हिटलरच्या ‘एंजल ऑफ डेथ’ या चार पाचजणींनी तब्बल लाखभर ज्यू संपवले होते..

हिटलरने आपल्या कारकिर्दीत प्रचंड अनन्वित अत्याचार केले, काही कत्तली केल्या हे आपण सर्रास वाचतो ऐकतो. पण त्याकाळात ज्यू लोकांसोबत काय झाले, त्याविषयी आपल्याला अजूनही म्हणावी तशी कल्पना नाही.

इंजेक्शन देऊन लोकांना मारण्यात प्रचंड वेळ, मनुष्यशक्ती आणि पैसे वाया जात असल्यामुळे जर्मन लोकांनी एक भयंकर उपाय शोधून काढला, गॅस चेंबर.

यामध्ये एकाच वेळी दहा-पंधरा हजार लोकांना टाकण्यात येई आणि पाच मिनिटात दहा हजार लोक मृत्युमुखी पडत. जे काम करायला जर्मन लोकांना दहा-पंधरा दिवस लागत असे, तेच काम इथे पाच मिनिटात उरकले जाई. आपण विचारही करू शकणार नाहीत एवढे भयंकर आणि क्रूर अत्याचार या छळछावण्यांमधून सुरू होते.

पण या सर्वांमध्ये चार-पाच स्त्रिया अशा होत्या ज्यांनी तब्बल लाखभर ज्यू लोकांना संपवले. त्यांच्या क्रूरतेचे पराक्रम फक्त ऐकले तरीसुद्धा काळजाचा थरकाप उडतो.

जुआना बोरमन नावाची एक स्त्री.

पैसे कमावण्याच्या उद्देशाने ती जर्मन लोकांनी उभारलेल्या छळछावणीत गेली. तिच्याकडे एका कुत्र्याची जबाबदारी स्वीकारली दिली होती. तो कुत्रा लांडग्यासारखा पाठलाग करून समोरच्या व्यक्तीचे प्राण घेई. जुआना दिवसभर तो कुत्रा घेऊन फिरत असे. ज्या स्त्रीला मारायचे असेल तिच्यावर कुत्र्याला सोडून देई आणि ती बाजूला बसून सगळा खेळ पाहत असे. त्या देहाचे तुकडे तुकडे होताना पाहून ती प्रचंड आनंदित होई.

दुसरी एक स्त्री होती मारीआ मांडेल.

विक्षिप्त स्त्री. तिला शास्त्रीय संगीताची चांगली जाण होती. पण तिची हौस पुरवून घेण्याची पद्धत फार वेगळी. जेव्हा कुणाला त्या छळछावणीत फाशी दिल्या जाई, गोळ्या घातल्या जाई तेव्हा ती कैदी स्त्रियांना जोरजोरात गाणे गायला आणि वाद्य वाजवायला लावत असे. आनंदाने नाचत असे. कुणाच्याही मृत्यूने तिला आनंद होई. केवळ 33 वर्ष जगलेल्या मारीआची दहशत जबरदस्त होती.

डॉ. हेरटा ओबेरहेझुर अशीच एक विचित्र मानसिकतेची डॉक्टर.

लहान मुलांना इंजेक्शन देऊन मारण्यात तिला कोण आनंद होत असे! तीन-पाच मिनिटात ही कोवळी मुले विषारी इंजेक्शन मुळे मृत पावत. या मुलांना इंजेक्शन मुळे नेमका कसा त्रास होतो, हे तासनतास पाहत बसणे, तिचा छंद होता. परपीडेतून तिला असुरी आनंद मिळत असे.

यांच्यापेक्षा भयंकर दहशत असलेली स्त्री म्हणजे इल्स कोच.

‘बुचेनवाल्ड’ मधल्या छळछावणीत इल्स घोड्यावर बसून आली हे समजल्या समजल्या लोक अक्षरशः घाबरून सैरावैरा पळत. छळछावणीप्रमुख कार्ल कोचची ती बायको. तिच्याकडे एक चाबूक असायचा. छावणीतून फिरत असताना जी स्त्री तिला आवडेल तिला बाजूला घेत असे आणि चाबकाचे फटके मारून तिला संपवून टाकत असे. कित्येक स्त्रिया इल्सने आपल्या चाबकानेच मारल्या होत्या.

या सर्वांमध्ये इरमा ग्रीसचा नंबर सर्वात वरचा होता.

विशीमध्येच तिच्यावर तीस हजार पोलिश आणि हंगेरीअन ज्यू लोकांना संपवण्याची जबाबदारी दिलेली होती. सकाळी झोपेतून उठल्यापासून ती सर्व लोकांना मारण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत असे. भुकेले ठेवणे, अनन्वित छळ, शारीरिक आणि लैंगिक अत्याचार यांमध्ये ती दिवस दिवस गुंतून जाई. हिची आवड म्हणजे मानवी कातडीपासून तयार केलेले टेबल लॅम्प.. एकदा एका स्त्रीच्या अंगावर काढलेला सुंदर टॅटू तिला आवडला. त्याच रात्री जेवढ्या स्त्रियांच्या अंगावर टॅटू आहे त्या सर्वांची कातडी सोलून काढली आणि घरातल्या लॅम्पवर लावण्यासाठी तिने प्रयोगशाळेत रवाना केली.

या स्त्रिया अतिशय विक्षिप्त आणि विचित्र होत्या.कुणाला सुंदर स्त्रियांची कातडी जपून ठेवायचा शौक होता. तर कुणी टॅटू काढलेल्या स्त्रिया शोधून, त्यांना मारून त्या टॅटू असलेल्या कातड्याची फ्रेम आपल्या घरात लावण्याची आवड होती. तर कुणाला या मानवी कातड्यांपासून तयार केलेले पुस्तक कव्हर आवडत असे.

केवळ चार पाच स्त्रियांनी मिळून 60-70 हजार ज्यू आणि पोलिश लोकांना संपवले. किती ती क्रूरता? त्या छावण्यांमध्ये घडलेल्या अत्याचारी हत्याकांडामध्ये या चार स्त्रियांचे योगदान एक टक्का सुद्धा नाही, यावरून तुम्ही बाकीच्या गोष्टीची केवळ कल्पनाच करू शकता..

एवढे होऊन सुद्धा बाहेरच्या जगात या छळछावण्या म्हणजे केवळ एक तुरुंग आहेत, एवढेच माहीत होते. तब्बल चार-पाच महिने रोज हा तांडव या छळछावण्यांमधून सुरू होता.
आजही या छळछावण्या ज्यू आणि पोलिश लोकांवर केलेल्या अमानवी अत्याचारांची साक्ष देत आहेत..
एवढा भयंकर द्वेष निर्माण करणारा समाज पुन्हा एकदा या पृथ्वीवर कधीही तयार होऊ नये, हीच सद्भावना..

  • भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.