, दुसरी पसंती असणाऱ्याला दुसरा क्रम, तिसरी पसंती असणाऱ्याला तिसरा क्रम अशा पद्धतीने सर्व उमेदवारांना मतं दिली जातात.

सर्वात महत्वाचं म्हणजे मतांचा कोटा कसा ठरतो ?

अनेक राजकीय जाणकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा फॉर्म्युला (विधानपरिषदेतील एकूण जागा गुणिले १०० भागिले रिक्त जागा  + १ = जो भागाकार येईल त्याला अधिक १) असा आहे.

या प्रोसेस मध्ये पक्षाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार पक्ष स्वतः मतांचा एक कोटा निश्चित करतो निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो.

निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही. आणि दोन उमेदवारांच्या सरळ लढतीत पहिल्या पसंतीच्या मतात जो पहिल्या क्रमांकावर राहतो त्याचा विजय जवळपास नक्की असतो. 

मतांचा कोटा पूर्ण नाही झाला तर दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. तरी कोटा पूर्ण नाही झाला तर पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला विजयी घोषित केले जाते

आणखी एक म्हणजे, 

एखाद्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतं ठरवलेल्या कोट्यापेक्षाही जास्त मिळाली तर त्याला सरप्लस मतं म्हणतात. ही सरप्लस मतं दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या उमेदवाराकडे हस्तांतरित करतात. मात्र दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या उमेदवाराला देखील सरप्लस मतं मिळाली तर ती जे निवडून आलेले नाहीत त्या उमेदवारांकडे हस्तांतरित होतात तर ही होती विधानपरिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया…

आजच्या या निवडणुकीचा निकाल काय लागतो ते पाहणं सर्वात जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.