रद्दीच्या दुकानात हृदयनाथ मंगेशकरांना सापडलेलं गाणं अजरामर झालं…

आपल्या मराठी संगीत क्षेत्रात अशी काही ठेवणीतली गाणी आहेत जी कधीही, कुठेही आणि केव्हाही ऐकली तरी नव्याने भिडतात आणि दरवेळी आपल्याला त्या गाण्यांचे वेगवेगळे अर्थ नव्याने उमगतात.

पण त्यासाठी प्रत्येक गाणं, गाण्याची काव्यरचना आणि गाण्यामागचा विचार गानरसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या गाण्याच्या गीतकाराला आणि संगीतकारला प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि मुळात त्या गीतकाराचे आणि संगीतकाराचे सुर हे गाणं तयार होण्याआधी जुळावे लागतात.

हे सुर कधी कधी काही केल्या जुळत नाहीत तर कधी एखाद्या अनपेक्षित स्थळी, अनपेक्षित वेळी अचानकच जुळतात.. असेच सुर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे जुळले ते कवि आणि ज्येष्ठ गझलसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश भटांशी.. एका अनपेक्षित स्थळी.. अनपेक्षित वेळी.. थेट रद्दीच्या दुकानात आणि तेही एकमेकांना न भेटता..

पाहूया हा किस्सा काय आहे..

१९५५ पासून आपली संगीताची कारकीर्द सुरू करणाऱ्या माननीय हृदयनाथ मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांचा म्हणजेच माननीय दीनानाथ मंगेशकर यांचा थोर वारसा लाभला. हृदयनाथ मंगेशकर यांनी अनेक कवींच्या कवितांना सुरेल चाली दिल्याच, पण गाण्याची निर्मिती होत असताना घडणाऱ्या बारीक सारिक गोष्टी, किस्से, घटना, प्रसंग टिपून ठेवत, कोणत्याही कार्यक्रमात ते गाणं सादर होण्याआधी त्या रंजक गोष्टी स्वतः रसिकांना सांगणं ही त्यांची विशेष आवड होती. आणि त्यामुळेच आजही त्यांनी संगीतबद्ध केलेलं कोणतंही गाणं ऐकताना प्रेक्षकांना गाणं तयार होताना घडलेल्या एखाद्या प्रसंगाचे आपण साक्षीदार झालो आहोत असं वाटतं.

अश्याच एका कार्यक्रमात हृदयनाथांनी एका गाण्यामागची गोष्ट सांगितली होती आणि ते गाणं होतं “मेंदीच्या पानावर”

मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग
जाईच्या पाकळ्यांस दव अजून सलते ग

हे सुंदर शब्द आहेत सुप्रसिद्ध कवि सुरेश भट यांचे.. या ओळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एका रद्दीच्या दुकानात एक पुस्तक चाळताना वाचल्या. त्या पुस्तकाचं नाव होतं “रूपगंधा”. हा प्रसंग घडण्याआधी सुरेश भटांची आणि हृदयनाथ मंगेशकरांची साधी ओळखही नव्हती परंतु हृदयनाथांना या ओळी इतक्या आवडल्या की त्यांना या कवितेच्या ओळींचं गाणं बनवण्याची सुप्त इच्छा झाली.

हल्ली म्हणतात तसं, त्या ओळी वाचतानाच त्यांना त्या ‘क्लिक’ झाल्या असाव्यात आणि इतक्या सुंदर कवितेचं गाणं झालं नाही तर तो त्या कवितेवर अन्याय ठरेल म्हणून की काय त्यांनी मेंदीच्या पानावर या कवितेला चाल लावायला सुरवात केली आणि काही दिवसांतच चाल बसवून पुर्णही झाली. पण आता प्रश्न होता तो परवानगी घेण्याचा आणि क्रेडिट देण्याचा. कविचं नाव तर त्या रद्दीत मिळालेल्या पुस्तकावर लिहिलेलंच होतं पण ओळख नसतानाही एखाद्याची कविता उचलून तिला चाल लाऊन मोकळं होणं हे थोडं खटकणारं असू शकत होतं. मग चाल लावणारे साक्षात हृदयनाथ मंगेशकर का असेना.

नंतर ही चाल हृदयनाथ मंगेशकरांनी जेष्ठ गायक अरुण दाते यांना ऐकवली, त्यांनाही ती खुप आवडली आणि त्यावेळी अरुण दाते यांनी आपलं सुरेश भटांशी नातं असल्याचं हृदयनाथ मंगेशकर यांना सांगितलं.. सोबत सुरेश भटांची एक आठवणही सांगितली.. “सुरेश भटांच्या लग्नाला मी गेलो असताना त्यांच्या लाडू खाण्याची मी टिंगल केली आणि म्हणून सुरेश भटांनी मला बेदम मारलं होतं आणि त्यांना न विचारता तू त्यांची कविता ध्वनीमुद्रित केलीयेस त्यामुळे तू आता सांभाळ” असं अरुण दातेनी हृदयनाथ मंगेशकर यांना सांगितलं.

पण तरीही हृदयनाथांनी हे गाणं रिलीज करायचं निश्चित केलं होतं त्यामुळे ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. हे गाणं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं, पुढे रिलीज झालं आणि भरपूर गाजलं..

नंतर मात्र या गाण्याविषयी जेव्हा सुरेश भट यांना कळलं तेव्हा ते थेट हृदयनाथ मंगेशकर यांच्या घरी पोहोचले आणि दारावर जोरात ठकठक केली. हृदयनाथांनी दार उघडलं आणि सुरेश भटांना पाहून हृदयनाथांना ‘आज आपलं काही खरं नाही’ असं वाटलं.

सुरेश भटांनी आपणच हृदयनाथ मंगेशकर का असं विचारलं आणि हृदयनाथ मंगेशकर काही बोलण्याच्या आधीच त्यांनी हृदयनाथांना मिठी मारली आणि आज पासून आपण मित्र झालो असं जाहीर केलं.

पुढे सुरेश भट आणि हृदयनाथ मंगेशकर या जोडीने एकत्रित येऊन अनेक गाणी केली, त्यातली अनेक गाणी गाजली. आणि त्यांचं समीकरण जमून गेलं ते कायमचं. मालवून टाक दीप, आज गोकुळात रंग, तरुण आहे रात्र अजुनी, चांदण्यात फिरताना अशी एकसोएक सदाबहार गीतं सुरेश भट यांच्या लेखणीतून साकारली गेली आणि त्यातला योग्य भावार्थ समजून उमजून हृदयनाथांनी या सुंदर रचनांना तितक्याच सुंदर आणि रसरशीत चाली दिल्या. आणि एका रद्दीत सापडलेल्या कवितेमुळे संगीत सृष्टीला दोन महान कलाकारांचा आविष्कार एकत्रितपणे पाहायला मिळाला.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.