आणि रागाच्या भरात हिटलर आयफेल टॉवर पाडायला निघाला होता.

नुकतंच मिसुरड फुटलेल्या पोरांना प्रेमाचे डोहाळे लागतात तेव्हा त्यांच्या मदतीला येतो तो आयफेल टॉवर…

आता ते कसा म्हणाल ? तर या कोवळ्या वयात पोरांच्या पॅन्टचा खिसा रिकामा असतो. आणि काही खुळखुळ करत असलं तरी लैत लै चिल्लर असतात. नाही म्हणायला प्रेमाने ओतप्रोत भरलेलं असं त्यांचं दिल असतं. पण आपल्या गर्लफ्रेंडला काहीतरी गिफ्ट द्यावं अशी त्यांची मनोमनी इच्छा असते.

मग चिल्लर मधून काय मिळेल या विचारात किचेन असणार आयफेल टॉवर मदतीला येतो. आणि मग प्रेम शेवटाला घेऊन जाण्याच्या आणाभाका या किचेन असलेल्या आयफेल टॉवरच्या साक्षीने घेतल्या जातात. प्रतिकृती तर प्रतिकृती पण आहे ते प्रेमाचं आणि प्रेमात येणाऱ्या कष्टप्रद मार्गाचं प्रतीक. 

 खऱ्या आयफेलला उभं करताना पण लोकांच्या नाकी नऊ आलं होतं. प्रेमाचं प्रतीक असलेल्या या खऱ्या आयफेल टॉवरची गोष्ट. 

तर फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे फ्रान्समध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९९ या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ. या घटनाक्रमाने फ्रान्स व उर्वरित युरोपच्या इतिहासास कलाटणी दिली. अनेक शतके फ्रान्सवर राज्य केलेली अनियंत्रित राजेशाही राज्यक्रांतीच्या तीनच वर्षांमध्ये उलथून पडली. कट्टर डाव्या विचारसरणीच्या राजकीय गटांच्या, रस्त्यावर उतरलेल्या लोकशक्तीच्या व शेतकऱ्यांच्या एकत्रित रेट्यामुळे फ्रेंच समाजावरचा सरंजामशाहीवादी, धर्मशास्त्रप्रणीत मूल्यव्यवस्थेचा पगडा ओसरून समाजात मोठे पुनरुत्थान घडून आले. 

याच घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याने अभिवादन म्हणून तिकडच्या स्थानिकांनी एखादी वास्तू उभारण्याचा थाट मांडला. 

अनेक इंजिनियर, डिझायनर्स यांनी आपापल्या कल्पना तिकडच्या स्थानिकांसमोर मांडल्या पण त्यातली कल्पना कोणालाच आवडेना, शेवटी आयफेल नावाच्या व्यक्तीचं डिजाईन सिलेक्ट झालं. आणि पुढं त्याचंच नाव या टॉवरला देण्यात आलं. परंतु त्याच्या डिजाईनलाही काहींनी विरोध केला होता.

त्याकाळात हवेचा दाब, रेडिओ ट्रान्समिशनसाठी एखाद्या टॉवरची गरज होती, म्हणून सुद्धा या टॉवरची बांधणी केली होती. तसेच काही काळासाठीच तो बांधण्यात येणार होता. त्यानंतर तो पाडण्यात येणार होता पण मात्र ते राहिले आणि तीच वास्तू जगातील ७ आश्चर्यांमध्ये गणली जाऊ लागली.

आयफेल यांची नुसती संकल्पना होती. त्या संकल्पनेला आकार देण्यासाठी त्यांचा सहकारी मॉरिस कोचलीन हा कामी आला, तो स्थापत्यशास्त्रज्ञ होता.

हा टॉवर १८८७ – ८९ या काळात ‘पॅरिस एक्जीबिशन’ या जागतिक प्रदर्शनासाठी उभारला होता. १८८७ साली या दुकडीनं नियोजित जागतिक पॅरिस प्रदर्शनात आकर्षणाचं केंद्र आणि प्रदर्शनाचं प्रवेशद्वार असलेला आपल्या टाॅवरचा आराखडा सादर केला. प्रारंभी आयफेल व्यक्तीश: मुळात या आराखड्याविषयी प्रचंड साशंक होता. 

