मसान ‘बाप’ आहे आणि ‘बापांचा’ आहे. 

मसानबद्दल लिहायची ताकद नाही माझ्यात. मी फक्त रडु शकते आणि काही ठिकाणी तर फक्त आतल्या आत कुढत बसु शकते. स्वतःवरती काही अंशी खुश होऊ शकते. काय विकृती आहे म्हणाल तुम्ही, पण हो मी खरंच मुव्ही संपल्यावर कुठंतरी खुश होते. कारण तो मुव्ही आहे आणि ही गोष्ट ‘माझी’ नाही म्हणून खुश होते. ती दिपकची गर्लफ्रेंड असणारी श्वेता कुठंतरी रिलेट करत जाते. ती ज्या लाडात वाढली,ज्या पद्धतीच्या ‘वर्गा’त वाढली तेच माझ्या वाट्याला पण आलंय. फरक एवढाच कि ती प्रेमात पडली….

म्हणून ही स्टोरी माझी नाही झाली. खरंतर मला दुसरंच काहीतरी मांडायचंय…

मला बाप मांडायचाय. माझा नव्हे, या मुव्हीतला. मला देवीचा बाप असणारा संजय मिश्रा मांडायचाय, मला पंकज त्रिपाठीचा चित्रपटात न दाखवलेला बाप मांडायचाय आणि मला देवीच्या बॉयफ्रेंडचा बाप पण मांडायचाय.

देवाचा बाप म्हणून असणारा पंडितजी. आयुष्यभर पोरीच्या डोळ्यात आईचा खुनी म्हणून प्रतिमा बघत जगणारा. जगणारा कसला फक्त श्वास घेणारा म्हणु शकतो. मला नाही वाटत पोरीचा हिरो म्हणून इमेज असणारा तोच बाप पोरीच्या अपराधी म्हणून जगु शकतो. पोरगी चुकलीय म्हणून दोन दणके हाणल्यावर फुटुन गेलेला संजय मिश्राचा बाप बघितला कि काळीज असं काही चिरत जातं कि बस्स. मी होस्टेलवरुन रडत फोन केलेला माझ्या पप्पांना एकदा. तेव्हा ज्येन्युनली सॉरी बोलण्यासाठी केलेला. तेव्हा अॉफिस ते घर हे तासाभराचं आसणारं अंतर माझ्या पप्पांनी 15 मि. पार केलेलं आणि विचारलेलं,

“असं काही केलंयस का जे सांगु शकत नाहीस?मला सांग,आपण बघुत काय करायचं ते.”

वयात आलेल्या मुलीचा बाप हा असा असतो. म्हणून तो सीन बघताना मी अक्षरशः फुटले होते. माझ्या पप्पांचे ते घर ते अॉफिस 15 मि. आणि हा सीन मिक्स झाला होता.

त्यांच्या प्रश्नाचं मी दिलेलं,

“नाही पप्पा,मी ठीक आहे.असं काही नाही होणारै.”

हे ऐकल्यावर सोडलेला तो निश्वास मात्र ना देवीच्या वाट्याला आणि ना पंडितजीने तो सोडला. पण अडकलेली पोरगी सोडवण्यासाठी त्याची धडपड बघितली आयुष्यात काहीतरी चुकतंय वाटत रहातं. काय चुकतंय? कदाचित बापाबरोबरचा संवाद राहतो. साला, व्हिलन करुन टाकलाय आपण ‘हिटलर’ला. शेवटी अंगठी सापडल्यावर पंडितजीचा चेहरा बघितला कि कसला जबराट फुलतो. तो छोटु शुद्धीत येतो तेव्हाही संजय मिश्रा ‘बाप’च दिसतो……

संजय मिश्राचा बाप खरंच ‘बापै’.

सध्याजी म्हणजे आपला पंकज त्रिपाठी मात्र खल्लास माणुस. त्यात त्याचा रोल आणि त्याचा अभिनय जीवघेणा. तो देवीशी ज्येन्युन्ली बोलत असतो. खीर खाताना देवी विचारते,

“आप अकेले रहते है..?”

“पिताजी के साथ रहता हुँ, वो अकेले रहते है..”

यात काय्यै भारी असं??? पंकज त्रिपाठीचा सहज संवादफेक कौशल्य तर आहेच पण बायकोविना एकटा पडलेल्या माणसाचं एकाकीपण, बाप-मुलगा यांच्यातला जनरेशन गैप आणि त्यातुन बापाला आलेलं एकाकीपण… सोबतच आईविना वाढलेल्या मध्यमवयीन पोराची आई होण्याची बापाची धडपड. त्या सीनला दोघेही, देवी आणि सध्याजी शांत होतात. कारण दोघात एकच नाळ आहे आणि ती म्हणजे आई नसल्याची आणि बापाचं एकाकीपण.

देवीचा बाप ते एकाकीपण घाटावर घालवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो तर सध्याजीचा बाप आई होण्याचा प्रयत्न करण्यात एकाकीपणाला डायल्युट करतो. ते ही निष्फळच. पोरांना जाणवतोच तो एकाकीपणा……

या दोन बापांसोबतच मला देवीच्या बॉयफ्रेंडचा न दिसलेला बाप पण भावलाय. देवी त्याचं सामान द्यायचं निमित्त करुन खरंतर माफी मागायला, अपराधीपणाची भावना कमी करायला जाते पण तिच्यासमोर असणारा बाप पुरता कोसळलेला असतो. अनेक चित्रपटांमध्ये आईचा हंबरडा दिसतो,इथला बाप हंबरडा फोडतो तेव्हा रडु येतच नाही. अचानकच शांत होतो माणुस. पूरुषानं फोडलेला हंबरडा पहिल्यांदा ऐकलं कि जास्त टोचत जातं.

विकी कौशल म्हणजे दिपकचा बाप मात्र फार साधा सरळ दाखवलाय. आयुष्य ज्या राखेत गेलं त्याच राखेत मुलगा जाऊ नये म्हणून प्रयत्न करणारा, त्याने मागेल तेवढे पैसे देणारा, त्याला समजुन घेणारा, त्याच्या बाजुनं ठामपणे त्याच्यावर विश्वास ठेवून उभा राहणारा…

हा बापही वेगळाच.

संपुर्ण सिनेमात मला फक्त बाप दिसत राहिले. तुमच्या माझ्या आजुबाजुला असणारे, आपल्याशी जुळवुन घेण्याचा प्रयत्न करणारे, आपल्या चुकांमधुन साळरण्याचा प्रयत्न करणारे, त्यांनी जगलेलं आयुष्य आपल्या वाट्याला न येऊ देणारे, आपल्या समजुन घेणारे आणि कितीही स्वतःला गरज असली तरीही जसं पंडितजी देवीला तिला हवं करण्यावर निर्बंध आणत नाहीत तसंच आपल्यालाही वागवणारे…..

असे अनेक फक्त बाप दिसले मला.

मसान ‘बाप’ आहे आणि ‘बापांचा’ आहे.

  • भिडू प्री पाटील (pppatilpriyanka@gmail.com)

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.