….नाहीतर आज मुंबईच्या जागी सुरत ही भारताची आर्थिक राजधानी झाली असती.

साल होतं १६६४. नुकताच शाहिस्तेखान स्वराज्यातून आपली तुटलेली बोटे घेऊन पळाला होता. मात्र त्याच्या महाराष्ट्रातील वास्तव्यात स्वराज्याचं बरच नुकसान झालं होतं.हे भरून काढणे सुद्धा जरुरीच होतं. यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की स्वराज्याची लुट करणाऱ्या मुघलांच्या ठाण्यावर छापा मारून हे नुकसान भरून काढायचे.

ठिकाण ठरल सुरत.

सुरत हे त्याकाळातही श्रीमंत व्यापारी शहर होतं. इथल्या बंदरावरून पार आफ्रिका युरोप पर्यंतचा व्यापार चालायचा. हिरेजवाहिरे, सोन्याचे दागिने, रेशमी तलम कापड यासाठी सुरत तेव्हाही प्रसिद्ध होतं. यामुळेच फक्त भारतीय नाही तर इंग्रज,डच, फ्रेंच या युरोपियन देशांच्या वखारी सुद्धा तिथे होत्या.

मोगलांचे हे प्रमुख आर्थिक केंद्र होत. त्यांना या शहरातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळे. या शहराचं संरक्षण करण्यासाठी मुघलांनी सुरतेला बलाढ्य तटबंदी बांधली होती. या किल्ल्यावर व आसपास ५,००० सैनिकांची तरतूद होती. याच मुघल सैन्याच्या बळावर सुरत मधील व्यापार निर्धास्तपणे होत असे.

६ जानेवारी १६६४ रोजी शिवरायांनी सुरतवर छापा मारला.

तिथे असलेल्या मुघल सुभेदार इनायतखानाला आणि त्याच्या सैन्याला पळवून लावले. मोगल ठाणेदार व महसूलदप्तरांचे खजिने पुरते रिकामे केले गेले. तिथून पुढे तब्बल तीन चार दिवस मराठा सैनिकांनी शहरातील सावकारांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा करत होते.

“सावकारांचे वाडे काबीज करून सोने, चांदी, मोती, पोवळे, माणिक, हिरे, पाचू, गोमेदराज अशी नवरत्‍ने; नाणी, मोहरा, पुतळ्या, होन, नाणे नाना जातींचे, इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या. कापड भांडे तांब्याचे वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही. असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले”

इनायतखानाला इतर मुघल ठाण्याकडून रसद मिळायच्या आधी मराठा सैन्य सुरत मधून निसटले. तो दिवस होता १० जानेवारी. त्या दिवशी फक्त सुरत नाही तर दूर महाराष्ट्रातल्या एका गावाचं नशीब पालटणार होतं.

शिवरायांच्या त्या हल्ल्यामुळे अख्ख सुरत हादरल. फक्त सुरत नाही तर दिल्लीत बसलेल्या औरंगजेब बादशाहला हा इशारा होता.

आधीच आपल्या मामाचा शाहिस्तेखानाचा अपमानामुळे चवताळलेल्या बादशाहने परतणाऱ्या मराठा सैन्याला पकडायचे आदेश दिले. मात्र शिवरायांचे हे पठ्ठे ज्या वेगात आले. त्याच वेगात गायब देखील झाले.

या हल्ल्याचे पडसाद सातासमुद्रापार लंडनमध्ये उमटले. मुघलांच्या भरवश्यावर आपल्या वखारी सुरक्षित नाहीत असा निष्कर्ष हुशार असलेल्या ब्रिटीशांनी काढला. मुघलांचे शत्रू आपले शत्रू बनवण्यात अर्थ नाही हे त्यांना कळाल होतं. मराठ्यांशी वैर परवडणारं नाही याचा अनुभव त्यांनी घेतलाच होता. आता यावर काही तरी उपाययोजना करायचं ठरल.

काही वर्षापूर्वी इंग्रज राजकुमाराच पोर्तुगीज राजकुमारशी लग्न झालं होतं आणि या लग्नाच्या हुंड्यात एक गाव मिळाल होतं. या गावाचं नाव म्हणजे मुंबई.

तो पर्यंत मुंबई हे एक छोट बंदर होतं. सात बेटांच्या या बंदरात काही पोर्तुगीज चर्च, छोटे किल्ले आणि स्थानिक कोळी लोक एवढाच पसारा होता. मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून मिळून दोन वर्ष उलटली तरी पोर्तुगीजांनी त्यावरचा आपला हक्क सोडला नव्हता. इंग्रजांना देखील या गावात एवढा विशेष रस नव्हता.

पण शिवरायांच्या हल्ल्यानंतर त्यांनी सुरतला पर्याय शोधण्यास सुरवात केली तेव्हा त्यांची नजर मुंबईवर गेली.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सुरत पासून जवळ असलेले पण मराठे, मुघल या सर्वापासून सुरक्षित अंतरावर असलेल मुंबई गावचं इस्ट इंडिया कंपनीने फायनल केलं. पोर्तुगीज अधिकाऱ्यावर दबाव आणून शहर खाली करण्याचा प्रयत्न सुरु केला.यातून भांडणे झाली, युद्ध झालं आणि अखेर मुंबईवर इंग्रजांनी आपला ताबा मिळवला.

हळूहळू मुंबईच बंदर विकसित करण्यास सुरवात केली. 

मात्र परत काही वर्षांनी जेव्हा शिवरायांनी सुरतवर दुसऱ्यांदा छापा मारला तेव्हा त्यांनी इंग्रजांना सुद्धा लक्ष्य केले. ही धोक्याची घंटा होती. इस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठरवलं की मराठ्यांच्या स्वाऱ्या वाढल्यामुळे लवकारातल्या लवकर आपल्या सगळ्या व्यापाराचे मुख्य केंद्र सुरतवरून मुंबईला हलवण्याशिवाय पर्याय नाही.

१६७० पासून मुंबईचा खरा विकास सुरु झाला. पुढच्या १०० वर्षात भराव टाकून सातही बेटे जोडण्यात आली. रस्ते बांधले गेले. भव्य इमारती बांधल्या, रेल्वे सुरु केली. हे सगळ झालं फक्त शिवरायांनी सुरतेवर मारलेल्या छाप्यामुळे.

नाहीतर ब्रिटीशांनी सुरत कधीच सोडले नसते आणि आज मुंबईच्या जागी सुरत ही भारताची आर्थिक राजधानी राहीली असती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.