पुलंनी हात ठेवलां की माणसाचं सोनं व्हायचं, पण रानकवीचं सोनं करण पुलंना देखील जमलं नाही.

वस्त्रहऱण या नाटकाला जेमतेम माणसं असायची. काही दिवसात नाटक बंद होईल याचा अंदाज सर्वांनाच आला होता. पण झालं अस की, पुलंनी वस्त्रहरण नाटकांच कौतुक केलं पुढे वस्त्रहरण नाटकाने गर्दिचा उच्चांक मोडला. आजही हे नाटक त्याचा जोमात चालू असत. पुलंच्या कौतुकास पात्र ठरलेलं नाटक अशी नाटकांची जाहिरात करण्याची नवीन फॅशन आली. पुलंचा हात तसाच होता.

कॉलेजच्या वयात असणाऱ्या आन्दाच्या कविता वाचून पुलं आणि सुनिताबाई आन्दाला भेटायला कॉलेजमध्ये गेले. पुलं त्या आन्दा म्हणाले, छान कविता करतोस. लिहीत रहा. त्या आन्दाचा पुढे लेखक आनंद यादव झाला. पुलंचा पडलेला हात अनेकांना घडवत गेला पण एक रानावरचा माणूस याला अपवाद ठरला. पुलं त्याच्या मागे लागले पण तो हाती येण्यासारखा नव्हताच मुळी.

हि गोष्ट त्याच हाती न आलेल्या “रानकवी यशवंत तांदळेंची”.

१९७५ सालच कराडचं मराठी साहित्य संमेलन. संमेलनाच्या दूसऱ्या दिवशी वर्तनानपत्राच्या पहिल्या पानावर एक फोटो छापून आला. पुलं देशपांडे सारखा नावाजलेला साहित्यिक एका फाटक्या माणसाला मिठ्ठी मारतोय. साहित्य संमेलनात नसणाऱ्या साहित्यिकांच्या चर्चा झडू लागल्या. रसिकांनी देखील मनावर घेतलं असा हा कोणता फाटका माणूस आहे ज्याला पुलं देशपांडे यांच्यासारखा मोठ्ठा माणूस मिठ्ठी मारून उभा आहे. 

झालं अस की १९७५ सालचं ५१ वं साहित्य संमेलन कराड येथे भरलं होतं. अनेक जेष्ठ साहित्यिक या संमेलनात सहभागी झाले होते. साहित्य संमेलन आणि यशवंतराव चव्हाण याचं नात देखील वेगळ होतं. ते देखील व्यासपीठाच्या समोरील पहिल्या रांगेत बसले होते. आजूबाजूचे रसिक साहित्य संमेलनात सहभागी झाले होते. सरळ सांगायच झालं तर आजपर्यन्त चालणाऱ्या संस्कृतीला अनुसरूनच साहित्य संमेलन पार पडणार होते. विशेष अस काही घडावं अस काही वेगळ याही साहित्य संमेलनात होण्याची चिन्ह नव्हती.

पण अशात विशेष अस घडलं. स्टेजच्या खाली एक फडका घातलेला घाटावरचा गडी उभा राहिला होता. धोतर आणि अंगावर गोधडी आणि डोक्यावर फेटा. सगळच कस त्याच्या चेहऱ्यासारखं रापलेलं होतं. तो गडी स्टेजच्या खाली आला आणि गर्दीतल्या एकाला हेरून म्हणला, 

“दादा एक कुंडका म्हणू द्या की…” 

दादाला माहित होतं अशी माणसं गर्दी असली की गिळायला येतात. दादा त्याला हाकलू लागला आणि हा म्हणत होता कुंडका म्हणूद्या. रांगेत बसलेल्या यशवंतराव चव्हाणांच्या बारीक नजरेनं हे सगळ टिपलं. मुळात या माणसाचं निम्म आयुष्य घाटावर गेलेलं. घाटावरचा माणूस जेवणासाठी येणार नाही हे त्यांना माहित होतं. त्यांनी बोलणं ऐकलं आणि कागदावर चिठ्ठी लिहली. गर्दीतल्या एका माणसानं ती चिठ्ठी दादाकडे दिली. त्यावर लिहलं होतं,

“सदरच्या व्यक्तीला बोलण्यासाठी वेळ द्या, यशवंतराव चव्हाण.” 

दादाला आश्चर्य वाटलं. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा वित्तमंत्री एका फाटक्या माणसांची बाजू घेतोय. पण करणार काय ती चिठ्ठी म्हणजे आदेश होता. त्या फाटक्या माणसाला थेट साहित्य संमेलनाच स्टेज देण्यात आलं. 

