भारत वर्ल्ड कप जिंकला आणि श्रीकांतचा हनिमून कॅन्सल झाला.

कृष्णम्माचारी श्रीकांत ज्याला क्रिकेट मध्ये सगळे लाडाने चिका म्हणतात.

तो भारताचा स्फोटक सलामी फलंदाज होता. श्रीकांतनेच अख्ख्या जगात वनडेच्या पहिल्या पंधरा षटकात आक्रमक फटकेबाजीचा पायंडा पाडला .सुरवातीच्या ओव्हरस मध्ये फिल्डिंग रेस्ट्रीक्शन चा योग्य फायदा उठवून जबरदस्त टोलेबाजी करणे हा श्रीकांतने शोधलेला फंडा होता. सचिन सेहवाग जयसूर्या असे अनेक महान ओपनर्र्स त्याला याबाबतीत आदर्श मानायचे.

रोखठोक स्वभाव हे श्रीकांतच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य होते तसेच त्याच्या खऱ्या आयुष्याचेही होते. स्वतःवर जोक करणे हे फारच थोड्या जणांना जमते. श्रीकांतने एका कार्यक्रमात सांगितलेला हा गंमतीशीर किस्सा

१९८३सालचा क्रिकेट विश्वकप इंग्लंडमध्ये होता.

क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालची वेस्ट इंडीजची टीम तेव्हा जगभरात सर्वश्रेष्ठ होती. या पूर्वी झालेले दोन वर्ल्ड त्यांनी जिंकलेले होते. विव्ह रिचर्ड, ग्रीनिचसारखे सर्वोत्तम फलंदाज आणि मार्शल,होल्डिंग, गार्नरसारखे जगाला धडकी बसवणारे स्फोटक गोलंदाज यामुळे ही टीम परिपूर्ण होती. याशिवाय इंग्लंड ऑस्ट्रेलिया हे संघ सुद्धा खूप ताकदवान होते. आणि भारत?

भारताच्या तेव्हाच्या क्रिकेट टीमला कोणी सिरीयस घेत नव्हते. याचे कारण पण होते. इंग्लंडसारख्या वेगवान खेळपट्टीवर भारताचे बलस्थान स्पिनर्स यांचा उपयोग नव्हता. कपिल सोडला तर कोण फास्टर आपल्याकडे नव्हता. शिवाय इंग्लिश वातावरणात वेगवान गोलंदाजीला वनडे मध्ये कसे खेळायचे हेच भारतीय बॅटसमनना माहित नव्हते.

भारतीय संघाचा वर्ल्डकपसाठीचा सराव चालू होता .पण यापूर्वीच्या वर्ल्डकप मध्ये झालेले तसे पहिल्या राउंडमध्ये आपण परत येणार याची तज्ञ विश्लेषक, फॅन्स एवढच नाही तर खुद्द खेळाडूंनाही खात्री होती.

फक्त एक माणूस सोडून. त्याचं नाव कपिल देव.

के.श्रीकांतच नुकतंच लग्न झालं होत. एके दिवशी त्याला महान फलंदाज सुनील गावस्करचा फोन आला. ” आम्ही वर्ल्ड कप झाल्यावर अमेरिकेला सुट्टीसाठी जाणार आहे. तुला यायचे आहे का?” श्रीकांतला सुद्धा बायकोला घेऊन कुठेतरी हनिमून ला जायचे होते तो तयार झाला. रवी शास्त्री, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील वगैरे सगळे या हॉलिडेसाठी रेडी झाले..

वर्ल्ड कप संपला की परस्पर लंडनहून न्यूयॉर्कची फ्लाईट पकडायची असा त्यांचा प्लॅन होता. मुंबई ते न्यूयॉर्क प्रवास यात मध्ये लंडनला स्टेओव्हरच्या दरम्यान वर्ल्ड कप खेळणे.

इंग्लंड मध्ये गेल्यावर पहिलीच मॅच वेस्ट इंडीज बरोबर होती. भारतीय खेळाडू मॅचपूर्वी टीम मिटिंग साठी जमले. तेव्हा कपिल देव म्हणाला,

“हम जितने के लिये खेलेंगे”

सगळ्यांना वाटलं कप्तान पागल हो चुका है. या पूर्वीच्या दोन वर्ल्ड कपमध्ये मिळून फक्त एकच सामना जिंकलेली टीम आता डायरेक्ट वेस्ट इंडीजला हरवणार ? सगळे कपिल देव वर हसत होते. पण कपिल देव सिरीयस होता. खेळाडू सुद्धा सिरीयस झाले. माईटी वेस्ट इंडिजला हरवून पहिली मॅच भारताने विजयी सुरवात केली. जगातलं हे मोठ आश्चर्य ठरलं.

खरं तर या सामन्यानंतर भारतीयांना आपण ही जिंकू शकतो हा आत्मविश्वास आला. कपिल देवच्या एकट्याच्या जिद्दीमुळे अख्खी टीम ताजीतवानी झाली आणि त्यांनी भल्याभल्या दमदार टीमला हरवून वर्ल्ड कप जिंकला.

श्रीकांत म्हणतो,

“हमने वर्ल्ड कप जिते है तो वो सिर्फ कपिल के जिद के वजह से.”

भारतीय टीम वर्ल्ड कप उचलल्यावर भारतात आली. मुंबई, दिल्ली जिथे जातील तिथे त्यांचं जोरदार स्वागत झालं. अख्ख्या देशभर दिवाळी साजरी करण्यात आली. खेळाडूंना काही त्यांच्या प्लॅन प्रमाणे अमेरिकेला सुट्टीला जाता आलं नाही, काढलेली तिकीट वाया गेली. श्रीकांतचा हनिमून कॅन्सल झाला पण त्याचं दुख्खः कोणाला नव्हत, कारण ते ऑलरेडी जग जिंकले होते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.