हिंदुत्ववादाचे पोस्टरबॉय असणारे तोगडिया आजकाल मोदी सरकारलाच अडचणीत आणत आहेत…

हिंदूत्वाचा प्रखर चेहरा, विश्व हिंदू परिषदेचे सर्वेसर्वा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ट मित्र ही प्रवीण तोगडिया यांची ओळख. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषदेला रामराम ठोकला आहे, भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा त्यांचा विचार अजूनही कायम असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची त्यांची मैत्री मात्र चांगलीच फिस्कटली आहे.

तोगडिया राम मंदिर, मथुरा मंदिर आणि पुलवामा हल्ला अशा भाजपच्या प्रचारातल्या मुद्द्यांवरून त्यांनी थेट भाजपलाच लक्ष्य केलं आहे. त्यांचे ही टीकांचे बाण नक्की काय आहेत, हे जाणून घेऊयात.

सगळ्यात आधी प्रवीण तोगडिया यांची माहिती घेऊ-

वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या २२ व्या वर्षीच त्यांची मार्गदर्शक पदी निवड झाली. पुढे ते विश्व हिंदू परिषदेशी जोडले गेले, अशोक सिंघल यांनी निवृत्ती घेतल्यानंतर तोगडिया यांच्याकडे विहिंपच्या अध्यक्षपदाची धुरा आली.

२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलींनंतर ते हिंदुत्वाबाबत आणखी परखडपणे भूमिका घेऊ लागले. त्यांच्या वादग्रस्त आणि भडकाऊ विधानांमुळं ते अनेकदा वादात सापडले. २००३ मध्ये त्यांनी घेतलेल्या त्रिशूळ वाटपाच्या कार्यक्रमाची सगळ्या देशात चर्चा झाली होती.

मोदी आणि तोगडिया यांची मैत्री

हिंदुत्वाविषयी परखड भूमिका घेणाऱ्या या दोन्ही नेत्यांची मैत्री तशी फार जुनी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत असताना या दोघांची मैत्री जमली. असं म्हणतात की, मोदी आणि तोगडिया एकाच गाडीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जायचे. मात्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आलं.

पुढे २००७ पर्यंत त्यांचे संबंध अधिकच ताणले गेले. कधीकाळी विहिंपचे सर्वेसर्वा असणारे तोगडिया यांनी २०१८ मध्ये विहिंपच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली.

आता येऊयात तोगडिया यांच्या भाजपला अडचणीत आणणाऱ्या वक्तव्यांकडे-

‘मोदींनी कधी चहा विकलाच नाही’

२०१९ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, ‘माझ्या आणि मोदींच्या ४३ वर्षांच्या मैत्रीत ते मला कधीच चहा विकताना दिसले नाहीत. मुळात त्यांनी कधीच चहा विकला नाही, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ही चहाविक्रेत्याची इमेज त्यांनी तयार केली आहे.’

‘पाकिस्तानी एजंट्सचे फोन हॅक केले असते, तर पुलवामा घडलं नसतं’

पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी झालेल्या स्फोटासाठी ३०० किलो आरडीएक्स कुठून आलं, या विषयावरून देशातला वाद चांगलाच तापला होता. देशात मध्यंतरी पेगॅसिसमुळं वाद उफाळून आला, तेव्हा त्यात प्रवीण तोगडियांचे फोन टॅप केल्याची माहिती पुढे आली. त्यावरून तोगडिया यांनी मोदींवर टीका केली होती. ते म्हणाले होते, ‘माझ्यासारख्या देशभक्तांचे फोन टॅप करण्याऐवजी, देशात बसलेल्या पाकिस्तानी एजंट्सचे फोन टॅप केले असते, तर पुलवामासारखी दुर्दैवी घटना घडलीच नसती.’

‘सत्तेत बसलेल्या लोकांनी कामं करावी, घोषणाबाजी नाही’

सध्या देशात मथुरेतल्या मशिदीवरुन वाद सुरू आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी नुकतंच मथुरेतल्या मशिदीबाबद वादग्रस्त विधान केलं होतं. मथुरेत मशिदीच्या जागी मंदिर बांधण्यात येणार असा त्यांचा रोख होता. त्यावरुन उत्तर प्रदेशमधलं राजकारण चांगलंच तापलं. तोगडिया यांनी, ‘सत्तेत असणाऱ्यांना घोषणाबाजी करण्याचा काहीच अधिकार नाही, त्यांनी काम करुन दाखवावं,’ अशा कानपिचक्या दिल्या.

थोडक्यात काय, तर भाजप आणि मोदी अडचणीत येतील असं वक्तव्य करण्याची एकही संधी तोगडिया सोडत नाहीयेत. कधीकाळी भाजपचे जवळचे मित्र असणारे तोगडिया यांच्यात आणि भाजपमध्ये आता मोठी दरी पडली आहे, हे जवळपास स्पष्टच झालं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.