रागाच्या भरात मोहम्मद रफी गाणं अर्धवट सोडून गेले होते..

हा किस्सा आहे सत्तरच्या दशकाच्या अखेरचा. दिग्दर्शक चेतन आनंद त्या वेळी ‘कुदरत’ हा सिनेमा बनवत होते. राजेश खन्ना, विनोद खन्ना, हेमा मालिनी, प्रिया राजवंश आणि राजकुमार अशी तगडी यात स्टार कास्ट होती. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपुरी आणि कतील सफई यांची होती तर संगीत पंचम तथा राहुल देव बर्मन यांचे होते.

मजरूह यांनी या सिनेमा साठी लिहिलेले ‘हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते’ हे गीत किशोर कुमार आणि बेगम परवीन सुलताना यांच्या स्वरात होते. कतील सफई यांच्या लेखणीतून उतरलेले गाणे होते ‘दुख सुख की हरेक माला कुदरत ही पीरोती है’ पुनर्जन्मावर आधारीत या सिनेमातील हे गाणे सिनेमाचे थीम सॉंग होते.

चेतन आनंद यांना हे गीत रफीने गावे असे वाटत होते.

गाण्यातील भावना रफीच्या स्वरात व्यवस्थित व्यक्त होतील असे म्हणत त्यांनी पंचम कडे रफीच्या स्वराचा हट्टच धरला. त्या वेळी पंचम च्या डोक्यात हे गाणे मराठीतील गुणी गायक चंद्रशेखर गाडगीळ यांच्याकडून गावून घ्यायचे होते. या सिच्युएशन करीता तो स्वर फिट आहे असे त्यांना वाटत होते.

पंचमला रफीच्या स्वराबाबत काही आक्षेप असण्याचे कारण नव्हतेच पण या एवढ्या मोठ्या संस्थेच्या चित्रपटात केवळ एक गाणे गाण्यासाठी रफीला बोलावणे त्यांना प्रशस्त वाटत नव्हते.

पंचम ने हर तऱ्हेने दिग्दर्शक चेतन आनंद यांना पटविण्याचा प्रयत्न केला पण दिग्दर्शक रफीच्या नावावर कायम होते. शेवटी सुवर्ण मध्य असा काढला गेला की आधी हे गाणे चंद्रशेखर गाडगीळ च्या स्वरात रेकॉर्ड करायचे आणि जर दिग्दर्शकाला नाही आवडले तर रफी ला बोलवयाचे.

पंचम ने चंद्रशेखर गाडगीळ ला तशी कल्पना दिली आणि गाण्यात पूर्ण प्राण ओतून गायचा सल्ला दिला. चंद्रशेखर गाडगीळ तोवर फक्त मराठीत गात होते. त्यांना पहिलेच गाणे पंचम कडे गायला मिळत होते हि फार मोठी संधी होती. या रेकोर्डिंग च्या वेळी दस्तूर खुद्द कतील सफई उपस्थित होते. गाडगीळ यांनी अतिशय अप्रतीम रित्या ते गाणे गायले. पंचम देखील खूष झाले. आता प्रश्न होता दिग्दर्शकाला ते गाणे पसंत पडण्याचा! पंचम ने चेतन आनंद याना गाणे ऐकवले.

ते म्हणाले ‘गाना तो ठीक है लेकीन हम लोग रफी से ही गवाते है’. झालं…. हाती आलेली संधी वाया गेली असं गाडगीळ यांना वाटलं. पण करणार काय? पुढच्या आठवड्यात रफी साहेब रेकोर्डिंग ला आले. गाण्याच्या पहिल्या तीन कडव्यांचे रेकोर्डिंग झाले.आता फक्त शेवटचा अंतरा राहिला होता. त्या वेळी टी ब्रेक झाला. चहापानानंतर पुन्हा ते सिंगर रूम मध्ये गेले. तोच त्यांच्या कानावर एक कुजबूज ऐकू आली.

‘ये गाना पूना के दाढी वाले ने भी अच्छा गाया था’

रफी साहेबांना हे ऐकून आश्चर्य वाटले. त्यानी हेडफोन बाजूला काढला आणि एका म्युझिशियन ला विचारले “ क्या ये गाना मुझसे पहले किसी और की आवाज में रेकॉर्ड किया है क्या?” त्याने कोपऱ्यात उभ्या असलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांच्याकडे बोट दाखवीत “इनकी आवाज में रेकॉर्ड किया है’ असे सांगितले.

रफी सिंगर रूम तडक मधून बाहेर आले आणि पंचमदा ला म्हणाले “ पंचमदा , क्यूं किसी नये कलाकार का करीयर मेरे हाथोसे बरबाद करते हो?” आणि ते गाणे अर्धवट सोडून ते तसेच निघून गेले. गाण्याचे अखेरचे कडवे ते गायलेच नाहीत. गायक चंद्रशेखर गाडगीळ यांच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या.

रफी साहेबांचा ग्रेटनेस हा असा होता. खुदा कां नेक बंदा! पण आता पुन्हा पेच निर्माण झाला.

चित्रपटात गाणे घ्यायचे ते कुणाचे? रफीचे की चंद्रशेखर गाडगीळ यांचे? पंचम दा नेच यावर तोडगा काढला. सिनेमात हे गाणे टायटल चालू असताना रफीच्या स्वरात ऐकायला मिळते. पण रेकॉर्ड वर चंद्रशेखर गाडगीळ यांचा स्वर ऐकायला मिळतो.

या मुळे रेडिओवर गाडगीळ यांच्या स्वरातील गीत लोकप्रिय ठरले. गाडगीळ यांच्या संगीतमय कारकिर्दीला मोठा ब्रेक मिळाला. आयुष्यभर ते रफीचे ऋणी राहिले! ‘शापित गंधर्व’ हे चंद्रशेखर गाडगीळ यांनी लिहिलेले पुस्तक वाचकांमध्ये चांगले लोकप्रिय झाले होते.

-धनंजय कुलकर्णी 

-हे ही वाच भिडू 

कधीही दारू न पिणाऱ्या मोहम्मद रफीनं दारूवरचं गाणं अजरामर केलं

मोहम्मद रफीला मक्केत अजान देता यावी म्हणून हज कमिटीनं आपला निर्णय बदलला होता…

 

Leave A Reply

Your email address will not be published.