पूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…
डिसेंबर २०२२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुका होणार असतानाच ऑक्टोबर २०२२ मध्ये गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. मोरबी इथल्या मच्छू नदीवरील पूल हा तब्बल सहा महिने बंद ठेवल्यानंतर दुरूस्तीचं काम संपवून उद्घाटन केल्याच्या फक्त ५ दिवसांनंतर तुटला.
या दुर्घटनेत लहान मुलं, स्त्रिया, वयोवृद्ध असे जवळपास सगळ्याच वयोगटातील नागरिकांचे प्राण गेले.
दुर्घटनेवेळी जवळपास ५०० लोक त्या पुलावर होते. मुळात त्या पुलाची क्षमता ही जास्तीत जास्त १२५ लोकांची होती. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर ताण आल्यानं हा पूल तुटला असं सांगण्यात आलं. या दुर्घटनेच्या वेळी काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात टिपलेली काही दृष्यही समोर आली होती.
या व्हिडीओजमध्ये तो पूल हलताना दिसत होता, तर नागरिक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसत होते. त्यानंतर हा पूल कोसळला. जवळपास १३५-१५० लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर, १८०- २०० नागरिकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं.
ही घटना घडली ३० ऑक्टोबर २०२२ रोजी. या घटनेच्या जवळपास महिनाभरानंतरच गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यानं ही घटना भाजपच्या दृष्टीनं नकारात्मक ठरेल असं सांगण्यात येत होतं.
या घटनेमुळं गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपविरोधात असंतोष आणि चीड निर्माण होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती.
पण एक व्हिडीओ भाजपसाठी फायद्याचा ठरला
या दुर्घटनेनंतर देशभरात एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्वत: मच्छू नदीच्या पाण्यात उतरून दुर्घटनाग्रस्तांची मदत करत होती. स्वत:च्या जीवाशी खेळून तो माणूस लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
या व्यक्तीचं नाव म्हणजे कांतिलाल शिवलाल अमृतिया. कांतिलाल यांना भाजपनं २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलं.
हे कांतिलाल शिवलाल अमृतिया कोण आहेत?
कांतिलाल हे काही पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिलेत अश्यातला भाग नाही. कांतिलाल हे सुरूवातीच्या काळात आरएसएस चे स्वयंसेवक म्हणून काम करत होते. विद्यार्थी असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी काम केलं. त्यानंतर राजकीय जीवनाच्या सुरूवातीला त्यांनी मोरबी नगरपालिका आणि तालुका पंचायतीत सदस्य म्हणून काम केलं.
त्यानंतर १९९५ साली कच्छ या राज्यात येणाऱ्या मोरबी मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून २०१७ पर्यंत कांतिलाल अमृतिया हे सलग ५ वेळा आमदार झालेत. २०१२ साली त्यांना गुजरातमधील सर्वोत्तम आमदारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचं स्थानही मिळालं होतं.
पण २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ब्रिजेश मेर्जा यांचा विजय झाला. २०२० साली मेर्जा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीला पुन्हा मेर्जा यांनीच बाजी मारली.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकांपुर्वीसुद्धा मोरबी मतदारसंघात भाजपचेच ब्रिजेश मेर्जा हे आमदार होते. आता एखाद्या विधानसभेत आपलाच आमदार असताना त्या विधानसभेतून उमेदवार बदलण्याचा विचार फार क्वचितच केला जाऊ शकतो, पण मोरबी मतदारसंघात हे घडलं.
त्यामागचं कारण होतं. देशभरात व्हायरल झालेला कांतिलाल अमृतिया यांचा तो व्हिडीओ.
एखादा माजी आमदार स्वत:च्या जीवाची बाजी लावून, दुर्घटनाग्रस्त लोकांना वाचवताना दिसत होता, साहजिकच अमृतिया यांना प्रेम आणि सहानुभूती मिळाली. नेमकं हेच भाजपनं हेरलं आणि आपले स्वत:चे विद्यमान आमदार ब्रिजेश मेर्जा यांना तिकीट न देता कांतिलाल अमृतिया यांना तिकीट दिलं.
आतापर्यंत गुजरात निवडणुकांच्या हाती आलेल्या निकालांनुसार मोरबी मतदार संघातून कांतिलाल अमृतिया यांनी बाजी मारलीये. वास्तविक पाहता, अशी एखादी दुर्घटना घडल्यानंतर सत्ताधारी पक्षाचा उमेदवार त्या दुर्घटनाग्रस्त विधानसभेतून निवडून येण्याची शक्यता फारच कमी असते.
पण अमृतिया यांनी दाखवलेल्या धाडसामुळे फक्त सोशल मीडियावरच नाही, तर मेनस्ट्रीम मीडियामध्येही त्यांची जोरदार चर्चा झाली आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना तिकीट दिलं. अमृतिया यांनीही हा विश्वास सार्थ ठरवला आणि १५ हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे.
हे ही वाच भिडू:
- या ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही आहे का…?
- खरच “आम आदमी पक्ष” आजपासून ‘राष्ट्रीय पक्ष’ झालाय का..?
- दोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार ?