इतका हूशार राजा छत्रपती घराण्यात होता पण दुर्दैव म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही.
कोणत्याही राजाचे अनेक गुण वर्णन केलेले आहेत. राजा फक्त युद्ध कलेत निपुण असणे हे त्याच्या राज्यकारभाराचे मानदंड असत नाही. खरा राजा प्रजेच्या कल्याणासाठी जे दूरदृष्टीचे निर्णय घेतो, आणि त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना भोगता येतो.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असोत किंवा राजर्षी शाहू यांनी त्या त्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे अख्या महाराष्ट्राचे कल्याण झाले. याचं भोसले घराण्याच्या वंशवेलाची फांदी तमिळनाडूच्या तंजावर संस्थानवर राज्य करत होती. १६७३ साली शिवरायांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंनी “अलागिरी नायक” ला हरवून तंजावर मध्ये स्वराज्य स्थापन केलं होत.
त्यांच्याच घराण्यातला कर्तबगार राज्यकर्ता म्हणजे सरफोजीराजे भोसले.
शरभोजी उर्फ सरफोजी दुसरा यांचा जन्म २४ सप्टेंबर १७७७ साली तंजावरच्या राजघराण्यात झाला. तंजावरचे राजे तुळजाजी भोसले यांनी स्वतः ला वारस नसल्याने सरफोजीला दत्तक घेतले.
त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जर्मन रेव्हरंड श्वार्ट्झ यांना देण्यात आली. या श्वार्ट्झला भारतीय संस्कृती आणि इतिहासात खूप रस होता . इंग्लिश, ग्रीक,लाटिन सोबतच संस्कृत, तमिळ, उर्दू या भारतीय भाषा सुद्धा त्याला अवगत होत्या. तल्लख सरफोजीचा श्वार्ट्झला लळा लागला. सरफोजीने सुद्धा वरील सर्व भाषांमध्ये प्राविण्य मिळवलं. त्याने श्वार्टझकडून राज्यकारभाराचे धडे घेतले.
सरफोजीला शिकवण्याच्या निमित्ताने तंजावरला आलेल्या श्वार्ट्झला तंजावर मध्ये असलेल्या “नायक” घराण्याच्या “सरस्वती महाल” लायब्ररीचा शोध लागला. या लायब्ररीमध्ये अनेक मौलिक ग्रंथ, हस्तलिखिते धूळ खात पडली होती. श्वार्ट्झला भारतीय भाषा येत असल्याने त्याने ती वाचून काढली. त्याला त्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात आले. या ग्रंथांचे व्यवस्थित वर्गीकरण करून ते ग्रंथालय पुन्रोजीवीत करण्यात आले.
सरफोजी महाराजांना इथेच वाचनाची सवय लागली.
१७८७ साली महाराज सरफोजी हे तंजावरच्या गादीवर आले. सावत्र भाऊ अमरसिंग याच्या बंडामुळे काही काळ सरफोजी यांना सत्तेवरून बाजूला जावे लागले होते. मात्र श्वार्टझने इंग्रजांकडून सरफोजीचा हक्क मिळवून दिला. १७९८ साली राजे सरफोजी परत राजगादी वर आले मात्र इंग्रजांनी त्यांना मांडलिकत्व स्वीकारायला लावले.
येथून पुढे सरफोजी राजांनी आपला वेळ युद्धलढाई राजकारण याच्यात घालवण्यापेक्षा सुसूत्र राज्यकारभार आणि विद्यासंचय या मध्ये घालवला.
तंजावरला विद्येचे माहेरघर बनवण्याचा मान सरफोजी महाराजांना जातो.
