राणेंनी धमकी दिली, “बेस्टचा प्रश्न सोडवा नाही तर पाचव्या मजल्यावरून फेकून देईन “

मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली तो काळ. जिथं जाईल तिथं तिथं शिवसेनेचा नाद दुमदुमत होता. बाळासाहेबांच्या जादुई करिष्म्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यातले हजारो तरुण या संघटनेशी जोडले जात होते. त्यांच्या सभा प्रचंड गाजायच्या.

चेंबूर मधल्या सुभाषनगरचे हाफ चड्डी घालणारी काही मुलं मुंबईत फिरून त्यांच्या प्रत्येक सभेला हजर व्हायची. त्यांच्या भागात इतर भाषिकांची संख्या जास्त असल्यामुळे अपमान आणि अवहेलना त्यांच्यासाठी रोजची  होती. या खदखदणाऱ्या असंतोषातून हि मुलं शिवसेनेशी जोडली गेली.

त्याकाळी शिवसेनेचे सदस्यत्व घ्यायचे तर वयाची १८ वर्षे पूर्ण पाहिजे असा नियम होता पण त्या पोरांपैकी एक जण फक्त पंधरा वर्षांचा होता. पण तरी त्याने फॉर्ममध्ये खोटं वय लिहीत तो बाळासाहेबांचा शिवसैनिक बनला.

त्याच नाव नारायण तातू राणे 

स.गो.बर्वे यांच्या प्रचारातुन नारायण राणे या वादळाची सुरवात झाली. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचं नाव पुढं असायचं. शिवसेना प्रमुखांच्या सभेला नारायण राणे आणि हनुमंत परब हि दुकली  एकच हार घेऊन ती बाळासाहेबांच्या गळ्यात घालायची.

त्यातूनच त्यांचे या दुकलीकडे लक्ष वेधलं गेलं. कडवट कार्यकर्ते म्हणून त्यांनी या दोघांची नोंद घेतली.

संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे त्यांची बारकाईने नजर असायची. रस्त्यावर लढाई करणाऱ्या या कर्तबगार मावळ्याला बाळासाहेबांनी १९८५ साली मुंबई महानगरपालिकेचं तिकीट दिलं. भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय कार्यकर्ते डॉ. मजुमदार हे चेंबूरमधून उभे होते. नारायण राणे यांनी रात्रीचा दिवस करून मेहनत केली ऐन मुजुमदार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा पराभव केला.

मुंबई महानगरपालिकेत जायंट किलर म्हणून त्यांची धडाक्यात एंट्री झाली. 

शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ तेव्हा मुंबई महानगरपालिकेचे महापौर होते. नगरसेवकांच्या कामगिरीकडे खुद्द बाळासाहेबांचं व्यक्तिशः लक्ष असायचं. पुढच्या दोन वर्षात नारायण राणे बेस्टच्या समितीवर सदस्य झाले. परेलमधून निवडून आलेले विठ्ठल चव्हाण यांच्याकडे बेस्ट समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते .

दोन वर्षांनी नवीन अध्यक्ष निवडायची वेळ आली तेव्हा सभागृह नेते चर्चेला बसले. शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी नारायण राणे यांचं नाव बेस्टचा भावी अध्यक्ष म्हणून पुढं केलं.

खरं तर अनेक जेष्ठ नेते असताना राणेंच्या सारख्या कमी अनुभव असणाऱ्या नगरसेवकाला थेट बेस्टचा अध्यक्ष करणे अनेकांना बुचकाळ्यात टाकणारे होते. राणेंची इमेज आदेशावरून रस्त्यावर लढणारा कट्टर शिवसैनिक अशी होती. त्यांच्या सारख्या साध्या कार्यकर्त्याला हे पद झेपेल का याबद्दल अनेकांना साशंकता होती. खुद्द बाळासाहेब याच्या विरोधात होते. ते गंमतीने भुजबळांना म्हणाले देखील,

“अरे नारायणला चेअरमन बनवून बेस्ट फोडायचा विचार आहे काय तुमचा ?”

पण छगन भुजबळ आपल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं

“हा चांगला मुलगा आहे. आपल्या पक्षाच्या बैठकीला सुद्धा अभ्यास करून येतो. तो चांगलं काम करील. तुम्ही बेस्टची धुरा त्याच्याकडे सोपवा.”

यातूनच नारायण राणेंना बेस्टचा चेअरमन बनवण्यात आलं.

१९८८-८९ पासून सलग तीन वर्षे बेस्टचा अध्यक्षपदी राहण्याचा विक्रम नारायण राणे यांनी केला. बेस्ट म्हणजे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीची रक्तवाहिनी. राणेंना या पदाचा महत्व ठाऊक होतं. बाळासाहेबांनी अनेक जेष्ठ नगरसेवकांना डावलून हे पद आपल्याला दिले याची जाणीव व त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवायची जबाबदारी त्यांच्यावर होती.

या काळात त्यांनी प्रचंड काम करून लोकप्रियता मिळवली. बेस्टच्या चेअरमनपदाला त्यांच्यामुळे ग्लॅमर प्राप्त झालं. बेस्टचा कारभार जवळपास दिड हजार कोटीला नेऊन पोहचवला. फक्त मुंबईतच नाही तर त्यांनी आपल्या बेस्ट चेअरमनपदाचा फायदा कोकणातल्या छोट्या गावांना देखील करून दिला.

बेस्ट बससाठी निकामी झालेल्या चेसिसचे साकवात रुपांतर करुन त्याचे गावोगावी वितरण करुन दिले. कोकणातल्या लोकांची गैरसोय त्यांनी दूर केली. अनेकांचे आशीर्वाद त्यांना लाभले.

बेस्टचे चेअरमन म्हणून राणे यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. 

अशातच एकदा बेस्टच्या काही विशिष्ट परवानग्या मिळवण्यासाठी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सहकार्य करत नव्हते. त्यावेळी राणेंनी कडक शब्दात त्यांना सुनावले होते की,

ज्या पाचव्या मजल्यावर बसून आपण मिटिंग करत आहोत, त्या खोलीची खिडकी उघडी आहे.

राणेंचा रोख एकदमच रोखठोक होता. राणेंची धमकी ऐकून त्या अध्यक्षांनी तातडीने सर्व परवानग्या दिल्या. राणेंकडे प्रशासकीय क्षमता, प्रभावी निर्णयक्षमता आणि अधिकारी वर्गावर वचक ठेवण्याची कुवत होती.

राणेंच्या राजकीय कारकिर्दीत बेस्टचे चेअरमनपद हा टर्निंग पॉईंट ठरला होता. या बेस्टमधल्या कामगिरी मुळेच त्यांना बाळासाहेबांनी थेट मालवणचं तिकीट देऊन आमदार बनवलं. पुढच्या दहा वर्षात मंत्री पद ते मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांचा वादळी प्रवास झाला. 

Leave A Reply

Your email address will not be published.