पोलीसही गोडसेजवळ जायला घाबरत होते परंतु ‘एका’ व्यक्तीमुळे तो पकडला गेला.

३० जानेवारी १९४८ चा तो काळा दिवस !

येणाऱ्या प्रत्येक पिढीला जाणीव होत राहणार कि आपण याच दिवशी महात्मा गांधीजीसारखी अनमोल व्यक्ती गमावली आहे.  याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींना एकामागे एक ३ गोळ्या झाडत गांधीजींची हत्या केली होती.

३० जानेवारीचा तो दिवस ज्यादिवशी गांधीजी सरदार पटेलांना भेटण्यासाठी निघाले होते, परंतु त्या आधी प्रार्थना सभा आटपून घ्यावी म्हणून ते बिरला हाउसकडे घाईघाईने निघाले होते. तेवढ्यात समोरून नथुराम नावाचा व्यक्ती समोर आला आणि गांधीजींना “नमस्कार बापू” म्हणून हात जोडले आणि अचानक गांधीजींना धक्का देऊन खाली पाडले. लपवलेली पिस्तुल त्याने बाहेर काढली आणि सलग ३ गोळ्या गांधीजींच्या शरीरावर झाडल्या त्यातल्या २ गोळ्या गांधीजींच्या शरीरातून आरपार गेल्या एक गोळी मात्र शरीरातच अडकून राहिली आणि गांधीजींचा जीव गेला.

हा गोंधळ पाहून सगळीकडे धावपळ सुरु झाली, गांधीजींच्या आजूबाजूची गर्दी दूर पळाली. कुणीही हिंमत करत नव्हतं कि गांधीजींच्या जवळ जावं किंवा नथूरामला जाऊन त्याची गचांडी पकडावी. पोलीसही दुरूनच सगळं पाहत होते यातच ४-५ मिनिट गेले.

आणि तेवढ्यात एक व्यक्ती समोर आला आणि त्याने गोडसेवर झडप घातली.

तो होता बिरला हाउसच्या बागेचा माळी ! त्याने गोडसे च्या अंगावर धावून गेला आणि आपल्या दोन्ही हातांनी त्याला जखडून घेतले. आणि सगळी गर्दी त्याच्या जवळ आली आणि गोडसे ला मारायला लागली.

कोण होता हा व्यक्ती ज्यामुळे गांधीजींचा मारेकरी पकडला गेला ?

मोठ्या हिंमतीने, धैर्याने त्या क्रुर मारेकऱ्याला पकडणारे नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये माळी म्हणून काम पाहणारे रघु नायक हे होते. तुम्ही म्हणाल आम्ही याधी कधीही यांच्याबाबतीत इतिहासात वाचलेच नाही..बरोबर आहे कारण रघु नायक यांच्याबद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. 

रघु नायक हे मुळचे ओडिसामधील केंद्रपारा जिल्ह्यातील जगुलीपाडा गावचे रहिवासी होते. गोडसे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देणारे व्यक्ती म्हणजेच रघु नायक हे होय. 

घडलेल्या घटनेच्या एकूण १४७ साक्षीदारांपैकी १ महत्वाचे साक्षीदार म्हणून रघु नायकांची नोंद आहे.  घटनेच्या एका वर्षानंतर, खटल्याच्या वेळेसही गोडसेला फाशीची शिक्षा देण्यासाठी मदत करणाऱ्या फिर्यादी साक्षीदारांपैकी ते एक होते.

मात्र रघु नायक यांना आपण विसरायला नकोत म्हणून हे पुन्हा एकदा सांगण्याचा अट्टहास बोल भिडूने केला आहे.

त्याच्या धैर्याचे कौतुक म्हणून १९५५ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले होते. रघु नायक हे आता आपल्यात नाहीत, १९८३ मध्येच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या ३३ वर्षानंतर ओडीसा सरकारने त्यांच्या कामगिरीप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबाला ५ लाखांचा सहायता निधी देखील दिला होता.