त्यांनी सरस्वती महाल लायब्ररीसाठी जगभरातून ४००० पुस्तके विकत आणून ग्रॅंथालय समृद्ध केले. अरबी फारसी भाषेतील पुस्तकांचे अनुवाद केले. ग्रॅंथालयानध्ये अनेक ग्रॅंथासोबतच अनेक नकाशे आणि डिक्शनरी त्यांनी जमवल्या होत्या. १४ भाषा अवगत असणाऱ्या महाराजांनी लायब्ररीमधील सर्व म्हणजे जवळपास ३० हजार पुस्तके अभ्यासली होती. याचा वापर फक्त अभ्यास करण्यासाठी नाही तर जनतेच्या भलाईसाठी देखील केला.
तामिळ, मराठी, तेलगु भाषेतून विपुल वाङ्मयीन रचना सरफोजीराजांनी स्वत: केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही करून घेतल्या. गोविंदकवी, विरुपाक्षकवी, गंगाधरकवी, अंबाजी पंडित, अवधूतकवी हे त्यांचे दरबारी होते.
सरफोजी महाराज यांना आयुर्वेदाचे ज्ञान होते. त्यांनी धन्वंतरी महाल बांधला होता जिथे आयुर्वेद, अलोपेथी, युनानी चिकित्सा पद्धती यावर संशोधन चाले. महाराज स्वतः रुग्णांवर उपचार करीत.
“महाराजांना नेत्रचिकित्से मध्ये विशेष रुची होती. महाराज फक्त औषधोपचार करत नव्हते तर ते शस्त्रक्रिया ही करायचे. साधीसुधी नाही तर मोतीबिंदू वरील शस्त्रक्रिया. १७५२ साली मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेचा शोध फ्रान्समध्ये लागला होता. त्याकाळात भारतामध्ये अतिशय कमी लोकांना या अवघड ऑपरेशनचे ज्ञान होते.”
महाराज सरफोजी त्या पैकी एक. त्यांनी फक्त ऑपरेशन केले नाही तर प्रत्येक ऑपरेशनचे डोक्यूमेंटेशन करून ठेवले. प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यांची उपचारापूर्वी आणि उपचारानंतर अशी चित्रे काढून ठेवण्यात आली होती. आपल्या वैदकीय अनुभवावर महाराजांनी शरभेन्द्र वैद्य मुरगळ हा ग्रंथ लिहिला. यात अनेक रोग व त्यावरील उपचार यांचे व्यवस्थित वर्णन करून ठेवले आहे.”
संगीत नृत्य नाट्य चित्रकला या प्रत्येक कलेमध्ये सरफोजी महाराजांनी योगदान दिले. कर्नाटकी शास्त्रीय संगीताला व्हायोलिन आणि सनईची ओळख त्यांनी करून दिली.
कुमारसंभव चम्पू, मुद्राराक्षसछाया ,आणि देवेंद्रकुरुंजी या सारखे संगीतावरील ग्रंथ लिहिले. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. पाश्चात्य संगीतकारांचे तंजोर बंड त्यांनी उभारले होते.
हिंदुस्तानी राग आणि संगीताला पाश्चात्य नोटेशन वर बसवण्याची अभिनव कल्पना सरफोजी महाराजांचीच. कर्नाटकीसंगीत आणि भरतनाट्यमला सुवर्णकाळ त्यांनी मिळवून दिला. भरतनाट्यम मध्येही काही नवीन नृत्यरचना सरफोजी महाराजानी बसवल्या. तंजावर चित्रशैलीचा उगम, प्रसार त्यांनी केला. दरबारासाठी त्यांनी बनवून घेतलेली चित्रे आजही याची साक्ष आहेत.
तमिळ, तेलगु आणि तमिळ या भाषामध्ये अनेक ग्रंथ महाराजांनी स्वतः लिहिले अथवा पंडितांकडून लिहून घेतले. गोविंदकवी, विरुपाक्षकवी,अवधूतकवी हे त्यांच्या दरबारची शान होते.
गंगाविश्वेश्वर परिणय’, ‘मोहिनी-महेश परिणय’, ‘देवेंद्र कोरवन्झी’, ‘सुभद्रा कल्याण अशी अनेक नाटके महाराजांनी बसवली. त्याचे प्रयोग करवून आणले.
