१९९६ साली श्रीलंका संपल्यात जमा होता, तेव्हा क्रिकेटमुळं देश पुन्हा उभारला..

श्रीलंका आणि आपलं नातं तसं आपण रामायणाच्या गोष्टी ऐकत होतो तेव्हापासूनचं. अगदी भूगोलाच्या पुस्तकात भारताच्या नकाशासोबत श्रीलंका असतेच. सध्या लंकेत राडे सुरू आहेत, एका दिवसाचा पेट्रोलसाठा उरलाय, औषधं नाहीत म्हणून उपचार बंद आहेत, असं बरंच काही आपल्या कानांवर येतंय. पण आपला विषय इतिहासाचा आहे, आपला विषय विजयाचा आहे आणि आशेचाही.

१९९६ या वर्षाला नुकतीच सुरुवात झालेली. श्रीलंकेत उफाळलेली अंतर्गत यादवी, लिट्टेच्या कारवाया यामुळं जनजीवन अस्थिर होतं. जसं सामान्य लोकांचं रोजचं आयुष्य तडजोड करुन सुरू होतं, अगदी तसंच श्रीलंकेचं क्रिकेटही.

लंकन क्रिकेट बोर्डाकडे फार सोडा पण पुरेसे पैसेही नव्हते. सगळ्या टीमला मिळून तीन लाखाच्या आसपास पैसे मिळायचे. परदेशी दौरा असला की बोर्डाला स्पॉनर्ससाठी विनवण्या कराव्या लागायच्या. पण तरीही अर्जुन रणतुंगा नावाचा एक माणूस होता, जो स्वप्न बघत होता…

आपल्या मायदेशात होणारा वर्ल्डकप जिंकायचं.

पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीला श्रीलंकेमध्ये लिट्टेच्या कारवायांमध्ये वाढ झालेली. १९८३ पासून स्वतंत्र तमिळ देशासाठी सुरू असलेला वाद शिगेला पोहोचला होता. १९९३ मध्ये लिट्टेनं श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या घडवून आणली. सरकारसोबत त्यांचा शांततेचा तह होत नव्हता. देशातल्या नेत्यांचं हत्यासत्र सुरुच होतं. लंकन सैन्यानं लिट्टेच्या ताब्यात असलेलं जाफना शहर जिंकलं होतं. त्यामुळं लिट्टे याचा बदला घेण्यासाठी आसुसलेलं असणार याचा अंदाज होताच.

देशात शांतता नव्हती, लोकांवर दडपण होतं आणि गृहयुद्धाचं सावटही. त्यात फेब्रुवारी महिन्यात भारत-पाकिस्तान-श्रीलंका या देशांमध्ये मिळून वर्ल्डकपला सुरुवात होणार होती आणि ३१ जानेवारीला श्रीलंका हादरली.

गर्दीनं गजबजलेल्या, आर्थिक घडामोडींचं केंद्र असलेल्या कोलंबो फोर्ट परिसरात बॉम्बस्फोट झाला. जागेवर ९१ लोक ठार झाले आणि १४०० पेक्षा जास्त लोक जखमी. देशात पुन्हा तणाव पसरला, लोकं शहर सोडून गावाला निघून गेले, कित्येक व्यवसाय ठप्प झाले, शाळा कॉलेजेस बंद करण्यात आली, सार्वजनिक वाहतूक वापरायलाही लोक घाबरू लागले.

एखादा आंतरराष्ट्रीय इव्हेन्ट जिथं होणार आहे, तिथल्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला.

यावेळी क्रिकेटर्स कुठे होते? तर कॅप्टन अर्जुन रणतुंगाच्या घरात.

लंकन क्रिकेटर्सची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची होती, की कित्येकांना शहरात रहायचा खर्चही परवडायचा नाही. अस्थिरतेमुळं सुरक्षित जॉब मिळण्याचे किंवा क्रिकेटमधून भरपूर पैसे मिळण्याचे मार्गही खुंटले होते. त्यांच्याकडे एकच जोड कपडे असायचे आणि जेवणासाठीही क्लबवर अवलंबून रहावं लागायचं. कॅप्टन रणतुंगानं अशा सगळ्या खेळाडूंना आपल्या घरी आसरा दिला. एकत्र राहत, एकत्र जेवत त्यानं टीम बांधली.

रणतुंगाचं ध्येय एकच होतं, संकटानं पिचलेल्या, आपली माणसं गमावलेल्या श्रीलंकन माणसांना पुन्हा आनंद मिळवून द्यायचा. पण वर्ल्डकपला काही दिवस बाकी असतानाच, झालेल्या स्फोटामुळं ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजनं श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. संकट अजून गहिरं झालं.

भारत तेव्हाही मदतीसाठी पुढं सरसावला.

भारत-पाकिस्तानच्या संघानं एकच टीम बनवत लंकेत प्रदर्शनीय सामना खेळला आणि इथं खेळणं सेफ आहे हे जगाला दाखवून दिलं. पण तरीही ऑस्ट्रेलिया आणि विंडीज काही लंकेत आलं नाही.

श्रीलंका वर्ल्डकपच्या क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचली. या टीममध्ये सगळेच जण पूर्णवेळ क्रिकेटर होते असंही नव्हतं, पण त्यांच्यात जिगर होती, जिंकण्याची आग होती. एकएक टप्पे पार करत लंकेनं सेमीफायनलमध्ये धडक मारली. तिथं सामना झाला भारताशी आणि प्रेक्षकांनी बट्टा लावलेली मॅच श्रीलंकेनं जिंकली.

