लेकीच्या शॉपिंगच्या हौसेखातर शहाजहानने उभारला चांदणी चौक !

लई वर्षापूर्वी एक राजा होता. शाहजहान त्याचं नाव. गडी लई रोमांटीक. बायकोवर येवढं प्रेम केलं की तिच्या आठवणीखातर जगातली सगळ्यात देखणी इमारत म्हणजेच ताजमहल बांधला. अहो बांधणारच की. हिंदुस्तानचा बादशाह होता तो. पैसा पण बक्कळ असणारे भाऊकडं. आता त्यान स्टँँडर्ड  एवढा मोठा सेट करून ठेवलाय की गरीब माणसान प्रेम करावं की नको असाच विषय.

तर या शहाजहाननं फक्त बॉयफ्रेंड लोकांनाच नव्हे तर बाप लोकांना पण लाज वाटावी असलं एक काम केलय.

शाहजहान आणि मुमताजमहल या नवरा बायकोला १४ पोरबाळ झाली. यात सगळ्यात थोरली होती जहांआरा बेगम. शहजादा दाराशुकोह आणि पुढे आलमगीर बनलेला औरंगजेब तिच्याहून धाकटे. बादशाहची ती अतिशय लाडकी होती. आजच्या इंस्टाग्रामच्या युगात तिचा स्टेट्स खरोखरच #पापा_कि_प्यारी_प्रिन्सेस असं असत.

जगातल्या कुठल्या बापानं केले नसतील तेवढे लाड जहांआराचे झाले होते. ती लहानपणापासूनच चुणचुणीत होती. तिच्या शिक्षणासाठी खास शिक्षिका असायच्या. अरबी आणि फारसी भाषा मध्ये ती मास्टर होती. खुद्द शहाजहान असो किंवा त्याच्या नंतर बादशाह झालेला औरंगजेब असो आपल्या राजकीय निर्णयाच्या बाबतीत जहांआराचा सल्ला घायचे इतकी ती हुशार होती. जहांआरा फक्त बुद्धीनेच नव्हे तर दिसायलासुद्धा आपल्या आईसारखी सुंदर होती.

io3H58UQz9V4fLcp Jahanara Begum
शहाजहानची लाडकी मुलगी जहांआरा बेगम

त्याकाळात मुघलांची राजधानी आग्रा होती. शहाजहानची इच्छा होती की शेकडो वर्ष भारताची राजधानी असलेली दिल्ली आपली सुद्धा राजधानी असावी . रसिक माणूस तो. त्यान दिल्ली “शहाजहानाबाद” या नावाने नव्याने घडवायला सुरवात केली. तिच्या सभोवताली तटबंदी बांधली. आत येण्यासाठी दरवाजे बांधले. साम्राज्याचा मुख्य राजवाडा म्हणून लालकिल्ला बांधला. भारतातली सगळ्यात मोठी मशीद म्हणून ओळखली जाणारी जामा मशीद बांधली. मुघलवैभवाला शोभेल अशी संपन्न राजधानी त्याने वसवली.

एक दिवस शहाजहानला आठवले की आपल्या लेकीला शॉपिंगची खूप आवड आहे. आता खुद्द बादशहाची पोरगी होती ती. आपल्या पोरीला जे हवे ते एकाच ठिकाणी मिळावे आणि त्यासाठी तिला खूप लांबसुद्धा जावे लागू नये म्हणून बादशाहने लाल किल्ल्यासमोर मुलींना लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळणारा बाजारच वसवला. त्याकाळातला शॉपिंग मालच म्हणा ना. हा बाजार कसा असावा याचं डिझाईनसुद्धा जहांआराकडून बनवून घेण्यात आलं.

१६६०साली हा बाजार सुरु झाला. त्याच्या मधोमध एक छोटासा तलाव होता. या तलावाला जोडणारा कालवा आणि सभोवती एकूण पंधराशे साठ दुकाने अश्या चांदणीच्या आकाराच्या या बाजाराला नाव मिळाले चांदणी चौक बाजार. काही जन म्हणतात की तलावात पडणाऱ्या चंद्रप्रकाशामुळे त्याचं नाव चांदणीचौक पडले. काही जन म्हणतात की बाजारातल्या चांदीच्या व्यापाऱ्यांमुळे चांदणीचौक बाजार म्हणण्यात येऊ लागले.

आज तिथे तो तलाव नाही.पण आजही चांदणी चौक त्याच दिमाखात उभा आहे. चांदणी चौकात काय मिळत नाही ते विचारा. हिऱ्यामोत्यांच्या जवाहिरयापासून ते फनी कंगव्यापर्यंत सगळ्या गोष्टी इथे मिळतात.  मुघल काळातल्या पोरीबाळी ज्या हौसेने खरेदी करायला जात असतील त्याच हौसेने आजकालच्या मॉडर्न पोरी चांदणीचौकाकडे धाव घेतात आणि भरघोस शॉपिंग केल्यावर लागलेल्या भुकेची आग शमवण्यासाठी चांदणी चौकची खाऊ गल्ली वर्ल्ड फेमस आहे.

चांदणी चौकमध्ये जगातलं सर्वात समृद्ध असं फूड कल्चर पहावयास मिळत. अस्सल मुघलाई खाणं तुम्हाला इथेच भेटनार. कभी खुशी कभी गम मध्ये दाखवल्याप्रमाणे इथले सुप्रसिद्ध हलवाई असतील किंवा आलूचाट भांडार असेल खाण्याची रेलचेल चांदणी चौकात पहायला मिळते. इथे कोणत्या धर्माचा भेदभाव नाही. दिवाळी आणि ईद या दोन्ही सणाला बाजाराची रौनक सारखीच असते.

खुद्द शहाजहाननं हा बाजार बांधत असताना धार्मिकता आड येऊ दिली नाही. “लाल मंदिर” म्हणून सुप्रसिद्ध असलेलं जैन मंदिर शाहजहानच्या काळात लाल किल्ल्याच्या समोर चांदणीचौक मध्ये बांधण्यात आलं. मराठ्यांनी बांधलेलं “गौरीशंकर मंदिर” असेल किंवा गुरु तेग बहाद्दूर यांचा “सीस गंजसाहिब  गुरुद्वारा” असेल किंवा “फत्तेहपूरी मशीद” असेल, भारताचा खरा सर्वधर्मसमभाव चांदणीचौकातुनच दिसतो.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा चांदणी चौकाला साक्ष आहे. जहांआराने बांधलेल्या कारवानसराईच्या जागी आज दिल्ली टाऊन हॉल उभा आहे.

असा हा चांदणीचौक आणि अशी ही त्याची कहाणी.

खास भिडू लोकांसाठी टीप – जर तुमची पण गर्लफ्रेंड तुमच्या गिफ्टला हिणवण्यासाठी ताजमहलच उदाहरण देत असेल तर तुम्ही सुद्धा तिच्या पप्पाने शॉपिंगसाठी चांदणीचौक बांधला नाही याची आठवण करून देऊ शकता.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.