रोहित शर्माची मुंबई इंडियन्स धोनीच्या चेन्नईवर कायम भारी का पडते?

दोन मोठ्या टीममध्ये रायव्हलरी नसेल तर खेळात गंमत नाही. फुटबॉल जगात या गोष्टी लई फेमस आहेत. स्पेनमध्ये रियाल माद्रिद-बार्सिलोना, इंग्लिश लीगमध्ये लिव्हरपूल-मँचेस्टर युनायटेड, कोल्हापुरात पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा वगैरे वगैरे डर्बी कुप्रसिद्ध आहेत. या मॅचेसवेळी कधी फॅन्सचं टकूर फिरेल आणि त्या ड्रॅॅगन मम्मी प्रमाणे ड्रकारीस म्हणत अख्खं स्टेडियम पेटवून देतील काही सांगता येत नाही.

आता क्रिकेट म्हणजे तसा जंटलमन लोकांचा गेम झाला. इथ रायव्हलरी सुद्धा मिळमिळीत असते. तसं म्हंटल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत पाकिस्तान वगैरे सीमाप्रश्न मैदानात उकरून काढले जातातच पण हा अपवाद झाला. इतर वेळी अशी जीवखाऊ रायव्हलरी अपवादानेच दिसते. खेळाडू प्रमाणे फॅन्ससुद्धा भांडायला लागलेत हे चित्र क्रिकेटमध्ये एरव्ही दिसत नाही.

पण अकरा वर्षापूर्वी ललित मोदीने आयपीएल सुरु केली आणि भारतात पण क्लब संस्कृती आली. खेळाडू लिलावात वाटले गेले आणि त्यांच्या फॅन्समध्ये ही फुट पडली. घराघरातले प्रेक्षक आपआपल्या  टीममध्ये डिव्हाईड झाले. पण आयपीएल ची सगळ्यात मोठी रायव्हलरी ठरली चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स.

एक वेळ कॉंग्रेस भाजप समर्थक नोटाचं बटन दाबून एकमेकाबरोबर युती करतील पण चेन्नई विरुद्ध मुंबई कधी एकत्र येणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ.

हा वाद तसा आयपीएलच्या आधी पासूनचा आहे. मुंबईमध्ये बाळासाहेबांनी उठाव लुंगी बजाव पुंगी म्हणून दाक्षिणात्य लोकांविरुद्ध हल्ला केला होता. पण आताच्या आयपीएल वादात प्रादेशिकवाद कमी आणि आपल्या लाडक्या खेळाडू बद्दलची भक्ती जास्त महत्वाची आहे. (अजूनही मुंबईमधले काही लोक धोनीला लुंगी घालणारा भैया म्हणून हेट करतात ही गोष्ट वेगळी.)

२००८ साली जेव्हा आयपीएल सुरु झालं तेव्हा भारतात दोन मोठे स्टार होते. सचिन ज्याची लोकप्रियता टेनिस एल्बोच्या ऑपरेशनपासून थोडीशी उतरली होती आणि धोनी जो नव्या पिढीचा रिप्रेझेंटेटिव्ह होता. नुकताच भारताला अनपेक्षितपणे ट्वेंटी२० वर्ल्डकप त्याने जिंकवून दिला होता. कॅप्टन कुल म्हणून त्याची प्रतिमा झाली होती. त्याची हवा होती.

सचिन मुंबईचा आयकॉन प्लेअर आणि कप्तान होता तर धोनीला चेन्नईने खूप पैसे देऊन विकत घेतलं होत. मुंबईच्या टीमची मालकीण बाई नीता अंबानी म्हणजे पैशाकडन काही कमी नव्हती. सुरवातीपासून या दोनी टीममध्ये जास्त कोम्पिटेशन होती.

सुरवातीचे सिझन मुंबईने काही विशेष चमक दाखवली नाही. तसंही सचिन आणि कप्तानी हा मेळ कधी जुळून आला नव्हता. धोनी ने मात्र पहिल्याच सिझन मध्ये फायनलमधेय प्रवेश मिळवला होता. २०१०ला तर सचिन फुल फॉर्ममध्ये होता, मुंबई फायनल ला आली पण धोनीच्या चेन्नईने त्यांना हरवून पहिल्यांदाच आयपीएल ची ट्रॉफी उचलली.