रघु नायक यांच्या मुलाचे २००२ मध्ये एका अपघातात निधन झाले त्यामुळे निराधार असलेल्या रघु नायक यांच्या पत्नी मंदोदरी यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात हि मदत खूप महत्वाची ठरली.  नायक यांचे कुटुंबीय आणि गावकरी देखील म्हणतात की इतिहास रघु नायक यांना महत्व देण्यास अयशस्वी ठरला.

त्यांच्या पत्नीने एक आठवण सांगितली कि, “मी त्यांना त्या वेळी विचारलं कि तुम्हाला गोळी लागण्याची  भीती वाटली नाही का ? तेंव्हा त्यांनी उत्तर दिलं कि, “माझ्यासाठी माझा देश सर्वप्रथम आहे”.

स्वतःच्या जिवापेक्षा त्यांना देश महत्वाचा वाटला अशा रघु नायकांना जरी इतिहास विसरला असेल मात्र त्यांच्या  गावातल्या लोकांसाठी ते एक ‘हिरो’आहेत. त्यांच्या गावात २००५ मध्ये जर्मनीच्या डायमंड क्रिसलर ऑटोमोबाईल कंपनीने येथे महात्मा गांधी आणि रघु नायक यांच्या आठवणीत एक स्मारक देखील बांधले आहे. 

केंद्रपाडाचे रहिवासी  सुभ्रांशू सुतार यांनी रघुनाथ नायक यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात लिहिलं कि,  सुरुवातीच्या काळात रघुनाथ कोलकात्यातील बिर्ला कुटुंबात काम करत होता. नंतर त्यांना दिल्लीला हलविण्यात आले आणि बिर्ला हाऊसमध्ये माळी तैनात करण्यात आले होते. गांधीजी जेव्हा जेव्हा दिल्लीत यायचे तेव्हा ते बिर्ला हाऊसमध्ये थांबायचे. माळी म्हणून रघुनाथ यांची गांधीजींसोबत चांगली ओळख झाली. तो रोज गांधीजींच्या साठी बकरीचे दूध आणायचा”.

सुभ्रांशू सुतार सांगतात कि, “गांधीजींच्या हत्येनंतर रघुनाथ नैराश्यात गेला होता. नोकरी सोडून तो ओडिशाला परत गेला होता. पण तो या हत्येचा प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे त्याला साक्ष देण्यासाठी अनेकदा दिल्लीतील विशेष न्यायालयात जावे लागायचे त्यामुळे त्याचे हे दिवस फारच कठीण गेले होते”.

महात्मा गांधी यांचे स्वीय सहाय्यक प्यारेलाल यांनी ,गांधीजींच्या जीवनावर आधारित असलेले ‘महात्मा गांधी लास्ट फेज’ या पुस्तकात रघु नायक यांचा उल्लेख केला आहे. तसेच तुषार गांधी यांनीदेखील  त्यांच्या  ‘लेट्स किल गांधीं’ या पुस्तकात त्यांचा उल्लेख केला आहे.

 

 

 

 

1 Comment
  1. Anand Aundhekar says

    खरंच हि घटना अतिशय वाईट होती जिचा निषेध करावा तेवढा कमी आहे पण गोडसे पळून जाण्याच्या तयारीत होते हे सपशेल खोटे आहे, त्यांनी त्यांच्या जबानीमध्ये सांगितलं आहे कि ते स्वतः स्वाधीन झाले होते, पाळूनच जायचं होत तर हातात पिस्तूल असताना ते सहज जाऊ शकले असते पण ते गेले नाही तर तिथेच थांबले जेणेकरून पकडले जावे आणि त्यांच्यावर खटला चालावा. याउलट महात्मा गांधीजींच्या अनुयायायांनी त्यांच्याच शिकवणी वर काळं फासले आणि गोडसे ला मारहाण करून हिंसेचे प्रदर्शन केले, ज्या पूज्य बापूंनी आयुष्यभर अहिंसेचा मार्ग अंगिकारला आणि दाखवला त्यांच्या अनुयायांनी क्षणात सर्व काही विसरून हिंसा केली हेही तेवढेच निषेधार्य आहे….

Leave A Reply

Your email address will not be published.