म्हणून मोदी विरोधकांना देखील “नमो अगेन” पटतं.
सध्या देशात कुठल्याही नेत्याला नसतील एवढे विरोधक आणि चाहते निर्माण केले आहेत ते फक्त मोदींनी. मोदी पहिले असे राजकारणी आहेत ज्यांनी आपल्या देशाच्या नेत्याची सोशल मिडीयावरची लोकप्रियता जगातल्या सगळ्यात महत्वाच्या नेत्यांच्या बरोबरीने असू शकते हे सिध्द करून दाखवलं. कॉंग्रेस आजवर कधीही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू शकली नाही. मोदींनी पहिल्यांदा २०१४ मध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून दाखवली आणि त्यात यशसुद्धा मिळवून दाखवलं.
कम्युनिस्ट ज्योती बसूंना आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जे जमलं नाही ते विकासाच्या मुद्द्यावर कौतुक मोदींच्या वाट्याला आलं. करुणानिधी, एन टी रामाराव, बिजू पटनाईक, चंद्राबाबू नायडू यांनासुद्धा जमला नाही तो करिश्मा मोदींनी गुजरातमध्ये करून दाखवला.
मोदी हे एकमेव नेते आहेत ज्यांचं यश हे बीजेपीचं मानलं गेलं नाही. ते त्यांचं वैयक्तिक होतं. आजही वैयक्तिक आहे. मोदी संघाचे आहेत पण संघ मोदींना आदेश देऊ शकतो असं चित्र मोदींनी कधीच उभं होऊ दिलं नाही. वाजपेयी, अडवाणी किंवा इतर बीजेपीच्या नेत्यांना नागपूरला संघाच्या मुख्यालयात जेवढ्या चकरा माराव्या लागल्या तेवढ्या मोदींनी कधीच मारल्या नाही. बीजेपीचं सरकार मोदी चालवतात संघ नाही एवढा ठळक संदेश देण्यात मोदी प्रचंड यशस्वी झाले आहेत. मोदींमुळे प्रभावी वक्ते असूनही आणि आक्रमकता असूनही संघसंचालक मोहन भागवत अगदीच फिके पडले आहेत असं चित्र निर्माण झालंय.
पहिल्यांदा बीजेपीच्या नेत्यापुढे सरसंघचालक अगदीच मवाळ आणि बॅंकफूटवर गेल्यासारखे दिसतात. हा चमत्कार मिडियावाले जाणूनबुजून नजरेआड करताहेत का यात मोदी द्वेषाची कावीळ आहे हे लक्षात येत नाही. पण मोदींची संघाला व्यवस्थित एका कोपऱ्यात ठेवण्याची कला अद्भुत आहे.
राममंदिरासारखा मुद्दा शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाने हायजॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण मोदींनी कधीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली नाही. अगदी राममंदिर बांधू असं ठोस आश्वासन त्यांनी अजूनही दिलं नाही. हे कमालीचं स्वतंत्र धोरण आहे. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पाच पंचवीस खासदार ठेवलेले आहेत. बाकी विश्वहिंदू परिषद, हिंदू महासभा आणि संघातले काही लोक हा मुद्दा काढत असतात. त्यावर बोलत असतात. पण मोदी कधीही मंदिराच्या मुद्द्यावर ठोस बोलत नाहीत. ते नेहमी सरकारने काय कामगिरी केली यावर बोलत असतात. यामुळे मोदी आजही संघ आणि त्याच्या छोट्या मोठ्या संघटनांपेक्षा एक वेगळं वलय प्राप्त करून आहेत.
मोदींची मिडीयाने फार दखल न घेतलेली अजून एक गोष्ट म्हणजे गांधीजी. मोदींचं सरकार आल्यावर एकीकडे नथुराम गोडसेचं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. पण मोदी ज्या देशात जातात त्या देशात असलेल्या गांधीजींच्या पुतळ्याला आवर्जून भेट देतात. डोकं टेकवून येतात. मोदी मंदिरात जाऊन येतात या गोष्टीला मिडिया मोठा करतो. पण मोदी गांधीजींच्या प्रत्येक पुतळ्यासमोर नतमस्तक होतात हे मिडिया बघत नाही. मोदींच्या या सूचक गांधीप्रेमामुळे नथुराम गोडसेसारखे विषय हवेत विरले आहेत. कारण पंतप्रधान जिथे दर आठवड्याला गांधींच्या पायावर डोकं टेकवतात तिथे त्यांच्या खुन्याची मंदिरं बांधून काय मिळणार?
