अमेरिकेपासून रशियापर्यंत अनेकजण डोकं टेकवायला नगरच्या मेहेराबादला का जातात ?

साखर कारखानदारीसाठी फेमस असलेला अहमदनगर जिल्हा. पण या जिल्ह्याला संतांची परंपरा देखील मोठी आहे. ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी इथेच लिहिली. शनीशिंगणापूर, नेवासे पासून ते भगवानगड, शिर्डी पर्यंत इथल्या गावागावात अध्यात्मिक वारसा आहे.

याच नगर जिल्ह्यात असंही एक ठिकाण आहे जिथे फॉरेनमधले लोक एका संताच्या समाधीवर डोके टेकायला येतात.

“मेहेराबाद अवतार मेहेरबाबाची समाधी”

या अवतार मेहेरबाबा यांचा जन्म पुण्याचा. मूळनाव मेरवान शेरियार इराणी. त्यांचे वडील इराण हून भारतात आले. झोराष्ट्रीयन पारसी धर्माचे ते साधक होते. मेरवान हा त्यांचा दुसरा मुलगा. घरातल्या अध्यात्मिक वातावरणाचे त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार झाले होते. मेरवान शाळेत प्रचंड हुशार होता. अनेक भाषा त्याने चटकन शिकून घेतल्या होत्या. शेक्सपियर पासून ते शेली, हाफिज पर्यंत प्रत्येकाच्या कविता त्याला तोंड पाठ होत्या. तो स्वतः देखील सुंदर कविता करायचा.

एकदा एकोणीस वर्षाचा मेरवान पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये क्लास साठी सायकलवरून निघाला होता तेव्हा त्याला रस्त्यात एका झाडाखाली त्यांना एक म्हातारी आज्जी दिसली. तिच्या भोवती भरपूर गर्दी झाली होती. उत्सुकतेने मेरवान तिथे गेला. त्याला ती आजी नेहमी दिसायची पण एरव्ही त्याने कधी लक्ष दिले नव्हते.

त्या आज्जीच नाव होतं हजरत बाबाजान. त्या मुळच्या अफगाणिस्तानच्या.

त्या एक सुफी संत होत्या. मेरवानचे वडील देखील बाबाजान यांचा प्रचंड आदर करायचे. त्या दिवसापासून मेरवान रोज त्या झाडाखाली बाबाजान यांच्यापाशी जाऊन बसू लागला. दोघांच्यात कधी संवाद व्हायचा नाही पण त्यांच्यापाशी बसूनच काही तरी अध्यात्मिक अनुभूती मेरवानला यायची.

एकदा तो संध्याकाळी आपल्या घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याने बाबाजान यांच्या हातावर डोके टेकवले. त्यावेळी बाबाजान यांनी त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. मेरवानला त्या स्पर्शात काही तरी दैवी शक्ती असल्यासारखं वाटल. तिथून त्याच आयुष्य बदलून गेल.

हजरत बाबाजान यांनी त्यांच्यात आत्मप्राप्तीची भूक जागी केली होती.

तिथून मेरवान आपल्या गुरूंच्या शोधात बाहेर पडला. त्यात ताजुद्दीन बाबा, नारायण महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि उपासनी महाराज हे चार सद्गुरू त्याला सापडले. यातील उपासनी बाबा यांच्या सोबत ते सात वर्षे राहिले. त्यांच्याच शिकवणीनुसार त्यांनी आपले अध्यात्मिक कार्य सुरु केले.

लोक त्यांना मेहेर बाबा म्हणून ओळखू लागले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा होतो. ज्या ठिकाणी हजरत बाबाजान यांचा स्पर्श झाला होता त्या झाडाखाली त्यांनी एकदा दगड टाकून पाहिला आणि त्यांना जाणवलं की आपल्या कडे काही अद्भुत शक्ती निर्माण झाल्या आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःला अवतारी पुरुष असल्याच जाहीर केलं.

१९२२ साली अवतार मेहेर बाबांनी मुंबईत मंजिल-ए-मीम ची स्थापना केली.

येथे मेहेर बाबा त्यांच्या अनुयायांना आत्मसंयमासाठी कडक शिस्तीचे मार्गदर्शन करायचे.  काही दिवसातच त्यांनी अहमदनगर मध्ये अरणगावाजवळ आपले आश्रम स्थापन केले. याला नाव देण्यात आले मेहेराबाद !

१९२० च्या दशकात बाबांचे हे आश्रम त्यांच्या कामाचे केंद्र बनले आणि पुढे मेहेराबाद मध्ये त्यांनी शाळा, दवाखाना उघडले. हे शाळा आणि दवाखाना त्यांनी सर्व जाती-धर्मांसाठी विनामूल्य खुले केले होते.

१० जुलै १९२५ रोजी त्यांनी वयाच्या २९व्या वर्षी मौन व्रत धरण केले. हे मौन व्रत पुढे ३४ वर्षे त्यांच्या  अखेरच्या श्वासापर्यंत टिकले.