त्यानं यावर अधिक चिंतन आणि मंथन व्हावं असं सुचवत कोचलिन आणि नाॅगीर यांनी कंपनीचे मुख्य स्थापत्यरचनाकार ‘स्टिफन साॅवेस्त्रे’ यांच्याशी सल्लामसलत करावं असं सुचवलं. स्टिफननं सजावटीच्या कमानी टाकत पहिल्या मजल्यावर काचेचा तंबू तयार करून या आराखड्याच्या सौंदर्यात भर टाकली आणि या प्रदर्शनात सर्वांचं लक्ष्य वेधून घेत सर्वोत्कृष्ट आराखडा म्हणून स्थान पटकवलं.

आता जी काही रचनाकृती दिसत होती ती बघून आयफेलचाही आत्मविश्वास वाढला अन् त्याच्या कंपनीनं मुख्य जागतिक प्रदर्शनात सहभागी व्हायचं ठरवलं आणि त्यांच्या या पोलादी बांधकामाचा आराखडा इथंही विजेता ठरला.

अर्थात स्पर्धा आणि तिचे मापदंड यात यश मिळालं म्हणजे त्यांना लोकमान्यता मिळाली असं नव्हे.  पॅरिसकरांनी शहराच्या मधोमध उभा रहाणाऱ्या या लोखंडी सांगाड्याला प्रचंड विरोध केला. आंदोलनं झाली, याचिका दाखल केल्या गेल्या.

अनेकांच्या मते हे धुड त्यांच्या लाडक्या शहराच्या सौंदर्याला गालबोट लावणारं होतं.

सर्व विरोधाला न जुमानता दोन वर्षांनी या टाॅवरचं बांधकाम पुर्णत्वाला गेलं आणि ३१ मार्च १८८९ साली आयफेल टाॅवरचं औपचारिक उद्घाटन झालं. त्याची किंमत १०,००,००० डॉलरपेक्षाही जास्त होती. घडीव लोखंडी जाळीकाम असलेला हा टॉवर सापेक्षत: वजनाने अंदाजे ७,३०० टन असा हलकाच आहे.  सुमारे ३०० कामगारांनी अतिशुद्ध लोखंडाचे १८ हजार ३८ तुकडे वापरून आयफेल टॉवर बांधला. २५ लाख रिबेट्सने हे तुकडे जोडून टॉवर बांधण्यात आला आहे.

जेव्हा हा टाॅवर बांधला गेला तेव्हा तो प्रायोगिक तत्वावर वीस वर्षे मुदतीपुरता राहिल असं ठरलं होतं. स्वत: आयफेल मात्र या टाॅवरच्या भविष्यातील शास्रोक्त वापराच्या शक्यतेमुळं त्याच्या दिर्घायुबद्दल आश्वस्त होता. 

पहिल्या महायुद्धात या टॉवरचा वापर एक महत्त्वाचे सैनिकी-निरीक्षण केंद्र म्हणून करण्यात आला होता.

१९२५ साली फ्रेंच सरकार आयफेल टॉवर पाडणार अशी वदंता होती. या बातमीचा फायदा उठवत व्हिक्टर लस्टिंग नावाच्या भामट्याने दोन वेगवेगळ्या कंपन्यांना आयफेल टॉवर चक्क भंगारात विकून हातोहात फसवलं होतं !

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा फ्रेंच लोकांनी टॉवरच्या लिफ्टच्या केबल कापून टाकल्या होत्या. हेतू हा, की हिटलर येईल तेव्हा त्याला पायऱ्या चढत टॉवरवर जावं लागेल. हिटलर आला. पण तो आयफेल टॉवरवर काही गेला नाही. म्हणून फ्रेंच लोकं गमतीने म्हणतात, की हिटलरने पॅरिस जिंकलं. पण त्याला आयफेल टॉवर काही जिंकता आला नाही!

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी दोस्त राष्ट्रे फ्रान्सची जर्मनीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी येणार अशी खात्री झाल्यावर हिटलरने त्याचा फ्रान्समधला सेनापती डिट्रिश फॉन कोलटॉइट्त्स याला फ्रान्समधून माघार घेण्यापूर्वी आयफेल टॉवरसकट पॅरिस उद्ध्वस्त करण्याची आज्ञा दिली होती; पण डिट्रिशने ती आज्ञा पाळली नाही आणि आयफेल टॉवर बचावला.

आणि आज तो तुमच्या आमच्या सारख्यांना निदान निदान किचेनच्या रूपात तरी मिळतोय. 

हे ही वाच भिडू :

Webtitle : Hitler was about to attack on Paris Eifel tower

 

Leave A Reply

Your email address will not be published.