अखेर ७७ वर्षांचा तिढा सुटला, ॲन फ्रॅंकच्या मरणामागे कुणाचा हात होता समोर आलंय

हे प्रकरण हिटलरशी संबंधित आहे. हिटलर ज्यू लोकांच्या हात धुवून मागे लागला होता हे प्रत्येकालाच माहित आहे. त्याच दरम्यान एक मुलगी होती जिचं कुटुंब तब्बल दोन वर्ष एका गुपित खोलीत लपून राहीलं होतं. उद्देश होता फक्त जिवंत राहण्याचा. कारण ते ज्यू होते आणि हिटलर त्यांच्याच रक्ताचा तहानलेला होता. १५ वर्षांची ही मुलगी होती ॲन फ्रॅंक.

पण या मुलीचा शेवट काही चांगला झाला नाही. ती हिटलच्या तावडीत सापडलीच आणि नंतर काय झालं असेल याचा अंदाज लगेच येतो. ७७ वर्ष झाली आहेत या घटनेला. पण एक प्रश्न या वर्षांमध्ये सगळ्यांना सतावत होता की, नेमकं ॲन फ्रॅंकचा पत्ता जर्मन पोलिसांना दिला कोणी? याचंच उत्तर सापडण्यासाठी ६ वर्षांआधी एक समिती गठित केल्या गेली. ज्यांनी शोधून काढलंय की फ्रॅंक कुटुंबाला धोका देणारी ती व्यक्ती कोण होती!

जिच्यासाठी हे सर्व करण्यात आलं ती ॲन फ्रॅंक नेमकं कोण?

ॲन फ्रॅंक ही एक ज्यू मुलगी होती. हिटलर जेव्हा ज्यूंच्या मुळावर उठला होता त्यावेळी ती, तीचं कुटुंब आणि अजून चार जण ॲनम्स्टरडॅमच्या एका घरामध्ये सिक्रेट खोलीत लपलेले होते. या घरात एक कपाट होतं जे हलवलं की खोलीत जाण्याचा मार्ग दिसायचा. जीव वाचवण्यासाठी दिवसभर या काळोख्या खोलीमध्ये ॲन फ्रॅंकला राहावं लागत होतं. दिवसातून फक्त एकदा काही मिनिटांसाठी गच्चीवर गेली की तेव्हाच तिला मोकळं आकाश बघता यायचं.   

ॲनला तिच्या तेराव्या जन्मदिवसाला एक लाल आणि पांढऱ्या रंगाची डायरी मिळाली होती. जिचं नाव तिने ‘किटी’ असं ठेवलं होतं. हिटलरच्या सैनिकांसोबत लपंडाव खेळायच्या काळात हीच डायरी तिची मैत्रीण होती. ॲन दिवसभरात आजूबाजूला जे बघत होती ते अगदी निरागसपणे तिने लिहिलं होतं. कारण नेमकं तिच्या सोबत काय घडतंय हे कळायचं तिचं वयच नव्हतं. पण तिची ही डायरी वाचताना वाचकाला मात्र तेव्हाची परिस्थिती किती भयानक होती हे आपोआप जाणवतं.

ॲन फ्रॅंकचं कुटुंब १९४४ ला जर्मन पोलिसांच्या हाती लागलं जेव्हा त्यांनी त्या घरावर छापा मारला. नाझींनी संपूर्ण फ्रँक कुटुंबाला ऑशविट्झमधील एका छावणीत पाठवलं. ॲन आणि तिची बहीण मार्गो यांना नंतर बर्गन-बेल्सन कॅम्पमध्ये ट्रांसफर केलं, जिथे त्या दोघींचाही १९४५ मध्ये मृत्यू झाला. ओटो फ्रैंक हे ॲनचे वडील एकटे व्यक्ती होते जे जिवंत राहू शकले. त्यांना नंतर जेव्हा ॲनची डायरी मिळाली तेव्हा त्यांना कळलं की, ॲनला लेखिका व्हायचं होतं.

मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी ती डायरी छापली. डच भाषेत ही डायरी लिहिली होती पण ती पुस्तक स्वरूपात इतकी गाजली की जवळपास ७० भाषांमध्ये ती आता लोकांना वाचायला उपलब्ध आहे. ‘डायरी ऑफ़ अ यंग गर्ल’ या नावाने ती प्रसिद्ध आहे. ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक वाचलं त्यांना एक प्रश्न नेहमी पडत राहिला की,ॲनचं कुटुंब कुठे लपलंय याचा नेमका पत्ता कसा लागला असेल? कोण आहे तिचा दोषी?

 नेहमीच अनुत्तरित राहिलेला हा प्रश्न. मात्र आता ७७ वर्षांनी त्याचं उत्तर समोर आलं आहे.

या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं उद्देश्य डोळ्यांसमोर ठेऊन सहा वर्षांपूर्वी एक समिती नेमल्या गेली. या टीममध्ये यूएस एफबीआयचे निवृत्त एजंट व्हिन्सेंट पॅनकॉक आणि सुमारे २० इतिहासकार, गुन्हे तज्ञ आणि डेटा तज्ञांचा समावेश होता. या अभ्यासगटाने सगळ्या साखळ्या जोडण्याचा प्रयत्न केला. ॲनच्या कुटुंबाशी संबंधित सगळ्या लोकांचा तपास घेऊन एक-एक कडी जोडत जास्त शंका कुणावर येतेय ते समोर आणण्याचा प्रत्यत्न केला. 

यातून पुढे आली एक व्यक्ती ज्याचं नाव आहे अरनॉल्ड वैन डेन बर्ग. अरनॉल्ड देखील ज्यू होता आणि ज्यू कौन्सिलचा संस्थापक सदस्य होता. ज्यू कौन्सिल हा एक प्रकारचा  प्रशासकीय गट होता ज्याचा वापर नाझींनी त्यांची धोरणं अंमलात आणण्यासाठी आणि ज्यू वस्तीमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी केला होता. अभ्यासगटाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, तपासातून समोर आलेल्या ३२ नावांपैकी अरनॉल्ड मुख्य संशयित होता. 

ज्यू असूनही अरनॉल्डने फ्रॅंक परिवासोबत धोका का केला असावा? हा प्रश्न यातून पुढे येतो. याचं उत्तर देताना अभ्यासगटातील तज्ज्ञांनी सांगितलं की, अरनॉल्डने हे त्याचं कुटुंब वाचवण्यासाठी केलं असावं. कारण नाझी लोक सगळ्याच ज्यूंच्या मागे होते. तेव्हा स्वतःच्या कुटुंबासाठी त्याने नाझींसोबत डील केली असावी आणि त्यामुळेच फ्रॅंक कुटुंबाबद्दल सांगितलं असावं.

या संशोधनाचा उद्देश फक्त इतिहासातील एक रहस्य पुढे आणणं  इतकाच होता, कुणावर आरोप करणं हा नाही, असं स्पष्टीकरण या अभ्यासगटाने दिलं आहे. पण तब्बल ७७ वर्षांनी एखादा प्रश्न सुटावा हे पहिल्यांदाच घडलं असावं, हे मात्र नक्की.  

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.