आमदारकीचं तिकीट अवघ्या ३ दिवसांत कापलं पण शरद रणपिसेंनी काँग्रेस सोडली नाही…

अलीकडील प्रॅक्टिकल राजकारणाच्या काळात पक्षाकडून एखाद्या उमेदवाराला जर तिकीट दिले नाही, तर संबंधित उमेदवार लगेचच दुसरा विचार करतात. आपल्या मतदारसंघाचं राजकारण, कार्यकर्ते या सगळ्याचा विचार करून उमेदवार निर्णय घेत असतात. मात्र याला काँग्रेसचे मागच्या ५ दशकांपासून निष्ठावंत असेलेले शरद रणपिसे अपवाद ठरले होते.

कारण विधानपरिषदेवर आमदार असलेले रणपिसे यांचं मिळालेले तिकीट अखेरच्या ३ दिवसात कापलं गेलं होतं, मात्र तरीही त्यांनी आपला पक्ष सोडला नव्हता.

१९५१ साली जन्म झालेल्या शरद रणपिसे यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात रस होता. परिणामी ते अगदी ७० च्या दशकापासून म्हणजे अवघ्या २० व्या वर्षी काँग्रेस सोबत जोडले गेले. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केल्याने काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखलं जात होते.

१९७३ साली ते अवघ्या २२ व्या वर्षी प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी झाले. त्या काळात त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा सगळ्यांसोबत अगदी जवळून काम केले. यातूनच त्यांना १९८५ साली पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले. यात ते भाजपच्या विश्वास कृष्णराव गांगुर्डे यांना ८ हजार मतांनी पराभूत करून विधानसभेत पोहोचले होते.

त्यानंतर १९९० साली देखील रणपिसे यांनी गांगुर्डे यांना १० हजार मतांनी पराभूत करून दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीत मात्र भाजपच्या दिलीप कांबळे यांच्याकडून तब्बल २२ हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र निकालाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा लोकांमध्ये मिसळण्यास सुरुवात केली होती. 

त्यांच्या याच लोकसंपर्कामुळे पक्षाने देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. २००२ साली शरद रणपिसे यांना पहिल्यांदा विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. त्यानंतर पुढे २०१२ आणि २०१८ मध्ये रणपिसे यांना काँग्रेसकडून तिसऱ्यांदा विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. ते सध्या काँग्रेसचे गटनेते होते.

मात्र या सगळ्या राजकीय प्रवासा दरम्यान रणपिसे यांचं एकदा मिळालेल तिकीट देखील कापलं गेलं होतं. स्वतः रणपिसे यांनी याबाबतचा किस्सा सांगितला होता.

त्याच झालेलं असं कि रणपिसे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून बिहार, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आणि माजी आमदार राम प्रधान यांनी सोनिया गांधींकडे शब्द टाकला होता. सोनिया गांधींनीही राम प्रधान यांच्या शब्दावरून रणपिसे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता.

इतकंच नाही तर शरद रणपिसेंसारखा उमेदवार आपल्याकडे नसल्याचंही त्यांनी म्हटलं असल्याची आठवण रणपिसे सांगायचे. 

पण त्यानंतर रणपिसे मुंबईत येण्याच्या ३ दिवस आधीच काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनी रणपिसे यांचं विधानपरिषदेच तिकीट कापलं.

सोनिया गांधींनी रणपिसे यांचं तिकिट फायनल केलेलं असतानाही तेव्हाच्या प्रदेशाध्यक्षांनी रणपिसे यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यावेळी रणपिसे बरेच नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यातून ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा काँग्रेस आणि पुण्याच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाल्या होत्या. मात्र तरीही रणपिसे यांनी आपण अंतिम क्षणापर्यंत काँग्रेससोबत राहू असं म्हणतं या चर्चांवर पडदा टाकला होता.

मात्र त्यावेळी रणपिसे यांनी हे प्रदेशाध्यक्ष कोण, त्यांचं नाव उघड केलं नव्हतं. रणपिसे या सगळा किस्सा सांगतं असताना सभागृहात काँग्रेस नेते अशोक चव्हाण देखील बसलेले होते. त्यांच्यासमोरच रणपिसे यांनी हि गोष्ट सांगितली होती. मात्र त्यावेळी अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष नव्हते, असं रणपिसे यांनी लागलीच स्पष्ट करून टाकलं होतं.

त्यामुळे हा रोख त्यावेळी माणिकराव ठाकरे यांच्याकडे वळला होता. त्यावेळी माणिकराव ठाकरे हेच प्रदेशाध्यक्ष होते, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं पुढे आलं होतं. त्यामुळे रणपिसे यांना माणिकराव ठाकरे यांनीच डावलल्याचं बोललं जात होतं.

पण या सगळ्या घडामोडीनंतर देखील रणपिसे यांनी वेगळा विचार केला नव्हता. ते म्हंटल्याप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षासोबत राहिले. आज आमदार शरद रणपिसे यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.