बाहुबलीच्या डायरेक्टरचा नवा हिरो “कुमराम भीम” नक्की कोण होता?

ज्यूनियर NTR ने साकार केलेला कुमराम भीम नेमका कोण होता ह्याची चर्चा बाहुबलीची डायरेक्टर राजमौली यांच्या RRR चा ट्रिजर आल्यापासून सुरु झालीय.

आज त्याचा ट्रेलर रिलीज केला गेलाय तो कुमराम भीम ह्यांच्या जयंतीनिमित्त.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व अभिनेते NT रामाराव ह्यांचा नातू ज्यूनियर NT रामाराव हा रोल करतोय म्हणून त्याचे फॅन्सही उत्साहात आहेत.

RRR म्हणजे राईज, रोअर, रिवोल्ट – म्हणजे उठा, गर्जना करा आणि बंड उभारा !

तेलुगू भाषेत ह्या चित्रपटाचं नाव रौद्रम, रणम, रुधिरम – (राग, लढाई आणि रक्त) असं आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश आणि निजामाच्या विरुद्ध लढा उभारणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा आलेख ह्यात दिला गेलाय.

नामांकित ब्रिटिश कलाकारांसोबत आलिया भट आणि अजय देवगण हेही चित्रपटाचा भाग असल्यानं लोकांना ह्याची उत्सुकता आहेच, पण हा चित्रपट ज्याच्यावर बनवलाय तो माणूस नक्की आहे कोण?

कुमराम भीम ह्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1901 (सालावरती वाद आहेत) निझामाच्या ताब्यातील हैद्राबाद संस्थानात असणाऱ्या जंगलांत एका गोंड आदिवासी परिवारात झाला. ह्या सगळ्या भागाला दंडकारण्य म्हणून ओळखलं जातं. (आता त्यांच्या भागातील जिल्ह्यालाच कुमराम भीम यांचं नाव देण्यात आलं आहे.

आधी संपूर्ण मध्य भारतात गोंड राज्याचं शासन होतं असं म्हणतात. महाराष्ट्रातही पूर्व विदर्भ आणि यवतमाळ व वर्ध्यात अनेक गोंड आदिवासी बांधव आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपुरात त्यांची राजधानी होती तसेच साम्राज्याच्या रक्षणासाठी सीमांवर विविध ठिकाणी त्यांनी ३६ किल्ल्यांची उभारणी केली होती अशी इतिहासात नोंद आढळते.

ह्यामुळेच त्या जागेला छत्तीसगड नाव पडल्याचे सांगितलं जातं.

कुमराम भीम यांचं कोणतंही शिक्षण झालं नव्हतं. त्यांचे वडील हे आदिवासींच्या हक्कांसाठी ब्रिटिशांविरोधात आणि निजामाच्या सैन्याशी लढत असत. कुमराम भीम केवळ १५ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना वनाधिकाऱ्यांनी ठार केलं होतं. त्यामुळे कुमराम भीम यांना आपल्या कुटुंबासोबत सुदरपूर गावात स्थलांतर करावं लागलं.

असफझही घराण्याची तेव्हा हैद्राबाद संस्थानांवर सत्ता होती. उर्वरित भारतात ब्रिटिशांचे शासन असूनही इथं आंध्र प्रदेश आणि मराठवाडा भागात निजामाची आणि त्याच्या वतनदारी दहशत होती. निजामाची माणसे आदिवासींकडून राहण्यासाठी करवसुली करत असत. जमीनदार लोकही आदिवासींचे मोठ्या प्रमाणात शोषण करत.

ह्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि निजामाविरुद्ध बंड पुकारले. निजामाचे कोणतेही नियम, कायदे आणि व्यवस्था मानायला त्यांनी नकार दिला आणि जंगलावर आदिवासींचेच राज्य राहील ह्या भूमिकेचा पुकारा केला.

बाबी झारी ह्या पर्वतरांगेच्या भागात त्यांनी स्वतःचे शासन उभारले.

“जल, जंगल, जमीन” ह्या निसर्गाच्या संसाधनांवर आदिवांसींचा हक्क असल्याचा पुकारा त्यांनी केला. आजही आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या नागरिकांमध्ये देशभर ही घोषणा लोकप्रिय आहे. जुलुमजबरदस्ती करणाऱ्यांविरोधात शस्त्र घेऊन लढण्याची प्रेरणा त्यांनी ह्या आदिवासींना दिली आणि ते स्वतः बंदूक घेऊन ह्या लढाईत उतरले. त्यामुळेच त्यांना पुली म्हणजेच वाघ ह्या नावानेही ओळखले जाते.

ह्या लढाईत त्यांना निझामाच्या  सामना करताना त्यांना 27 ऑक्टोंबरला रोजी वीरमरण आले.

त्यांच्या स्मृतीमध्ये आंध्र प्रदेश सरकारने अनेक प्रकल्प तसेच स्मृतिस्थळे बनवण्यास सुरुवात केली आहे. अल्लुरी सीताराम राजू ह्या आदिवासींसाठी लढणाऱ्या दुसऱ्या एका स्वातंत्र्यसैनिकांबरोबर RRR चित्रपटात त्याचीही गाथा मंडळी जाणार आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.