गाड्या सोडून सायकल, गॅस सोडून चुली.. श्रीलंकेतली माणसं कशी जगत आहेत..

आर्थिक संकटाबरोबरच श्रीलंकेत राजकीय संकट देखील निर्माण झालं आहे. लंकेतल्या लोकांनी चक्क राष्ट्रपती निवास ताब्यात घेतल्याचे व्हिडिओ तुम्ही पहिले देखील असतील. राष्ट्रपतींच्या घरावरील हल्ल्यांनंतर ते देश सोडून पळून गेले आहेत.

एकदंरीतच राजपक्षे फॅमिली आणि सरकार यांच्या विरोधातच लोकांचा राग असल्याचं दिसतं. ज्याप्रमाणे लोक रस्त्यावर उतरत आहेत अगदी राष्ट्रपती भावनावर देखील हल्ला करत आहेत यावरून लोकांच्या मनात किती किती खदखद असेल याचा आपल्याला अंदाज येतो.

आणि या आर्थिक संकटात श्रीलंकन लोक जगात आहेत हे बघितल्यास ते एवढे का चिढलेत याचा आपल्याला अंदाज येतो.

लोकांनी गरजेच्या वस्तूंसाठी पर्यायी वस्तू निवडल्या आहेत..

पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडलाय. या तुटवड्यामुळे वस्तूंच्या किमतीत वाढ तर झालीच परंतु या वस्तू उपलब्ध होणेही कठीण झाले आहे. महागाईमुळे पैशांची बचत करण्यासाठी आणि एखादी वस्तू संपल्यास पर्यायी म्हणून इतर वस्तूंचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

सायकल आणि रोलर स्केट..

पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था कोलमडून गेलीय. सोबतच इंधनाचा तुटवडा आणि वाढलेल्या महागाईमुळे लोकांनी गाड्यांऐवजी सायकल आणि रोलर स्केटचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. 

काही लोकांनी आपल्या जुन्या सायकली दुरुस्त करायला घेतल्या आहेत. तर काही लोक नवीन सायकली खरेदी करत आहेत. सामान्य परिस्थितीत २० ते ३० हजार रुपयांना मिळणाऱ्या सायकलची किंमत ६० हजार रुपयांवर गेली आहे. 

लाकडे, नारळाच्या काथ्यावर चालणारे स्टोव्ह..

श्रीलंकेत गॅसचा तुटवडा पडल्यामुळे गॅस उपलब्ध होत नाहीये. तसेच काही दिवसांपूर्वीच गॅसची किंमत ५० श्रीलंकन रुपयांनी वाढून ४९१० रुपये झाली आहे. या वाढलेल्या किमतीमुळे आणि गॅसचा तुटवडा पडल्यामुळे नागरिकांनी नारळाच्या काथ्यावर पेटणाऱ्या स्टोव्हची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. 

हा स्टोव्ह बाजारात सहजासहजी उपलब्ध होतो. या स्टोव्हसोबत मातीच्या गोलाकार चुली सुद्धा लोकांकडून खरेदी केल्या जात आहेत. तसेच जाळायला लागणाऱ्या नारळाच्या काथ्या सुद्धा २४० रुपये किलोने बाजारात उपलब्ध होत आहेत. तसेच लाकडं सुद्धा ८० रुपये बंडलाने बाजारात मिळत आहेत. 

केरोसीन स्टोव्हचा वापर..

श्रीलंकेत गॅस आणि इंधनाच तुटवडा पडला असला तरी केरोसीन मात्र थोड्या फार प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे केरोसीन जिथे मिळेल तिथे खरेदी करून नागरिक केरोसीन स्टोव्हचा वापर करत आहेत..

इनव्हर्टर चा वापर..

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरु करण्यात आलं आहे. देशात अनेक ठिकाणी १२ ते १५ तास लोडशेडिंग केली जात आहे. या वाढलेल्या लोडशेडिंगमुळे नागरिक इन्व्हर्टरचा वापर करत आहेत. इलेक्ट्रीसिटीवर चालणाऱ्या छोट्या इनव्हर्टरची किंमत ६५ हजार तर मोठ्या इन्व्हर्टरची किंमत १० ते १५ लाख रुपयांपर्यंत गेलीय.

परंतु लोडशेडिंगच्या काळात इलेक्ट्रीसिटी वापरासाठी नागरिक हा महागडा पर्याय निवडत आहेत.. 

हे झालं परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या नागरिकांचं परंतु श्रीलंकेतील काही तमिळ लोकं मात्र आपल्या जमिनी विकून भारतात पलायन देखील करत आहेत.. 

श्रीलंकेत चालू असलेल्या आर्थिक संकटामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेतील तमिळ भाषिकांचे भारतात पलायन व्हायला सुरुवात झाली आहे. तांदळाची किंमत ४०० रुपये प्रति किलोवर गेलीय. त्यात भारताने पाठवलेला प्रति कुटुंब दहा किलो तांदूळ वगळता खाण्यासाठी काहीच मिळत नसल्याने लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

खायला तांदूळ नाहीत आणि लहान मुलांचे अपहरण..

जगण्याच्या प्रश्नांसोबतच लहान मुलांचे अपहरण होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी लहान मुलांना घरी ठेऊन लांबवर जावं लागतं तसेच मुलं बाहेर असल्यास त्यांची काळजी वाटत असल्याचेही रेफ्यूजी सांगत आहेत.

या सगळ्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून, अनेक जण आपल्या जमिनी विकून मिळालेल्या पैशाने बोटी भाड्याने घेत आहेत. तमिळ लोक या भाड्याच्या बोटींवर बसून श्रीलंकेतील जाफना आणि मन्नारच्या भागातून भारतात येत आहेत.

या सगळ्या संकटात जगण्यासाठी मार्च २०२२ पर्यंत जवळपास ८५ श्रीलंकन नागरिक भारतात आले असल्याची माहिती आहे. त्यांनंतरही अनेक लोकं  भारतात येत आहेत. श्रीलंकेतून भारतात येणाऱ्या रेफ्युजींना सीमा सुरक्षा दलाकडून तमिळनाडू राज्यातील रेफ्युजी कॅम्प मध्ये पाठवण्यात येत आहे. १९९० च्या दशकात एलटीटीइ आणि श्रीलंका सरकारमध्ये चाललेल्या गृहयुद्धामुळे अनेक तमिळ लोकं भारतात रेफ्युजी म्हणून आले होते.

भारतात येणाऱ्या रेफ्युजींबद्दल पत्रकारांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना प्रश्न विचारला होता..

या प्रश्नाचे उत्तर देतांना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले कि..

“भारत सरकार नेहमी श्रीलंकेचं समर्थन करत आला आहे. भारत या आर्थिक संकटात श्रीलंकेची मदत करत आहे. सध्या भारतात कोणत्याही प्रकारचे रेफ्युजी संकट नाही” असं त्यांनी रविवारी म्हटलं आहे. 

श्रीलंकेत आलेल्या आर्थिक संकटानंतर लोकांनी आत्ता जगण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळे मार्ग निवडले आहेत. काहींनी आलेल्या परिस्थितीत तडजोडी करत पर्यायी वस्तू वापरण्यास सुरुवात केली. तर काही लोकांनी मात्र देश सोडून भारतात येण्याला महत्व दिलं आहेत. या संकटामुळे श्रीलंकेतील लोकांच्या जगण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे.  

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.