घरात निवडणुका सुरु असताना बिहारचा किंगमेकर कुठे गायब आहे?
बिहारच्या मतमोजणीची गरमागरमी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जागा कमी होत असल्या तरी त्यांचा मित्रपक्ष भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. ज्यांची हवा झाली ते महागटबंधन सध्या पराभवाच्या छायेत दिसत आहे. एवढ सगळ राजकारण चालू आहे आणि चर्चा प्रशांत किशोर कुठे गायब आहे याची आहे.
कोण आहेत प्रशांत किशोर?
प्रशांत किशोर यांचा जन्म 1977 साली बिहारच्या बक्सर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील श्रीकांत पांडे पेशाने डॉक्टर होते. तर आई हाऊसवाईफ होती. प्रशांत किशोर यांचं सुरवातीचं शिक्षण बिहारमध्ये झालं. नंतर त्यांनी हैद्राबाद मध्ये इंजिनियरिंग केली. पुढे त्यांना युनिसेफमध्ये ब्रँडिंग इंचार्जची नोकरी मिळाली. तेथे त्यांना मार्केटिंग तसेच मीडिया मॅनेजमेंट बद्दलचं प्रशिक्षण तर भेटलंच सोबतच ते त्यात पारंगत झाले.
भाजपासाठी निवडणूक रणनिती
2011 साली युनिसेफची नोकरी सोडून प्रशांत किशोर भारतात परतले. त्यांनी गुजरातमध्ये झालेल्या ‘व्हायब्रॅंट गुजरात’ या प्रसिद्ध बिझनेस फोरमला भेट दिली. तिथे त्यांची भेट नरेंद्र मोदींशी झाली. या भेटीनंतर त्यांनी मोदींसाठी काम करायला सुरुवात केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निवडणूक प्रचाराची धुरा प्रशांत किशोरांच्या खांद्यावर होती. त्यांनी मोदींच्या सभेपासून प्रत्येक इलेक्शन कॅम्पेनला सांभाळलं. इतकंच नाही तर त्यांनी ” चाय पे चर्चा” आणि “थ्रीडी सभा” ह्या युनिक योजना पण राबवल्या. त्यांचा यशस्वी प्लॅनिंगमुळे भाजपची विजय निश्चिती झालं असं म्हटलं जात होतं. “अबकी बार मोदी सरकार” ची घोषणा घरोघरी पोहचवण्याचे कार्य त्यानी यशस्वीरीत्या केलं होतं.
भाजपाला सोडचिट्ठी
पुढे 2014 नंतर भाजपासोबत काही वाद झाल्याने त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी दिली. त्यानंतर ते जदयु कडे वळले .त्यांनी नितीश कुमारांसाठी प्रचार आरंभ केला . प्रशांत किशोर यांच्या विशिष्ट प्रचार तंत्रामुळे बिहारच्या निवडणुकीत जदयु – काँग्रेस- राजद युतीला विजयश्री प्राप्त झाली.भाजपाचा धोबी पछाड झाला.
पुढे त्यांनी पंजाब इलेक्शनला काँग्रेसला विजयी करून किंगमेकर ही पदवी मिळवली होती.
परंतु त्यानंतर झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत मात्र प्रशांत किशोर यांची रणनीती सपशेल फेल गेली. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. त्यामुळे प्रशांत किशोर यांची किंगमेकर ही प्रतिमा धुळीस मिळाली. काँग्रेसने त्यानंतर प्रशांत किशोर यांना डच्चू दिला. त्यानंतर मात्र प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांशी संबंध मजबूत केले. याच्यावर बऱ्याचदा भाजपा जो जदयुचा मित्र पक्ष होता त्याने आक्षेप घेतला होता. परंतु नितीश कुमार यांनी त्यांना जुमानल नाही.
जदयु प्रवेश.
पुढे तर त्यांनी थेट जेडीयूमध्ये प्रवेश करून राजकारणात एन्ट्री मारली. किंगमेकर आता किंग होणार याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यांच्यामुळे नितीश कुमार यांनी लालूंच्या महागटबंधनची साथ सोडून भाजपबरोबर पुन्हा युती केली असं म्हटल गेल. पण प्रशांत किशोर फार काळ राजकारणात टिकले नाहीत.
निवडणुकीचे मॅनेजमेंट आणि प्रत्यक्ष पक्षाचे राजकारण यांचा मेळ त्यांना घालायला जमले नाही. जेष्ठ नेत्यांशी त्यांनी पंगा घेतला होता. नितीश कुमार यांनी त्यांना जे आश्वासन दिले होते ते पूर्ण देखील झाले नाही.
मध्यंतरी प्रशांत किशोर यांनी आंध्रमध्ये जगनमोहन रेड्डी यांचा प्रचाराची जबाबदारी उचलली होती. समराला संवरवरम , अन्ना पिलुपु वगैरे यात्रा काढून त्यांना विजयी बनवलं. आपली किंगमेकर ही जादू अजूनही कमी झाली नाही हे दाखवून दिलं. महाराष्ट्रात देखील आदित्य ठाकरे यांची प्रचार यंत्रणा राबवली आणि अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदा पर्यंत नेऊन पोहचवल.
यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासामुळे त्यांनी थेट पक्षावर टीका सुरु केली. मोदिजींच्या नागरिकता सुधारणा कायदा (कॅब) याच्यावर देखील ते तुटून पडले. मिडिया मध्ये डिबेट केले. नितीश कुमार या कायद्याला सपोर्ट करत आहेत म्हणून त्यांच्यावरही झाडून टीका केली.
अखेर या वर्षाच्या सुरवातीला त्यांना नितीश कुमार यांनी पक्षातून काढून टाकलं.
यावर्षी बिहारच्या निवडणुका आल्या तरी प्रशांत किशोर शांत होते. त्यांनी स्वतः निवडणूक लढवणार होते ते सुद्धा कन्सल झालं. मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणारे प्रशांत किशोर एकदमच गायब झाले.
तेजस्वी यादव यांचा प्रचार प्रशांत किशोर मॅनेज करत आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु होती मात्र त्यांनी याचा इन्कार केला. मी बंगालच्या निवडणुकीच्या ममता बनर्जी यांच्या तयारी साठी तिकडे जात आहे अशी घोषणा त्यांनी केली होती.
त्याचं ट्विटर जरी बघितल तरी २० जुलै नंतर त्यांनी काहीही पोस्ट केलेले नाही. एकेकाळी संपूर्ण देशाचा किंग ठरवणारा हा किंग मेकर स्वतःच्या राज्यात निवडणुका होत असूनही गायब आहे यावर कोणाचा विश्वास बसत नाही आहे.
जर खरोखर बिहार मध्ये महाराष्ट्राप्रमाणे त्रिशंकू अवस्था झाली तर प्रशांत किशोरची सगळ्यात मोठी आवश्यकता लागणार आहे हे नक्की.
हे ही वाच भिडू.
- किंगमेकर आत्ता स्वत: किंग व्हायचं म्हणतोय.
- लालूप्रसाद यादव आणि भाजपा यांची युती शक्य आहे काय?
- अडवाणींच प्रचाराचं भाषण चालू होतं आणि या IAS अधिकाऱ्याने माईकच हिसकावून घेतला होता !!