महाराष्ट्राच्या या क्रांतिकारकाने मॅक्सिकोत हरितक्रांन्ती घडवून आणली.

आपल्या मातीत एकसे एक अस्सल हिरे आहेत. दुर्देव फक्त इतकच की यातली बहुतांश नावे आपणाला माहित नसतात. माहित असलेच तर दोन चार ओळींची माहिती ठावूक असते.

आत्ता हेच पहा,

डाॅ. पांडुरंग खानखोजे हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला भारताचा स्वातंत्र्यलढा आठवेल. परदेशात जावून त्यांनी काहीतरी क्रांन्तीकारी चळवळी केल्या होत्या इतकच माहित असेल.

पण डाॅक्टरांचा इतिहास याहून अधिक भन्नाट आहे. महाराष्ट्राच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला त्याचा प्रवास युरोप, अमेरिका, जपान, सोव्हियत संघ, चीन अशा देशांपर्यन्त जावून पोहचला होता.

याच माणसाला लॅटीन अमेरिकेत देवदूत समजलं जातं. डाॅ. पांडुरंग खानखोजे यांचा हा इतिहास.

पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातला. १८८६ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण वर्धा येथे पूर्ण केल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी नागपुरात आले.

याच काळात भारतात स्वातंत्र्यलढ्याचं वार वाहू लागलं होतं. खानखोजे यांचे आजोबा १८५७ च्या उठावात सहभागी झाले होते.

साहजिक डाॅ. खानखोजे देखील स्वातंत्र्यलढ्यात उतरले.

ते लोकमान्य टिळकांना भेटले, टिळकांचा आदर्श घेवून सशस्त्र क्रांन्तीचा मार्ग धरून ते जपानला पोहचले.

जपानला पोहचण्याचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे याच काळात १९०४ मध्ये जापानी सैन्याने सोव्हियत युनियनच्या सैन्याला धूळ चारली होती. या युद्धनितीचा अभ्यास करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

जपान सोबत ते चीन मध्ये पोहचले. या प्रवासात त्यांनी चायनाचे पहिले राष्ट्रपती सन यात सन यांच्यासह अनेक क्रांन्तीकारकांच्या भेटी घेतल्या. या भेटींचा त्यांच्या संपुर्ण जीवनावर एक आमुलाग्र पगडा राहिला. कारण प्रत्येक भेटीमध्ये राष्ट्राच्या विकासात असणार कृषी क्षेत्रात महत्व त्यांना समजू लागलं.

याच काळात म्हणजे १९०६ साली सेन फ्रांन्सिस हे अमेरिकेतलं शहर भूकंपामुळे बेचिराख झालं होतं. या शहराच्या पुर्नबांधणीसाठी चीनमधून अनेक मजूर अमेरिकेला जाणार होते.

अशाच एका जहाजात बसून डाॅ. खानखोजे अमेरिकेत पोहचले.

सेन फ्रांन्सिस्कोमध्ये मात्र डाॅ. खानखोजे यांना विचारणारं देखील कोणी नव्हतं. दोन वेळेच्या जेवणाची इथे भ्रांत निर्माण झाली. त्यांनी एका हाॅटेलमध्ये वेटरचं काम पत्करलं.

काही दिवसात पैसे मिळू लागल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया आणि बर्कले विद्यापीठात कृषी विषयात शिक्षण घेण्यास सुरवात केली. या कालावधीत ते एका हाॅस्पीटलमध्ये कंपाऊंडरचे काम करू लागले.

१९१० मध्ये त्यांनी कृषी विषयात संशोधन पूर्ण केलं आणि डाॅक्टरेट मिळवली.

याच काळात त्यांनी स्पेन आणि लॅटीन अमेरिकेतील संघर्ष, मॅक्सिको क्रांन्ती आणि ब्रिटिश सत्तेविरोधात आयर्लेंड क्रांन्तिकारकांच्या बंडाचा अभ्यास केला व माउंट टैमालपास सैन्य ॲकॅडमीत प्रवेश घेवून हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.

दरम्यान अमेरिकेत राहून त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात पंडित कांशीराम व सोहन सिंह बखाना यांना एकत्रित घेवून इंडियन इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. त्यानंतर स्टॅमफोर्ड विद्यापीठाच्या लाला हरदयाळ यांची भेट घेण्यात आली.

या भेटीतून साकारली ती,

गदर पार्टी

या पार्टीमार्फेत अमेरिकेतून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठबळ देण्यात येवू लागलं.

डाॅ. खानखोजे यांनी आपल्या मॅक्सिकन मित्रांमार्फत पोर्टलैंड, ओरेगन येथील शेतांमध्ये अप्रवासी भारतीयांना युद्ध प्रशिक्षण देण्यास सुरवात केली.

