नाटु नाटु गाण्यामुळे चर्चा होणाऱ्या या पिक्चरचा इतिहास योद्धा क्रांतिकारकांचा आहे

सध्या सोशल मीडियावर एक गाणं तुफान राडा घालतयं. आपल्या धमाकेदार म्युझिकसोबत त्या गाण्यातल्या पायाच्या अवघड डान्सस्टेपने सगळ्यांनाचं थिरकायला भाग पाडलंय. रिल्सस्टार तर त्या गाण्याच्या आणि डान्सच्या जोरदार लाईक्स आणि कमेंट्स मिळतायेत. ते गाणं म्हणजे ‘नाटू नाटु’ आता हा साऊथ इंडियन मुव्ही आहे,  पण त्यांचं हिंदी व्हर्जन असलेलं ‘नाचो नाचो’ ला सुद्धा तशीच प्रसिद्धी मिळतीये.

गाणं आहे ‘RRR’ चित्रपटातलं. ‘बाहुबली’ ज्यांनी काढलाय त्यांनीच हा पिक्चर काढलाय.  ९ डिसेंबरला या पिक्चरचा ट्रेलर रिलीज झाला. जो काही वेळातच जबरदस्त व्हायरल झाला. सोबतच तुफान व्हायरल होणारं हे गाणं, त्यामुळे पिक्चर सुद्धा तितकाच जबराट असणार असं सगळ्यांनाच वाटायला लागलयं.

म्हणजे चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच आपण अंदाज लावू शकतो की, राजामौली यांनी खऱ्या खुऱ्या घटनेवर आधारित असलेल्या या पिक्चरच्या टेक्निकल गोष्टींवर सुद्धा एकदम भारी काम केलंय.

आता येऊया या पिक्चरच्या खऱ्या खुऱ्या स्टोरीवर, आपल्या सगळ्यांनाच माहितेय कि, आपल्या भारताचा भूतकाळ नेहमीच ऐतिहासिक आणि गौरवशाली राहिलाय. अश्याच भारताच्या ब्रिटिशकालीन इतिहासातील ही  घटना आहे, अल्लुरी सीताराम राजू’ आणि कोमाराम भीम या रिअल लाईफ हिरोंची. आता बऱ्याच जणांना त्यांची नाव सुद्धा माहित नसतील. कारण भारताच्या इतिहासात सुद्धा त्यांच्या नावाचा फारसा उल्लेख नाहीये. त्यामुळेच राजामौली यांनी ५ वर्षांपूर्वीचं या दोघांचा हा इतिहास सगळ्यांसमोर आणायचं ठरवलं. 

तर यातल्या ‘अल्लुरी सीताराम राजू’ यांचा जन्म १८५७ सालचा विशाखापट्टणम भागातला. वयाच्या १८ व्या वर्षीचं ते संन्यासी झाले. यादरम्यान त्यांनी देशातील मुंबई, वडोदरा, बनारस, ऋषिकेश अश्या अनेक शहरांचा प्रवास केला. त्यावेळी देशातल्या बऱ्याच देशातील सर्व तरुणांप्रमाणे अल्लुरी सीताराम राजू यांच्यावरही महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता.

१९२० च्या सुमारास अल्लुरी सीताराम राजू यांनी आदिवासींना दारू सोडण्याचा आणि पंचायतीमध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला. अर्थातच त्यावेळी देशात इंग्रजांच्या अत्याचाराची सत्ता होती. अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनावर त्याचा खोल परिणाम झाला. यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसेचे विचार सोडून त्यांनी धनयुष्यबाण हातात घेऊन इंग्रजांविरुद्ध लढायला सुरुवात केली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना अल्लुरी सीताराम राजू यांनासुद्धा इंग्रजांच्या जाचाला समोर जावं लागलं. पण तरीही इंग्रजांच्या जाचक धोरणांसमोर ते कधीही झुकले नाही. १९२४ मध्ये ब्रिटीश सैनिकांनी क्रांतिकारक अल्लुरी यांना झाडाला बांधून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. अल्लुरी सीताराम राजू  यांनी देशासाठी जे केले ते विसरणं अवघड आहे.

या  स्वतंत्रलढ्यातले दुसरे क्रांतिकारक म्हणजे कोमाराम भीम. त्यांचा जन्म १९०१ मध्ये हैद्राबादच्या संकेपल्ली इथल. ते गोंड समाजाचे होते. कोमाराम भीमांच्या जीवनात एकच टार्गेट होत, गुलामगिरीच्या साखळीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. भीम फक्त १९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना निजाम सैनिकांनी मारले. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या भीम यांना ‘निजामाच्या राजवटीला धडा शिकवायचा होता.  याच  दरम्यान त्यांच्यावर तेलंगणाचे वीर क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांचा खूप प्रभाव पडला.

भीमाने इंग्रजांच्या पाठीराख्या निजामांना हैदराबादमधून हाकलून देण्याची योजना आखली आणि निजामाच्या राजवटीविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले. या दरम्यान भीम यांनी हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी ‘असफ जही घराण्या’ विरुद्ध बंड केले. ‘निजामाच्या राजवटीने’ कोमाराम भीमाला पकडण्यासाठी ३०० सैनिकांची फौज पाठवली, पण भीम यांनी आपल्या शौर्याने निजाम सैनिकांचा फडशा पाडला .

यादरम्यान त्यांनी निजामाच्या न्यायालयीन आदेश, कायदे आणि त्याच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान दिले. १९२८ ते १९४० या काळात त्यांनी हैदराबादच्या निजाम सरकारच्या विरोधात ‘गछापामार अभियान’ सुरू ठेवलं. या काळात भीमाने शौर्याने युद्ध केले आणि जंगलातील प्रत्येक लढाई जिंकली. भीमाच्या शौर्याने निजामाचे सैनिक चळाचळा कापायचे.  अखेर निजाम आणि इंग्रजांविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत लढणाऱ्या या योद्ध्याचा मृत्यू २७ ऑक्टोबर १९४० रोजी झाला.

अश्या या दोन क्रांतिकारकांचा स्वतंत्रलढा फक्त त्या त्या भागापुरताचं मर्यादित होता, जो आता राजामौली पिक्चरच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आणणार आहेत. या  पिक्चरमध्ये राम चरण यांनी स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ची भूमिका साकारली आहे तर साऊथचा अॅक्शन स्टार ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात आलिया भट आणि अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या ७ जानेवारी २०२२ ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.