सचिनच्या काळात निळ्या जर्सीमधली मुंबईची टीम खरोखरच्या ९०मधल्या भारतीय टीम प्रमाणे होती. फक्त सचिनवर अवलंबून असणारी आणि ऐनवेळी फायनलला कच खाणारी. पण धोनीची पिवळ्या जर्सीमधली टीम मात्र ऑस्ट्रेलियाप्रमाणे आक्रमक आणि चिकट होती. तिथून सलग चार वर्षे ते फायनल मध्ये होते आणि दोन वेळा चॅम्पीयन.

चेन्नईच्या यशामध्ये धोनी, रैना, अश्विन, जडेजा ,ब्राव्हो, हसी यांचं कोन्ट्रीब्युशन खूप होतं. धोनीचे सख्खे लाडके खेळाडू म्हणून ते ओळखले जात होते. त्यांचा फॉर्मनसला तरी धोनीने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी आयपीएलमध्ये त्याची परतफेड केली. मुंबई मात्र अजूनही आपली टीम व्यवस्थित बांधण्यात अपयशी ठरत होती.

२०१३साली मुंबईचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन रिकी पोंटिंगला देण्यात आल होत . जगातल्या आतापर्यंतच्या सर्वात आक्रमक आणि यशस्वी कॅप्टनमध्ये त्याचा समावेश होतो. पण त्याला पण विशेष काही जमलं नाही. अखेर मुंबईने हरभजन वगैरे अनुभवी खेळाडू ऐवजी आपल्या गावच्या पोराला म्हणजे रोहित शर्माला कप्तानी दिली.

रोहित शर्माने आयपीएल सुरवातीपासून गाजवलं होत. २००९ला हैद्राबाद कडून खेळताना आयपीएल ट्रॉफी उचलण्याचा त्याला अनुभव होता. बॉलिंग बॅटिंग सगळ्या क्षेत्रात त्याने आयपीएलवर राज्य केलं होतं. धोनीच्या चेन्नईला हरवून मुंबईला पहिली आयपीएल जिंकून दिली. मुंबई इंडियन्स फॅन्सना तीन वर्षापूर्वीच्या जखमा भरून निघाल्या प्रमाणे वाटलं.

ज्या प्रमाणे धोनीने सचिनला त्याच्या शेवटच्या वर्ल्ड कप सिरीज मध्ये ट्रॉफी जिंकून गिफ्ट दिली त्याप्रमाणे रोहित शर्माने सचिनला त्याच्या शेवटच्या आयपीएल सिझन मध्ये ट्रॉफी मिळवून दिली असं लोकं बोलले.

आता आयपीएल मध्ये रोहित शर्माच्या रुपात धोनीच्या चेन्नई सुपर किंगचं राज्य मोडून काढणारा मुंबईकर आला होता. आता पर्यंत मुंबईवर चेन्नईने थोडी फार कुरघोडी केली होती ती सगळी रोहित शर्माने मोडून काढली. मुबई इंडियन्सला नव्या दमाने त्याने उभे केले.

तिथून पुढे जेव्हा जेव्हा धोनी ची टीम मुंबईच्या समोर फायनल ला आली तेव्हा तेव्हा रोहित शर्माच्या टीमे ने त्यांना चारीमुंड्या चीत केले. २०१५ सालचं आयपीएल चेन्नई मुंबईकडून हरली. २०१६-१७ हे दोन सीजन चेन्नईला आयपीएल मधून बाहेर काढलं गेलं होत. २०१७ मध्ये रोहित शर्माच्या टीमने पुण्याच्या टीमला हरवून तिसऱ्यांदा आयपीएल चा करंडक उंचावला. विशेष म्हणजे धोनी यावेळी पुण्याकडून होता.

मागच्या वर्षी धोनीच्या चेन्नईने आयपीएल मध्ये कमबॅक केले तेही थाटात. त्यांनी आपली तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली.

यावर्षी सुरवातीपासून दोन्ही टीमची वाटचाल थोडी डळमळीतचं होती. धोनी च्या टीममध्ये सगळ्या म्हातार्या खेळाडूंचा समवेश होता पण तरी ते प्ले ऑफ पर्यंत पोहचले. तिथे मुंबईने त्यांना हरवले. त्याच वेळी दोन्ही साईडचे फॅन्स खुंखार झाले होते. whatsapp स्टेट्स, एफबी वरील मिम्स मधून एकमेकावर भरपूर चढाचढी झाली होती.