दरम्यान पहिल्या महायुद्धास सुरवात झाली.

पहिल्या महायुद्धाचा चांगला परिणाम म्हणजे या युद्धामुळे पारतंत्र्यात असणाऱ्या देशांतील विद्रोही गट एकमेकांसोबत जोडले जावू लागले.

खानखोजे यांची भेट जर्मनीचे सैन्य अधिकारी विल्हेम वासमस यांच्या सोबत झाली.

पहिल्या महायुद्धाच्या काळात या दोघांनी मिळून आपली एक छोटी तुकडी तयार केली. बलुचिस्तानमार्गे ब्रिटीश भारतावर आक्रमण करण्यासाठी ही तुकडी तयार झाली. ठरल्याप्रमाणे ही तुकडी बलुचिस्तानमार्गे यायला निघाली पण यामध्ये त्यांना अपयश आलं.

१९१५ साल उजाडलं तेव्हा गदर पार्टीच्या अनेकांना अटक करण्यात आली होती. गदर संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती म्हणून डाॅ. खानखोजे पॅरिसमध्ये जावून मॅडम भिकाजी कामा यांना भेटले.

या घटनांमुळे त्यांच्या उत्साह कमी होण्याऐवजी तो वाढलचं. ते पुढे ब्लादिमिर लेनीन यांची भेट घेण्यासाठी गेले. १९१७ साली रशियात ही भेट झाली. त्यांनतरच्या काळात खानखोजे पूर्णपणे लेनिनचे प्रशंसक झाले.

इकडे ब्रिटीशांच्या हिटलिस्टवर डाॅ. पांडुंरग खानखोजे यांचे नाव आले होते. ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेपासून लपून राहण्यासाठी त्यांनी मार्ग पत्करला तो मॅक्सिकोचा.

मॅक्सिकोमध्ये पोहचल्यानंतर त्यांचे पुन्हा पोटाचे हाल सुरू झाले. आपल्या शेतीविषयक शिक्षणाच्या उपयोग करण्याच्या हेतूने त्यांनी मॅक्सिको शहराच्या जवळील एक्सोचिमिल्को येथे भाजीपाला उगवण्यास सुरवात केली.

सुरवातीच्या काळात त्यांचे जे मॅक्सिकन दोस्त होते त्यापैकी एकजण सध्या मॅक्सिकोचे कृषीमंत्री झाले होते. त्यांच्या मदतीतून डाॅ. खानखोजेंना चैंपिगो राष्ट्रीय कृषी विद्यालयात शिकवण्याचं काम मिळाल.

इथून सुरवात झाली ती डाॅ. खानखोजेंच्या कृषी क्रांन्तीला.

त्यांनी प्रथम स्पेनची भाषा शिकली व देशभरातील शेतकऱ्यांसोबत काम करण्यास सुरवात केली.

FFEFE3FD 76FA 4DCF 950E A47753A5D28E

शेतीविषयक अभ्यासांना सुरवात झाली. त्यांच्या लक्षात आलं की देशांतील कृषीक्रांन्तीसाठी नव्या तंत्रज्ञानासोबत संकरित वाणांची पैदास करण्याची गरज आहे.

या काळात त्यांची भेट मेक्सिकोचे दिएगो रिवेरासे यांच्यासोबत झाली. ते कृषीक्रांन्तीचे समर्थक होते. त्यांना इटलीच्या समाजसेविका टीना मोडेटी यांची साथ मिळाली व प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली.

खानखोजे मक्का उत्पादनात लक्ष घालू लागले. वेगवेगळ्या संकरित वाणासोबतच शेतीच्या पद्धतीत संशोधन होवू लागले.

बघतां बघतां खानखोजेंचे परिश्रम रिझल्ट देवू लागले. मॅक्सिको बाहेर देखील मक्का शेतीत क्रांन्ती होवू लागली. काही कालावधीत संपुर्ण लॅटीन अमेरिकेत मक्का क्रांन्ती झाली. यात महत्वाचा सहभाग गणला गेला तो डाॅ. पांडुरंग खानखोजे यांचा.

पुढे याचा कृषी क्रांन्तीचं नेतृत्व डाॅ. नार्मन बोरलाॅक यांनी केलं. पण त्याचा पाया घालण्याचं श्रेय निश्चितपणे खानखोजे यांना जातं.

१९५५ साली ते आपली पत्नी जेन आणि सावित्री व माया या दोन मुलींना घेवून भारतात परतले. भारत सरकारने त्यांना आर्थिक मदत देवू केली मात्र त्यांनी या मदतीला स्पष्टपणे नकार दिला. हीच मदत कृषी क्षेत्राचा विकास करण्यावर खर्च करावी असे त्यांनी सांगितले.

१९६७ साली वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.