समोरच्या गर्दीत यशवंतराव चव्हाण, पुलं देशपांडे यांच्यासारखी मात्तब्बर मंडळी होती आणि हा फाटका माणूस त्याचा कुंडका म्हणू लागला. 

बीजमाशी असतीय लहान 

ती फुलोऱ्यात बसती दडून 

मग जोंधळा जातोय वाळून 

आत्ता शेतकरी जगल कशानं..? 

तो फाटका माणूस कुंडका म्हणत गेला आणि यशवंतरावांना सारखा सह्याद्री काकणभर पुढं सरकून ते ऐकू लागला. पुलं सारखा माणूस जाग्यावरुन उठला. पुलं स्टेजवर गेले. त्या फाटक्या माणसाला पुलंनी कवटाळून घेतलं. दोन साहित्यिकांची हि गळाभेट होती.

पुलं म्हणाले, “हा रानकवी आहे ” त्या दिवशी या फाटक्या माणसाला नाव मिळालं रानकवी यशवंत तांदळे. 

दूसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात पुलं देशपांडे आणि रानकवीच्या गळाभेटीचे फोटो होते. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा सह्याद्रीच्या दिलाचा माणूस त्यांच कौतुक करत होता. महाराष्ट्राला घाटावरच्या माळरानावर एक हिरा सापडला होता. 

रानकवी यशवंत तांदळेंचा गाव आसद. सांगली जिल्हातल्या घाटावरच हे गाव. या गावात ना पाणी होतं ना पीक. आजूबाजूला जे दिसायचं ते हा फाटका माणूस कवीतेत बांधायचा. रानकवी गाजले. पुढे काय झालं तर आजचा दिवस उगवलं. एक दिवस गावातल्या एकाला विचारलं कोण रे ते. तर तो म्हणाला, लय मोठ्ठे कवी होते, त्यांच्या माग पुलं लागलेले. पुस्तक काढ म्हणून, लिही आपण काढू, गोळा करु पण रानावरचं फुलपाखरू थोडचं घावतं असतय त्यांच्या कविता त्यांच्यासोबत गेल्या. 

त्या संमेलनानंतर काय झालं तर रानकवी पंचक्रोशीत गाजू लागले. यशवंतराव चव्हाण कौतुक करत होते, मदिमा, वसंतदादा, रत्नाप्पा कुंभार सगळेच या माणसाचे फॅन झाले होते. गावागावात रानकवींना खास बोलावून घेतलं जायचं. ते जायचे आपल्या कवीने सगळ्या गावाला प्रेमानं लुटायचे. आपण जगायला नाही तर लुटायला जन्माला आलोय हे तो माणूस दाखवून देत होता. पण माणसांना लुटणारा हा कवी पैसे लुटायच्या बाबतीत लयच मागे पडला. त्याला कळालं नाही माणसांना पैशाला पण लुटायला लागतं. हातात दिलेले रिकाम पाकिट पण त्यांन मोठ्या मनान घेतलं. 

येणारे चार पैसै घेवून हा रानकवी कविता म्हणत होता. एस्टीचं भाड निघालं की हा गावात पोहचायचा. गावात कौतुक चालू झालं. पण पुस्तक? या रानकवीला पुलं देशपांडे देखील पुस्तकात बांधू शकले नाहीत. त्यांना लिहता वाचता येण्याचा प्रश्नच नव्हता. तोंडात आलेली कवीता तिथच मरुन जायची, पुढच्या गावात पुढची कविता जन्माला यायची. माणूस मैदान मारत होता पण एक दिवशी घात झाला. कुणीतरी रानकवीचं कौतुक पाहून पानातनं शेंदूर दिल्याचं सांगितलं जातं. त्या घटनेनंतर रानकवींची वाचा कायमची संपली.

रानकवी घरीच थांबू लागले, काही वर्षात त्यांच निधन झालं. त्यांच्या कविताचं म्हणाल तर आज काही मोजक्याच कविता सांगितल्या जातात. वास्तविक आपली संस्कृती मौखिकच. कथा, परंपरा, कविता एका पिढीकडून दूसऱ्या पिढीकडे गेल्या. म्हणूनच तुकोबारायांची गाथा बुडवून देखील मौखिक अर्थाने अभंग बुडू शकले नाहीत. लोकांनी ते जपले आणि पुढच्या पिढ्यांकडे नेले. अलीकडच्या काळात मात्र मौखिक संस्कृती ढासळली आणि तिथेच त्यांचा कविता देखील संपल्या. या कवीला पकडण्यात पुलं देशपांडे देखील अयशस्वी झाले. खऱ्या अर्थाने ते रानकवीच होते.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.