ओरिसाची भाषा ही बोलू न शकणारे नवीन पटनाईक पाचव्यांदा तिथले मुख्यमंत्री बनले आहेत.

गेल्या अनेक वर्षांनी पहिल्यांदा भारतात एक पूर्ण बहुमतातील सरकार परत आलंय. स्वर्गीय राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांना देखील जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलंय. त्यांना मिळालेलं बहुमत पाशवी म्हणावं एवढ प्रचंड आहे. त्यांच्या या वादळी तडाख्यात फक्त कॉंग्रेसचं नाही तर वेगवेगळ्या राज्यात ताकदवान बनलेले प्रादेशिक पक्ष देखील वाहून गेलेत.

फक्त काहीचं पक्ष आहेत ज्यांनी या वादळात ही तग धरला. त्यापैकीच एक म्हणजे ओडीसाचे बिजू जनता दल.

एकेकाळी जवाहरलाल नेहरू यांचे लाडके नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजू पटनायक यांच्या नावाने सुरु झालेला हा पक्ष. बिजू पटनाईक हे स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटीश रॉयल एयर फोर्स मध्ये पायलट होते. पण आतून कॉंग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्याचे मदतनीस. यामुळे त्यांना दोन वर्षाची अटक सुद्धा झाली होती.

बिजू पटनाईक विमान उडवण्याचे स्कील वादातीत होते. पुढे स्वातंत्र्यानंतर नेहरूनी त्यांना एक अवघड राजनैतिक जबाबदारी दिली. इंडोनेशियाच्या पंतप्रधानांना डच सैन्यापासून वाचवून एका छोट्या विमानातून भारतात आणायचा पराक्रम त्यांनी करून दाखवला. शिवाय काश्मीरला भारतात सामील करण्याच्या युद्धातही बिजू पटनाईक यांनी मोठी कामगिरी केली होती.

म्हणूनच नेहरूंनी या फ्लॅमबॉयन्ट तरुणाला राजकारणात आणलं. ओरिसा राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. राज्याचे मुख्यमत्री बनले पण नेहरूंच्या नंतर कॉंग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या इंदिरा गांधींशी त्यांच पटलं नाही. कॉंग्रेस मधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढला. पुढे अनेक वर्ष फक्त ओरिसा नाही तर राष्ट्रीय राजकारणामध्येही त्यांनी स्वतःची छाप पाडली. ओरिसाचा भूमीपुत्र म्हणून ते जनतेच्या गळ्यातले ताईत बनले होते.

बिजू पटनाईक यांचा १९९७ साली मृत्यू झाला. तेव्हा ते जनता दलात होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण याची शोधाशोध सुरु झाली. बिजू यांची तिन्ही मुले राजकारणापासून खूप दूर होती. बिजू यानी त्यांना मुद्दामहून दूर ठेवलं होतं. पण त्यांचा वारसा सांभाळणार कोणी तरी हवं म्हणून शेवटी त्यांचा सर्वात धाकटा मुलगा नवीन पटनाईक यांना ओढून राजकारणात आणलं गेलं.

नवीन पटनाईक फक्त राजकारणचं नाही तर ओरिसापासूनही हजारो किलोमीटर दूर होते. त्यांचं शिक्षणही ओरिसाच्या बाहेरच झालं होतं. आधी डून स्कूल मग दिल्लीतल्या करोडीमल कॉलेज मध्ये ते शिकले. आपल्या राज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या उडिया भाषेचा त्यांना गंधही नव्हता. आजही त्यांना पंजाबी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच भाषा उत्तम बोलता येतात पण उडिया येत नाही.

असं असूनही नवीन पटनाईक हे ओरिसाच्या राजकारणात आले. टिकले. त्यांनी वडिलांच्या नावाने बिजू जनता दल हा पक्ष सुरु केला. अटलजींच्या एनडीए मध्ये सामील झाले. २००० साली वर्षानुवर्षे कॉंग्रेसचा गड असलेला ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री बनले.  या गोष्टीला १९ वर्षे होतील. अजूनही नवीन पटनाईक ओरिसावर राज्य करत आहेत. वाजपेयींच्या नंतर त्यांनी एनडीएची साथ सोडली. तिसऱ्या आघाडीत सामील झाले.