सरफोजी राजांनी दक्षिणेत पहिला देवनागरी छापखाना टाकला.
त्यात छपाई साठी दगडाक्षरांचा वापर करण्यात आला. तंजावरच्या बृहडेश्वर मंदिरात इ. स. १८०३ मध्ये भोसले घराण्याचा इतिहास कोरून घेतला आणि मराठी माणसावर उपकार करून ठेवले. हा भारतातला सर्वात मोठा शिलालेख मानला जातो.
त्यांचे मराठी भाषेतील आणखी एक महत्वाचे योगदान म्हणजे त्यांनी मराठीमध्ये पाककलेतील ग्रंथ लिहिला त्याच नांव श्री शरभेन्द्र पाकशास्त्र. शिवकाळातील पाककृती या पुस्तकामुळे आपणास कळू शकतात. महाराजांनी ‘नवविद्या कलानिधी शाळा’च्या माध्यमातून साहित्य संगीत कला विज्ञान या सोबतच वेद आणि शास्त्राचा संशोधन करवून घेतले.महाराज रॉयल आशियाटीक सोसायटी चे मानद सदस्य देखील होते.
महाराजांनी फक्त सरस्वतीची सेवा केली असं नाही. त्यांनी तंजावरच्या जवळ मनोरा येथे जहाजबांधणी कारखाना सुरु केला.
बंदुक बनवण्याचा कारखाना त्यांनी सुरु केला. समुद्री व्यापार सुरळीत व्हावा आणि शेतकर्यांनाही मदत व्हावी यासाठी हवामान संशोधन केंद्र सुरु केले. तंजावर शहरात शिवगंगा तलावातून पाणी आणले व शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. गावात विहिरी बांधल्या. तंजावर मध्ये प्रथमच ड्रेनेजची व्यवस्था बनवली. अठराव्या शतकात त्यांनी केलेले हे कार्य पाहून अचंबित व्हायला होतं.
ते त्या वेळेच्या मानाने पुरोगामी होते. स्त्रीशिक्षणाचा त्यांनी प्रसार केला आणि त्यासाठी स्त्री शिक्षिका नियुक्त केल्या. मराठी सोबतच इंग्लिश माध्यमातून शाळा सुरु केल्या. विविध धर्माचा त्यांनी अभ्यास केला. चर्च मशिदींनाही सढळ हाताने देणगी दिली. काशी यात्रे वेळी अनेक घाट आणि देवळे दुरुस्त करून घेतली. त्यांची प्रसिद्धी इंग्लंड च्या राजघराण्यापर्यंत पोहचली होती. १८३२ साली वयाच्या चोपन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.
त्यांचा ३८ वर्षांचा राज्यकारभार तंजावर साठी सुवर्णकाळ मानला जातो.
महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर राहून भोसले घराण्याच्या या वंशजाने मराठी रियासतीचे नांव उंचावण्याचेच काम केले. त्यांनी केलेलं कार्य कोणालाही पटणार नाही इतकं अफाट आहे. जुन्या परंपरा आणि आधुनिकतेचा अचूक मेळ घालणारा हा प्रतिभाशाली राजा ! त्याचं स्मरण ठेवण हे आपलं कर्तव्यच आहे.
हे ही वाचा –
- त्या उठावाचे हिरो होते कोल्हापुरचे महाराज चिमासाहेब.
- छत्रपती शाहू : फक्त महाराज नव्हे तर डॉक्टर पण..!!!
- गेली ४८ वर्षे कोणताच बदल न झालेलं जगातील ‘एकमेव’ पाठ्यपुस्तक !
आजच्या काळात भोसले घराण्याचे सातारकर ,कोल्हापूरकर, नागापूरकर,तांजवरकर यांचे संबंध कसे असतील?
तुमचा content इतकाही दर्जेदार नसतो की लोक तो copy pest करतील.मोबाईलवर scroll करताना 1 second राहीलं तरी तुमचा message येतो.