फायनलमध्ये समोर होती ऑस्ट्रेलिया. सगळ्यात बलाढ्य आणि वर्ल्डकप जिंकण्यासाठी हॉट फेव्हरिट्स. पण अरविंदा डिसिल्व्हाची नॉटआऊट सेंच्युरी आणि रणतुंगाच्या फायरिंगमुळं लंकेनं वर्ल्डकप जिंकला.

ज्या गोष्टीची कुणीच अपेक्षाही केली नव्हती, ते श्रीलंकेनं करुन दाखवलं… प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी वर्ल्डकप जिंकला.

ती तारीख होती, १७ मार्च १९९६. जसजशी श्रीलंकेच्या टीमची वर्ल्डकपमध्ये प्रगती होत होती, तसं त्यांच्याबद्दल येणाऱ्या बातम्यांचं, त्यांच्या कौतुकाचं प्रमाणही वाढलं होतं. या सगळ्यावर कळस चढला तो १८ मार्च च्या सकाळी.

ज्या वर्तमानपत्रांमध्ये रोज अंतर्गत यादवीच्या, हल्ल्यांच्या आणि लंकन सैनिक विरुद्ध लिट्टे या चकमकींच्या हेडलाईन्स असायच्या, ती जागा आता श्रीलंकेच्या वर्ल्डकप विजयानं घेतली होती.

सरकारी वृत्तपत्र असलेल्या डेली न्यूजची मुख्य हेडलाईन होती, ‘Lanka Conquers Cricket’s Mount Everest’

तर लंकदीप या सिंहली भाषेत प्रकाशित होणाऱ्या पेपरनं, ‘Sri Lanka World Champions’ असं साधं पण पद्धतशीर हेडिंग दिलं.

ही दोन उदाहरणं एकच गोष्ट सांगतात, की स्वतःच्याच देशात रोजची लढाई लढणाऱ्या श्रीलंकेला जग जिंकल्याची जाणीव एका क्रिकेट वर्ल्डकपमुळं झाली. फक्त पेपरमध्येच नाही, तर रेडिओवरही क्रिकेटर्सचा कौतुक सोहळा रंगला होता. लोकं थेट रेडिओ स्टेशनला फोन लाऊन क्रिकेटर्सबद्दल बोलण्याची, त्यांचं कौतुक करण्याची मागणी करू लागले.

१७ मार्चच्या रात्रीच लंकन लोक रस्त्यावर उतरले होते, तेही मोठया संख्येनं. पण यावेळी त्यांच्या हातात निषेधाचे फलक नव्हते, मदतीची याचना नव्हती की सुरक्षेची आस होती.

त्यांना विजय साजरा करायचा होता, त्यांच्या हातात श्रीलंकेचे ध्वज होते, ओठांवर विजयाच्या आरोळ्या होत्या. काही जणांना नशेची तर काही जणांना विजयाची झिंग होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं रस्त्यावर उतरल्यानंतरही पोलिस किंवा लष्करानं काहीच कारवाई केली नाही. उलट तत्कालीन लष्कराचे प्रवक्ते, ब्रिगेडियर सरथ मुनासिंगे म्हणाले होते, ‘१२ वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या लढाईमुळं लोकं वैतागली आहेत. ही सामान्य जनता आज युद्ध विसरून आनंद साजरा करतीये, तुम्ही त्यांना दोषी ठरवूच शकत नाही.’

लंकेत सगळीकडे अर्जुन रणतुंगा, अरविंदा डी सिल्व्हा, सनथ जयसूर्या, रोमेश कालुवितरणा यांचे पोस्टर झळकत होते. काही आठवडे आधी झालेला बॉम्बस्फोट, दहशतीचं सावट, आर्थिक तणाव, भविष्याची चिंता या सगळ्या गोष्टी काही क्षणांसाठी विसरल्या गेल्या… विखुरलेली माणसं एका खेळानं एकत्र आणली.

लंकेच्या टीमनं वर्ल्डकप जिंकला आणि त्या वर्ल्डकपनं लंकेतली माणसं.

सध्याची परिस्थिती बघितली, तर लंकेत अराजक माजलेलं आहे. आजचा दिवस ढकलला, तरी उद्यावर प्रश्नचिन्ह आहे. या सगळ्यात स्थानिक लंकन क्रिकेटचे आधीच बारा वाजलेले आहेत. जिथं ताटातल्या अन्नाचा प्रश्न उभा आहे, तिथं क्रिकेटसारख्या खेळाकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न आहेच.

पण दुसऱ्या बाजूला लंकेला वर्ल्डकप जिंकवून देणारे रणतुंगा, जयसूर्या, महानमा सारखे खेळाडू आंदोलनात आणि लोकांच्या मदतीसाठी उतरलेत. काही श्रीलंकन खेळाडू आयपीएलमध्ये होणाऱ्या भरघोस कमाईमुळं स्वतःचं कुटुंब तगवून ठेऊ शकतील याची खात्री आहे. तर पाकिस्ताननंही लांबच्या शेजारधर्माला जागत आपल्या क्रिकेट संघाचा नियोजित श्रीलंका दौरा कायम ठेवलाय.

सध्या लंकेची टेस्ट टीम बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, आपल्या देशात काय सुरू आहे, आपल्या कुटुंबावरही संकट आहे हे माहीत असूनही लंकन क्रिकेटर्स मैदानात झुंजतायत. त्यांच्या या लढण्याची इतिहासात नोंद होईलच, पण त्यांचा विजय लंकेच्या नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरायला भाग पाडू शकतो… जेव्हा त्यांच्या आरोळ्या आनंदाच्या असतील आणि मागण्या प्लेअर्सचं कौतुक करण्याच्या… अगदी १९९६ सारखं.

कधीकधी स्कोअरकार्ड, रन्स याच्या पलीकडे जाऊन क्रिकेट जिंकतं, ते असं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.