आज ओरिसाची भाषा न बोलू शकणाऱ्या नवीन बाबूनी विक्रमी पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्यासाठी शपथ घेतली. काय आहे त्यांचा करिश्मा??

मागच्या वेळची मोदी लाट आणि यावेळची मोदी त्सुनामी त्यांनी सहज थोपवून धरली आहे. त्यांच्याप्रमाणेच आपल्या वडिलांच्या नावाने पक्ष काढलेल्या जगनमोहन रेड्डीना हे जमलेलं आहे. हे दोघेही खरे तर घराणेशाहीचे प्रतिक, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे ही आरोप खूप झालेत, त्यांच्या पक्षाची जडणघडण कॉंग्रेसच्याच विचारांची आहे. पण तरीही या दोघांच्या विरुद्ध मोदींनी केरळ, प.बंगाल प्रमाणे आक्रमक प्रचार केला नाही.

ओरिसा हे अतिशय मागासलेले राज्य आहे. स्वातंत्र्याच्या काळापासून विकासाची गंगा तिथे पोहचलीचं नाही. नवीन पटनाईक यांच्या विकासाभिमुख चेहऱ्यावर तिथल्या जनतेचा विश्वास आहे. अतिशय साधे दिसणारे, शांत स्वभावाचे नवीनबाबू ओरिया जनतेला गरीबांचे तारणहार वाटतात. त्यांनी स्त्रियांना ३३% आरक्षण, शेतकऱ्यासाठी आणलेल्या वेगवेगळ्या योजना, वडिलांच्याप्रमाणे प्रशासनावर मजबूत पकड, यामुळे त्यांच्यावरचा विश्वास कमी होताना दिसत नाही आहे.

सगळ्यात महत्वाच त्यांनी या वेळी भाजपा विरुद्ध निवडणूक लढवली पण ममता दीदीप्रमाणे भाजपाशी आक्रमकपणे भिडले नाहीत. त्यांनी आपल्या प्रचारातून सरळ संदेश दिला, की केंद्रात कोणतेही सरकार असेल तर त्याच्याशी आम्ही जुळवून घेणारं आहोत. आम्हाला फक्त आमच्या राज्याचा विकास झाल्याशी मतलब आहे.

ज्याप्रमाणे नवीन पटनाईक यांनी शांतपणे व सुसूत्र नियोजनाने आपल्या राज्यात आलेल्या फणी वादळाशी लढा दिला त्याच प्रमाणे मोदींच्या त्सुनामीलाही ते शांत प सामोरे गेले.

देशाचा मूड आधीच ओळखला असल्यामुळे नवीन पटनाईक यांनी लोकसभा निवडणुकीपेक्षा त्याचवेळी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडेच लक्ष दिले. थोडक्यात सांगायचे म्हणजे मोदींचं विनाकारण त्यांनी नाव काढलं नाही या बदल्यात मोदीनीही त्यांच्या विरुद्ध नरमाईची भूमिका घेतली. यामुळे भाजपाच्या ओरिसा लोकसभेच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली. पण ते विधानसभा निवडणुकीत काही कमाल दाखवू शकले नाहीत. कॉंग्रेसचे तर नामोनिशान ओरिसा मधून संपून गेले.

ओरिसाच्या जनतेने राज्यात नवीनबाबू देशात नरेंद्रबाबू हा संदेश दिलाय.

आज नवीन पटनाईक सहज ओरिसाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. आधीच नरेंद्र मोदींच्या त्यांना शुभेच्छा मिळाल्या होत्या. पण याचा अर्थ असा नाही की बिजू जनता दलासाठी सगळे काही सहज सोपे आहे. मोदी अमित शहा या महत्वाकांक्षी जोडगोळीने पूर्ण देशभर भाजपाचा भगवा झेंडा पोहचवायचं ठरवलंय. यावेळी त्यांनी ओरिसामध्ये चंचू प्रवेश मिळवलाय. त्यांच्या आक्रमक राजकारणाशी शांत स्वभावाच्या नवीन बाबूंना लढता येते का? काळच याचे उत्तर देईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.