नक्षलवाद्यांपासून दाऊदपर्यंत अनेकजण “बिहारमेड AK47” चे फॅन आहेत.

बिहार आणि उत्तरप्रदेश मधलं पूर्वांचल. अख्ख्या भारताला आपल्या क्राईम स्टोरीनी आश्चर्यचकित करणारा हा प्रदेश. असं म्हणतात इथे घराघरात एक तरी कट्टा असतो.(कट्टा म्हणजे गावठी बंदुक नाही तर तुम्ही म्हणाल आमच्या घराला सुद्धा कट्टा आहे)  तर या सगळ्या कट्टा, बंदुकी यांची गंगोत्री माहिती आहे का?

बिहार मधला मुंगेर जिल्हा.

भारतातला सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक. गंगा नदीच्या सुपीक खोऱ्याचा प्रदेश. बिहारची राजधानी पटनापासून अवघ्या अडीचशे किलोमीटरवर असून ही इथे विकासाची कोणतीही लक्षणे नाहीत. इथल्या छोट्या छोट्या गावांमध्ये एकच उद्योग चालतो बंदुका बनवण्याचा!!

गावठी कट्ट्यापासून ते रायफलपर्यंत सगळ्या बंदुका इथे हाताने बनवल्या जातात. 

september hindustan photography september probhited traditional election 3360164a e1de 11e5 a1fb 86e627e3731c

आधी इथला इतिहास आणि भूगोल जाणून घेऊ.

या उद्योगाची सुरवात झाली अठराव्या शतकात. त्याकाळात बंगालचा नवाब होता मीर कासीम अली. मीर कासीम ला कोणीतरी सांगितले मुंगेर की मिट्टी में गोला बारूद है. खरंच होतं ते. इथल्या मातीमध्ये पोटशियम नायट्रेटचे प्रमाण भरपूर आहे. हाच मुंगेरसाठी शाप ठरला.

नवाब मीर कासीम अलीने मुंगेरच्या मातीतली आग बाहेर काढायचा विडा उचलला. आधी आपली राजधानी मुंगेरमध्ये शिफ्ट केली. त्याचा सेनापती होता गुर्गीन खान. या खानाने अफगाणिस्तानवरून कारागीर आणले आणि मुंगेर मध्ये दारूगोळा बनवण्याची पहिली फॅक्ट्री उभी राहिली.

तिथून सुरु झाला मुंगेरवासियांचा जीवघेणा प्रवास.

इथल्या लोकांच्या रक्तात बंदुक बनवण्याची कला भिनली. इंग्रजांच्या काळात ती भरपूर बहरली. भारतातले ते बंदुका बनवणारे सर्वोत्तम कारागीर होते. स्वातंत्र्यानंतर या कारखान्यांना लायसन्ससुद्धा देण्यात आलं. चीनच्या युद्धात भारतीय सैन्याने या कारखान्यात बनवलेल्या गन्स वापरल्या.

सगळी कडे मेड इन मुंगेर शॉटगन्सची चर्चा होती. 

पण १९६९ साली वेगवेगळ्या ठिकाणी असलेले सदतीस कारखाने सुरक्षिततेसाठी एकाच भागात हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला. पुढे आणिबाणीच्या काळात या कारखान्यांना टाळेबंदी आणली गेली. अनेक कारागीर ज्यांना फक्त गन बनवणे एवढेच माहित होत ते देशोधडीला लागले. पण याचा अर्थ बंदुका बनवणे थांबले नाही.

खेडोपाड्यात गंगाकिनारी चोरीछुपे बंदुका बनतच राहिल्या. या बेकायदेशीर बंदुका अतिशय स्वस्त किंमतीला मिळत होत्या यामुळे त्यांची मागणी आणखीन वाढली. MADE IN USA , MADE IN ITALY या बंदुकाच्या ड्यूप्लीकेट बनवल्या जाऊ लागल्या. आश्चर्य म्हणजे या एके ४७ सारख्या बंदुका ओरिजिनलपेक्षा उच्च दर्जाच्या होत्या.

गावठी कट्टा अवघ्या पाचशे रुपयांना तर ७.५ एमएम पिस्तुल पंचवीस हजारांना मिळू लागली.  

मुंगेर मध्ये कायदेशीर बंदुका बनवणारे कारखाने आणीबाणी नंतर परत सुरु झाले पण नफ्या अभावी त्यांना ते चालवणे मुश्कील होत. पण बेकायदेशीर कारखाने पूर्ण नफ्यामध्ये चालत होते. दुर्दैवाने या बेकायदेशीरपणे बनणाऱ्या बंदुका बेकायदेशीर कामासाठीच वापरल्या जाऊ लागल्या.

बिहार आणि पूर्वांचल मधला छोटा मोठा गुंड देखील मेड इन मुंगेर बंदुका घेऊन फिरतो. नक्षलवाद्यापासून दाउद इब्राहीम सारख्या मुंबईच्या अंडरवर्ल्ड डॉन पर्यंत सगळ्यांना या बंदुकांचा सप्लाय होत होता. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रत्येक क्रूर गुन्ह्यात मुंगेरच्या बंदुकाचा हात असतोच.

इतकंच काय तर अगदी नेपाळ बांगलादेश मार्गे परदेशातही या बंदुका तस्करी करून निर्यात होतात.

हे सगळ सुरु असताना प्रशासन काय करतंय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल? याच उत्तर अगदी सोपं आहे.

राजकारणी आणि पोलिसांचा वरदहस्त असल्यामुळेच या बेकायदेशीर बंदुका बनतात आणि राजरोसपणे विकल्याही जातात. इथली लहानमुले देखील खेळणी असल्याप्रमाणे बंदुका हाताळतात. स्वतंत्र भारतातले सगळे कायदे संविधान इथे लागू नाही. कधी कधी नावापुरती कार्रवाई होते पण कारखाने कधीच कायमचे बंद होत नाहीत. निवडणुका जवळ आल्या तर इथल्या बंदुकांची मागणी वाढते.

ही बंदुक बनवण्याची कारागिरी जिथून आली त्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर असंच एक गाव आहे जिथे बंदुकांचा बाजार भरतो. गावाचं नाव आहे दर्रा आदम खेल . 

darra adam khel 212

खैबर खिंड ही भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखली जायची याच खैबर खिंडीत दर्रा आदम खेल वसलं आहे. त्याला  जगातलं सर्वात विस्फोटक गाव म्हणून ओळखलं जात. कारण काय तर इथे राजरोसपणे बंदुका बनतात आणि अगदी बुट्टीत भाजी विकल्याप्रमाणे रॉकेट लॉन्चर पासून एके ४७ विकल्याही जातात. ओसामाच्या तालिबान आणि लष्करे तैयब्बाला याच गावान हत्यार पुरवलंय.

दर्राचं आणि मुंगेरच अठराव्या शतकापासूनच नातं आहे. वेळीच मुंगेरला योग्य वाटेवर आणल नाही तर अख्खा देशाचा दार फाडून अफगाणिस्तान बनवण्याची स्फोटक ताकद या गावात आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.