ही विसंगती पक्षाला आणि पक्षाच्या भोवती असणाऱ्या संघटनांना आणखी अडचणीत आणणारी होती. त्यामुळे गेले काही महिने सगळ्या संघटना आणी नेते मोदींच्या इशाऱ्यावर चालताना दिसताहेत. हे कुणीच प्रामाणिकपणे कबूल करायला तयार नाही की कॉंग्रेसच्या काळात संघ जेवढा आक्रमक होता तेवढा या चार वर्षात अजिबात नाही. नाहीतर मोदींची प्रतिमा आणि लोकप्रियता एवढी होती की संघ आणि विश्व हिंदू परिषद २०१४ ला सहज राममंदिर बांधू शकली असती. पण तसा प्रयत्न काय तशी चर्चा सुद्धा करण्याचं धाडस कुणी केलं नाही. हा मोदी आणि अमित शहा यांचा दरारा आहे हे मान्य करावं लागेल.
मोदींच्या यशात अमित शहा यांचा वाटा आहे हे मान्य करावं लागेल. आजवर बीजेपीमध्ये जोड्या नव्हत्या असं नाही. पण त्या नेहमी जाहीरपणे मैत्री आणि आतून स्पर्धा अशा जोड्या होत्या. वाजपेयी अडवाणी किंवा गडकरी मुंढे अशा जोड्या असुद्या. बीजेपी काय इतर कुठल्याही पक्षात मोदी आणि अमित शहा यांच्याएवढी केमिस्ट्री शोधूनही सापडणार नाही. या दोघाचा एकमेकांवर असलेला विश्वास हे सगळ्यात मोठं यश आहे. केवळ एवढ्याच गोष्टीमुळे त्यांनी एवढ्या शिस्तबद्ध आणि थिंक tank वगैरे साठी प्रसिध्द असलेला पक्ष आणी त्याच्या मातृसंघटना अगदी हतबल करून ठेवल्या आहेत.
पक्षातल्या कुठल्याच नेत्याला सोडा मंत्र्याला सुद्धा अस्तित्व नसलेलं हे पहिलं सरकार आहे.
सरकारमधलं दोन नंबरचं पद असतं गृहमंत्रीपद. पण अडवाणी गृहमंत्री असतानाची तुलना केली तर राजनाथसिंह यांचं गृहमंत्रीपद कसं आहे याची जाणीव आपोआप होईल. परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचं काम केवळ परदेशातून भारतीयांची सुटका करणे किंवा त्यांना मदत करणे एवढच आहे. बरं याबद्दल जनतेला तक्रार नाही कारण विदेशाच्या कुठल्याही गोष्टीबाबत मोदींचा निर्णय अंतिम आहे हे देशाला माहित आहे. नोटबंदी अर्थमंत्री जेटली यांनी नाही तर मोदींनी केली हे देशाला माहित आहे. जनधन योजना असो किंवा सिलेंडर असो यात मंत्र्यांचा संबंध नाही. ते मोदी करतात. खादी असो किंवा पेट्रोलचा निर्णय असो मोदींचा निर्णय असतो. तसे होर्डींग्ज असतात. तशा पेपरमध्ये जाहिराती असतात. या देशात जे काही घडतं ते पंतप्रधान मोदी घडवतात यावर जनतेला ठाम विश्वास आहे. मंत्रीमंडळ नावाला असावं म्हणून आहे. पण यानिमित्ताने मोदींनी दाखवून दिलं की सगळे होयबा गोळा करून आपली टर्म पूर्ण करता येते.
याआधी कुठल्याही पंतप्रधानाला एवढ्या हुकमतीने कारभार करता आला नाही.
बरं मोदींनी इतर पक्षाचा पाठिंबा घेतला नाही असं नाही. रामविलास पासवान सारखे होयबा पण त्यांच्यासोबत आहेत. नितीशकुमार यांच्यासारखे नैतीकतेच्या गप्पा मारणारे नेतेही मोदींशी जुळवून घेतात. रामदास आठवले यांच्याविषयी बोलायची गरज नाही. मोदींनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली काय तर मोठ्या आवाजात नैतिक गप्पा मारणारे सगळे एका फटक्यात शांत केले. संघ शांत. तोगडिया गायब. उमा भारती अदृश्य. सुब्रमण्यम स्वामी खासदारकीसाठी चिकटून तर बसलेत पण आरडा ओरडा केल्याचा अभिनय करतात.
शिवसेनेसारखे पक्ष धरलं तर चावतंय सारखी स्वतःची अवस्था करून बसलेत. एवढच काय राहुल गांधी सुद्धा देव दर्शन करायला लागले. मोदींच्या प्रचाराची एवढी ताकद आहे की राहुल गांधीना आपण हिंदू आहोत याची जाणीव करून देण्यासाठी मंदिरात डोकं आपटत फिरावं लागलं.
एकूण मोदी या देशातले एकमेव यशस्वी राजकीय नेते आहेत ज्यांनी विरोधक तर ठेवलेच नाही. स्वतःच्या पक्षात सुद्धा कुणाला आवाज करायची संधी दिली नाही.
मोदींच्या या चार वर्षात बीजेपी जगातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला. पण संघाची किती वाढ झाली? किती ठिकाणी आपल्याला संघाच्या शाखा भरताना दिसताहेत? संघाला या गोष्टीचं आत्मपरीक्षण करायची गरज वाटणार नाही.
