“हिट एन्ड रन” मधून वाचवणाऱ्यासाठी सलमान एक गाणं राखून ठेवतोच ?

२७ मार्च १९९८, सलमान खानचा नवीन सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पाठचा भाऊ अरबाज खानने देखील यात सलमान बरोबर काम केलेलं आणि त्याचा सगळ्यात छोटा भाऊ सोहेल खान या सिनेमाचा लेखक,दिग्दर्शक,निर्माता सर्व काही होता. म्हणजेच सलमानचा घरचा हा सिनेमा होता. नाव होतं,

“प्यार किया तो डरना क्या?”

पहिल्यांदाच सलमान आणि काजोल ही जोडी पडद्यावर एकत्र दिसणार होती. शिवाय धर्मेंद्र, अशोक सराफ वगैरे दिग्गज मंडळी सुद्धा होती. तसं म्हटल तर सलमानचं करीयर काही भारी चालेलं नव्हत. हम आपके है कौन नंतर त्याचा एकही सुपरहिट सिनेमा आलेला नव्हता. त्याच्या सेटवर लेट येणे, छोट्या छोट्या कारणावरून तमाशा करणे वगैरे सवयीमुळे मोठ्या बनरचे सिनेमे ऑफर होत नव्हते.

प्यार किया तो डरना क्या मध्ये सलमानने आपल्या अनेक मित्रांना चान्स दिला होता. पुढे त्याची बडे दिलवाला ही इमेज झाली त्याची सुरवात या सिनेमापासून झाली.

सुरवातीला सिनेमाचं संगीत त्याकाळचे नंबर वन संगीतकार जतीन ललित देणारं होते पण नंतर सलमानच्या इच्छेखातर हिमेश रेशमिया, साजिद वाजीद या नवोदित संगीतकारांना देखील चान्स मिळाला. पिक्चरमधली ओढली चुनरिया, दिवाना मै चला, तेरी जवानी मस्त मस्त है वगैरे गाणी खूप गाजली. त्यातही एक विशेष गाजलं,

समुद्रकिनाऱ्यावरच्या स्टेज पाठीमागे स्पोर्ट्स बाईक लावलेली. गिटार वाजवत आलेला सल्लू अंगावर फक्त एक चिंधी झालेली पँट घालून गात असतो,

दोस्तों, ना कोई मंजिल है, ना कोई साथी है फिर भी निकल पड़ा हूँ घर से शायद जिसकी तलाश है वही साथी है, वही मंज़िल है”

त्यानंतर आवाज येतो “ओ ओ जाने जाना”

या गाण्यामुळे पब्लिकला अक्षरशः वेड लागण्याची वेळ आली होती. सलमान खानची बॉडी ही त्याची युएसपी आहे ते या गाण्यामुळे  सिद्ध झाले. भाई फॅन्ससाठी हे गाण म्हणजे अॅन्थम बनलं.

खर तर हा आवाज होता कमाल खान या सिंगरचा. म्हणजे आपला देशद्रोही केआरके नव्हे. तो वेगळा आणि हा वेगळा. ब्रिटन मध्ये भारतीय आईवडिलांच्या पोटी जन्मलेला हा कार्टा तिथे राहून हिंदी अल्बमची गाणी बनवायचा. त्यातच त्याने हे ओ ओ जाने जाना हे गाण बनवलं होत. ते गाण तिथ चांगलंचं हिट झालं. ब्रिटनच्या चार्टबस्टरवर गाण चांगलंचं गाजलं.

सोहेल खान जेव्हा प्यार किया तो डरना क्याची तयारी करत होता तेव्हा त्याला कोणीतरी हे गाण ऐकवलं. सोहेल ने ते सलमान ला ऐकवलं. सल्लूसुद्धा गाण्यावर खुश झाला. कमाल खानला मुंबईला पाचारण करण्यात आलं. त्याच गाण ऑफिशियली विकत घेण्यात आलं. सलमानला बघूनच कमाल खान स्वर्गात पोहचला होता.