आपल्या अनुयायांशी बोलण्यासाठी त्यांनी हातवारे करून तसेच मुळाक्षरांच्या पाटीचा उपयोग करून संवाद साधला. जाती-धर्माचा भेद न बाळगता मेहेर बाबांनी गरीब, मानसिक आणि रोगी रुग्णांसाठी शाळा, दवाखाने आणि रुग्णालय हे विनामूल्य सुरु केले होते.

एकोणीशे एकतीस साली बाबा पहिल्यांदा भारताबाहेर गेले. त्यांच्या बोटीत खुद्द महात्मा गांधी देखील होते. ते इंग्लंडला दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी निघाले होते. दोघांच्या या भेटीत बऱ्याच चर्चा झाल्या. तेथून अवतार बाबा अमेरिकेला गेले. तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

कॅलीफोर्नियाच्या हॉलीवूडमध्ये त्यांच्यासाठी खास रिसेप्शन ठेवण्यात आलं. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी या रिसेप्शनला हजर होते. तिथल्या एका कार्यक्रमात बाबा आपले मौनव्रत सोडणार अशी चर्चा होती मात्र तसं काही घडलं नाही. बाबांनी अचानक हॉंगकॉंगला जाण्याचा निर्णय घेतला.

पण अवतार बाबांची हॉलीवूड मधली क्रेझ कमी झाली नाही. त्यांच्यावर तिथल्या टाईम मासिकात लेख छापून आला. अनेक भक्त त्यांच्यापाठोपाठ भारतात आले. यात महिलावर्गाचा देखील समावेश होता. या महिलांना आणण्यासाठी बाबांनी खास जहाजे पाठवून दिली.

त्यांच्या भक्तांना बाबा लव्हर्स किंवा मंडळी असे म्हटले जाई.

अवतार बाबांनी यातील खास वीस भक्तांची निवड केली आणि त्यांना आपले सर्वस्व त्याग करण्याचा आदेश दिला. हे वीस भक्त बाबांच्या बरोबर संपूर्ण देशाच्या दौर्यावर गेले. फक्त भिक्षा मागून मिळेल तिथे राहत या सर्वानी देशातील मोठमोठ्या संतांची भेट घेतली.

बाबांनी ऑस्ट्रेलिया व अमेरिका येथे देखील मेहेर स्पिरिच्युअल सेंटर उभारले होते. मात्र याच्या उद्घाटनाला जाताना त्यांचा मोठा अक्सिडेंट झाला. तिथे त्यांचा एक पाय निकामी झाला. यानंतर एकदा सातारा येथे त्यांच्या गाडीला दुसरा अपघात झाला. यानंतर  बाबांनी आपले लिखाण देखील बंद केले आणि फक्त हातवारे करून भक्तांशी संवाद सुरु ठेवला.

त्याकाळी जगभरातील लोक भारतीय अध्यात्माकडे झुकू लागले होते.

काही ढोंगी त्यांना अध्यात्मिक समाधी मिळवून देण्यासाठी ड्रगचा वापर करण्यास सांगत होते. अवतार बाबा हे पहिले गुरु होते ज्यांनी नशिल्या पदार्थांचा वापर भारतीय अध्यात्मात वर्ज्य आहे हे पाश्चात्य जगाला सांगितलं. प्रेम हाच आत्मशोधाचा अंतिम मार्ग आहे असे त्यांचे मत होते.

जन्माने पारसी असूनही त्यांनी भारतभरात कृष्णभक्तीचा प्रसार केला.

मेहेरा इराणी नावाची पंधरा वर्षांची तरुणी त्यांची शिष्या होती. बाबांच्या मते त्याचं नात राधा कृष्णा प्रमाणे होतं. मेहेरा आणि ते बऱ्याचदा राधा कृष्णाच्या वेशात असायचे. या मेहेरा बाहेरच्या जगात प्रवेश करत नसत. कोणत्याही परपुरुषाची सावली देखील त्यांच्यावर पडू दिली जात नसे. जरी नामोल्लेख करायचा झाला तरी मिस गांधी, मिस हिटलर असा उल्लेख त्यामेहेरा यांच्या समोर करण्यात येई. त्यांच्या बाबांसोबत असण्यावरून काही टीका देखील झाली होती. मात्र मेहेरा अखेर पर्यंत बाबांसोबत राहिल्या.

जुलै १९२५ मध्ये धारण केलेल्या मौन नुसार मेहेर बाबा हे आपल्या जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत शांत राहिले आणि ३१ जानेवारी १९६९ रोजी या महान गूढवादी आणि अध्यात्मिक गुरुचे निधन झाले.

आजही अहमदनगरच्या मेहेराबाद येथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रशिया ते अमेरिका सर्व देशातील लोक येतात. हिंदू मुस्लिम, इराणी पारसी सर्व जन त्यांच्या समाधीवर डोके टेकवतात.

हे हि वाच भिडू.

 

2 Comments
  1. Dr Kunal Kolhe says

    लेख सुंदर आहे पण जाहिरात खूप खालच्या पातळीवर असल्याने लेख शेअर करताना पण लाज वाटते
    कृपया जहिरातींच तारतम्य बाळगा

  2. bhagwat says

    Bhidu..you have given a good tribute to meher baba..but try to cover their stay at satara..as they have stayed long time in rose wood banglow

Leave A Reply

Your email address will not be published.