कारण एकेकाळी आपल्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक संपर्क आणि विचारपूस यावर अवलंबून असलेली ही संघटना आता सोशल मिडियाच्या आभासी जगात अडकून पडेल की काय अशी परिस्थिती आहे. कारण सोशल मिडीयावर प्रत्युत्तर देणे ही संघाची पद्धत कधीच नव्हती. ट्रोल आर्मी हे संघाचं बलस्थान नाही. संघ नेहमी जनसंपर्क आणि बैठक या गोष्टीवर भर देतो. पण मोदींनी गेली चार वर्ष मन की बातवर भर दिलाय. मंथन वगैरे नाही. पत्रकार परिषद तर मुळीच नाही. फक्त मी बोलणार.
मोदींसारखं सरकार या देशात कुणीच चालवू शकलं नाही. नेहरुंना सरदार पटेल, राजाजी, आंबेडकर, चिंतामणराव देशमुख अशा नेत्यांना तोंड द्यावं लागायचं. इंदिराजीच्या काळात जयप्रकाश नारायण, मोरारजी, यशवंतराव होते. राजीव गांधींच्या काळात व्हीपी सिंग होते. मनमोहनसिंग यांच्या काळात जयराम रमेश, प्रणव मुखर्जी यांच्या सारख्यांची यादी होती. आज कोण आहे? गेली चार वर्ष मोदींना साधा प्रतिप्रश्न करू शकणारा नेता समोर आला नाही. जे बाहेरून आले होते ते बाहेर गेले. पण संघसंस्कारात वाढलेला एकही नेता किंवा मंत्री साधं मंदिराचं काय झालं? किंवा आपलं काश्मिरात महबुबाशी युती केलीच पाहिजे का? असं विचारायला आला नाही. मोदींना अडवण्याची किंवा जाब विचारण्याची हिंमत या देशात कुणातच नाही हे त्यांनी केंव्हाच सिध्द केलंय.
राहुल गांधी कितीही बोलत असले तरी किती विरोधी पक्ष त्यांना पाठिंबा देताहेत हे आपण पाहतोय. विरोधी पक्षात एकजूट व्हायला २०२४ उजाडेल अशी आज परिस्थिती आहे. आता प्रश्न उरलाय तो बिजेपीत मोदींना पर्याय कोण? तर तो या जन्मात होऊ शकत नाही. मोदी आता बीजेपीच्या सगळ्या नेत्यांपेक्षा दोनशे पटीने पुढे आहेत. कॉंग्रेस एकवेळ पंतप्रधानपदाचा उमेदवार बदलू शकेल. मायावतींना प्रतीआव्हान उभं राहू शकेल. नितीश कुमारांना पर्याय येईल. चन्द्रशेखर राव यांच्यासारखी माणसं घरातली माणसं निवडतील.
पण मोदींना बीजेपीकडे पर्याय आहे का?
गडकरींचं नाव बीजेपीच्या आतल्या गोटातून हळूच सोडून देण्यात आलं. पण गडकरी एकतर स्वतःतरी वादग्रस्त विधान करतात किंवा नेमक्या वेळी काहीतरी प्रकरण त्यांचा पाठलाग करतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे. पण फडणवीस हे विसरतात की सूर्याकडे डोळे मोठे करून बघण्याची सुद्धा ताकद नसते. विरोधकांची काय आणि स्वकीयांची काय. हे बीजेपी, संघ यांच्याबाबतीत पहिल्यांदा घडतंय. पण यालाच मोदींचा करिश्मा म्हणतात. बीजेपी देशाला प्रश्न विचारतेय पर्याय काय? पण आजतरी बीजेपीकडेसुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाही.
गाय, हिंदुत्व, शहरांचे नाव बदलणे, ट्रोल करणे, मन्दिर मुद्द्यावर बोलणे या सगळ्या गोष्टींसाठी मोदी पक्ष आणि संघ वापरून घेतात. पण स्वतःचा विकासाचा चेहरा कायम ठेवतात. हेच त्यांच्या प्रतिमेचं यश आहे. मोदींनी काय केलंय असं विचारणार्यांना हे खूप मोठं उत्तर आहे. मोदींनी असं काही केलंय की विरोधक काय स्वतः त्यांचा पक्ष पण त्यांना पर्याय देऊ शकत नाही.
हे ही वाचा.
- मोदींना वाट्टेल ते बोलणाऱ्या ट्रम्प तात्यांना भारतीय मुलाचे “नादखुळे” पत्र.
- ‘चौधरी चहावाले’ ज्यांची नरेंद्र मोदींनी गेल्या महिनाभरात दोन वेळा आठवण काढलीये !
- सर छोटू राम, ज्यांच्या ६४ फुट उंच पुतळ्याचं अनावरण नरेंद्र मोदी करणार आहेत !
Very nice sr