कमालच्या गाण्याचे शब्द थोडे फार बदलण्यात आले, जतीन ललितने संगीत अरेंज करताना आपला टच दिला. कमाल खाननेच गाण गायलं पण गाण्याची जादू पहिल्यापेक्षा शंभर पटीने जास्त होती. गाण सुपरहिट झालं. कमाल खानला फिल्मफेअर मिळालं. तो काही खूप चांगला गायक होता असं नाही पण त्याचा आवाज सलमानला सुट झाला होता.

सलमान, सोहेलने चान्स दिला म्हणून कमाल आयुष्यभरासाठी त्यांच्या उपकाराखाली राहिला. सलमानने देखील आपले कृपाछत्र त्याच्यावरून ढळू दिल नाही.

कही प्यार ना हो जाये मधलं “सांवरीया रे ओ सांवरीया”, ओ प्रिया ओ प्रिया, तेरे नाम मधलं, “ओ जाना” एवढचं नाही तर एआर रेहमानचं संगीत असलेल्या दिल ने जिसे आपणा कहा या सिनेमातही सलमानच्या आग्रहामुळे कमालला एक गाण मिळालं.  सलमानच्या प्रत्येक सिनेमात कमालला एक तरी गाण असायचंचं. त्याच्या खास मित्रांमध्ये कमाल खानचा समावेश व्हायला लागला होता. काहीजण कुत्सितपणे सलमानचा चमचा अस त्याच्या गँगला ओळखू लागले होते.

अशातच एक घटना घडली. 

२८ सप्टेंबर २००२ , रात्रीच्या वेळी बातमी आली सलमानच्या लँड क्रुझर गाडीने बांद्राच्या फुटपाथवर गाडी चढवली. यात एकाचा मृत्यू झाला. यावेळी सलमानसोबत त्याचा बॉडीगार्ड कॉन्स्टेबल रविंद्र पाटील आणि गायक कमाल खान हे देखील गाडीत होते. कमाल खान अपघात झाल्या झाल्या सलमानसोबत त्याच्या घरी पळून गेला . 

नंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने मान्य केले की सलमान आणि तो सोबत रेन हॉटेलमध्ये गेला होता . मध्यरात्री तिथून घरी परतताना सलमान स्वतः कार चालवत होता, मी त्याच्या मागच्या सिटवर बसलो होतो. सेंटआंड्र्यू जवळून हिल रोड वर वळताना सलमानचा कंट्रोलसुटला आणि त्याने फुटपाथवर गाडी चढवली. 

एवढे सगळे घडले . कमाल खान हा प्रत्यक्षदर्शी पुरावा होता तरी कधीच त्याला कोर्टात उभं केलं गेलं नाही. कमाल तिथून सरळ लंडनला निघून गेला होता. काही वर्षापूर्वी तर सलमानच्या ड्रायव्हरने मान्य केलं की सलमान नव्हे तर मी कार चालवत होतो. घटनास्थळी हजर असणारा आणखी एक पुरावा हवालदार रविंद्र पाटील यांचा काही वर्षापूर्वी रस्त्यावर भिकाऱ्याप्रमाणे विपन्नावस्थेत मृत्यू आला.

कमाल खान मात्र याबाबतीत सुदैवी ठरला. परत कधीच कोणीही त्याला त्या रात्री बद्दल विचारलं नाही. आजही सलमान  आपल्या वॉन्टेड, ट्यूबलाईट, रेस 3 अशा सिनेमामध्ये कमाल खान साठी एक गाण ठेवतोच. २००५ साली सनी देओलच्या जो बोले सौ निहाल सिनेमामध्ये व्हिलनचा रोल करण्याची संधी त्याला मिळाली. सलमानची वहिनी मलाईका अरोराची धाकटी बहीण अमृता अरोरासोबत डेटिंग करण्याचा चान्स ही त्याला मिळाला.

आजही कमाल खान इंग्लंडचा नागरिक आहे. वेगवेगळ्या स्टेज शोमध्ये लग्नात ओ ओ जाने जाना गाऊन पोट भरतोय. कधी मधी सलमान बोलवल्यावर भारतात येऊन गाणं म्हणून निघून जातो. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.