तरी चेन्नई फायनलला आलीच.  नेहमी कुल असणारा धोनी या आयपीएल वेळी चिडचिड करताना दिसला. फायनलच्या आधी मुंबई इंडियन्सचा सपोर्ट करणारी फेमस आज्जी पॅव्हेलीयनमध्ये बसलेली दिसत होती.

3fdf2e63 e16b 43a7 a457 1635c8e9b71b 1495537380 500

ही फायनल तर आतापर्यंतच्या फायनलपैकी सर्वात वादग्रस्त ठरली. सुरवातीपासून भरपूर ड्रामा या सामन्यात दिसला. मुंबईची सुरवात काही विशेष झाली नव्हती. रोहित शर्मासह सुरवातीचे पाच खेळाडू नुसता हजेरी लावून गेले होते. मुंबईचा गेल्या अनेक वर्षापासूनचा तारणहार पोलार्ड अखेर धावून आला. त्याने २५ बॉल मध्ये ४१ धावा कुटल्या. त्याच्याच जोरावर मुंबईला चेन्नईपुढे १५० धावाच आव्हान ठेवता आले. या इनिंग मध्ये पोलार्डने अंपायरने वाईड दिला नाही म्हणून केलेला वाद चर्चेचा विषय ठरला.

चेन्नईसाठी १५० धावा म्हणजे सोपे टार्गेट होते. ड्युप्लेसीसं ने चांगली सुरवात देखील करून दिली मात्र त्याच्या जाण्यानंतर चेन्नई गंडत गेली. वोटसन एका बाजूला विकेट टिकवून उभा होता मात्र त्याच्या समोर रायडू धोनी रैना वगैरे बाकीचे खेळाडू पटापट आउट होत होते. धोनीच्या आउट असण्यावरून देखील वाद झाले. थर्ड अंपायरच्या निर्णयावर देखील चेन्नईच्या फॅन्सनी आपत्ती दर्शवली. इकडे टीव्ही बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये प्रकरण हातघाईपर्यंत येऊन पोहचले.

इतक्यात रोहित शर्माने कृणाल पांड्याला ओव्हर देण्याचा डिसिजन चुकला आणि वॉटसनने सामना चेन्नई कडून फिरवला. अखेरच्या ओव्हर पर्यंत उत्सुकता ताणली. यावेळी मात्र रोहित शर्माने शहाणपणा केला आणि यापूर्वी महागड्या ठरलेल्या पण अनुभवी मलिंगाला शेवटची ओव्हर दिली. 

चेन्नईला जिंकण्यासाठी शेवटच्या बॉलला दोन धावा हव्या होत्या पण रोहित शर्मा आणि मलिंगाने सापळा रचला. मलिंगाने स्लोवर वन चं अस्त्र वापरल आणि चेन्नईचा शार्दुल ठाकूर शेवट बॉलला आउट झाला. व्हिसल पोडू चेन्नई परत मुंबईकडून एक रनने हरली.

जगातला सर्वोत्तम कुल कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा धोनी रोहित शर्मापुढे परत हताश ठरला. 

रोहित शर्माने चेन्नईची बरोबर नस ओळखली आहे. त्याच्या कॅप्टन सी मध्ये नाविन्य आहे. नव्या जुन्या खेळाडूंचा बरोबर कसा वापर करायचा त्याला ठाऊक आहे. शिवाय त्याच्या टीमला सचिन, जयवर्धने, रोबिन सिंग, झहीर खान अशा अनेक मार्गदर्शकांची टीम मदत करत आहे. याचा अर्थ असा नाही धोनी संपलाय पण मुंबईपुढे त्याच काहीच चालत नाही आहे,

काल पासून सोशल मिडियावर मुंबई आणि चेन्नई फॅॅॅन्सची भांडण चालली आहेत. या सामन्यावर बराच मोठा सट्टा लावला गेला होता असे म्हणतात. कॉर्पोरेट कंपन्यापासून ते मोबाईल गेम पर्यंत अनेक ठिकाणी खेळीमेळीत देखील पैजा लावण्यात आल्या होत्या. पण यापैकी अनेकांचा हृद्यभंग झाला.

गेल्या काही वर्षात आयपीएलची क्रेझ कमी होत चालली आहे असं म्हटल जात होत पण कालच्या मॅचने सगळ खोट ठरवलं. मुंबई-चेन्नईसारख्या रायव्हलरीमुळे आयपीएलची लोकप्रियता आजूनही टिकून आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.