पवारांच्या पावसातल्या गाजलेल्या सभेनंतरही साताऱ्यातला एक उमेदवार पडला होता.

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुका सुरु होत्या. तेव्हा सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. उदयन महाराज भाजपमध्ये जाऊन निवडणुकीला उतरले होते. त्यांना हरवण्यासाठी पवारांनी आपल्या खास मित्राला निवडणुकीला उतरवलं. श्रीनिवास पाटील.

१८ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा जंगी झाली. धो धो पावसातही त्यांनी ती सभा गाजवली. पवारांच्या पावसातल्या सभेने मरगळलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ दिले. संपूर्ण राज्यात चित्र पालटलं. आजही अनेक नेते पवारांच्या पावसातल्या सभेची कॉपी करू पाहतात.

पण गंमत म्हणजे ही पावसातली सभा ज्या नेत्यांच्या प्रचारासाठी झाली झाली होती त्यापैकी एक उमेदवार मात्र पडला होता आणि त्याचा पराभव पवारांच्या जिव्हारी लागला होता.

ते होते शशिकांत शिंदे.  

नुकताच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालात दिग्गजांनाच धक्का बसला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जातो. शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीतीलच ज्ञानदेव रांजणे हे जेमतेम ताकद असलेले उमेदवार उभे होते. मात्र त्यांना जिल्ह्य़ातील आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे उघडपणे बोलल जात होतं.

केवळ एका मताने शिंदेंचा पराभव झाला. विधानसभे पाठोपाठ त्यांचा हा सलग दुसरा मोठा पराभव आहे. त्यांचा पराभव होताच त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयावर दगडफेक करत जोरदार हल्ला चढवला. तसेच पक्षाच्याच जिल्हा तसेच राज्य पातळीवरील नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावर शशिकांत शिंदेनी जाहीर माफी मागितली. ते म्हंटले,

माझ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रयत्न केले. पण, मी एका मताने पराभूत झालो, तो पराभव मी स्वीकारतो. शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, शरद पवार यांनाही ते माहिती आहे.

मी एकनिष्ठ कार्यकर्ता असून त्यांच्यासाठी जीव देईन.

हे वाक्य ऐकलं की शशिकांत शिंदे आणि शरद पवारांची एक जुनी आठवण आठ्वतेच आठवते. आणि मग समजत का शिंदे शरद पवारांसाठी जीव देऊ शकतात

शरद पवारांची साताऱ्यातील १८ ऑक्टोबर २०१९ ची सभा ऐतिहासिक कोण विसरेल. धो धो पावसात चिंब भिजत हजारोंच्या संख्येने उपस्थित राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या जनतेला शरद पवारांनी संबोधित केल्यानंतर ते थेट साताऱ्यातील हॉटेल प्रितीमध्ये गेले होते. कशासाठी ?

शशिकांत शिंदेंच्या बड्डेचा केक कापायला.

ही घटना सांगते कि साताऱ्याचे शशिकांत शिंदे शरद पवारांच्या किती जवळचे आहेत ते.

शशिकांत शिंदे पदवीधर असून माथाडी कामगारांचे नेते म्हणून पुढं आले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेचं तिकीट देऊ केलं. मग हे महोदय अगदी वाजत गाजत पहिल्यांदाच जावळीच्या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले.

विशेष असं सांगायच तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी साताऱ्यात आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं. आपल्या आमदारकीच्या १३ वर्षांच्या काळात शिंदेंनी जलसंपदा मंत्री पदापर्यंत मजल मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष होते.

पुढं साताऱ्याच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी सलग २००९ आणि २०१४ मध्ये प्रतिनिधित्व केलं. आज ही माथाडी कामगारांचा नेता म्हणून शशिकांत शिंदेंची ओळख आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जनता दरबार घेण्याची पद्धत हे शशिकांत शिंदेंच आगळचं वैशिष्ट्य आहे.

असे हे शिंदे शरद पवारांचे पण लाडके आहेत. मग साताऱ्यात असताना शशिकांत शिंदेंचा वाढदिवस आणि पवारसाहेब जाणार नाहीत असं तर घडणार नाही.

त्या दिवशी घडलं असं होत की ….

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता सभा आदल्या रात्री साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर झाली होती. त्या आधी पाटण तालुक्‍यातील मल्हारपेठ मध्ये शरद पवार यांची सभा होती. ही सभा संपवून साताऱ्यात येण्यासाठी पवार यांना थोडा उशीरच झाला. पण सायंकाळी पाच वाजल्यापासून पवारांची वाट पाहात जिल्हा परिषदेच्या मैदानावर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक थांबले होते.

साताऱ्यातील सभा सुरू व्हायला आणि पाऊस यायला एकच वेळ झाली. पवारांचे सभेच्या ठिकाणी आगमन झाले आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत राष्ट्रवादीच्या गाण्यावर ताल धरला. वरून पडणारा पाऊस आणि मैदानात बसलेले कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून शरद पवार ही भारावून गेले. पावसामुळे आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली भाषणे थोडक्‍यात उरकली. तोपर्यंत पावसाने जोरात सुरवात केली.

त्यानंतर पवारांचं भाषण सुरू झालं. पावसातच पवार यांनी भाषण करून उपस्थितांना इतिहास घडविण्याचा सल्ला दिला. सभा संपल्यावर चिंब भिजलेल्या अवस्थेत हॉटेल प्रिती मध्ये आले. तिथं त्यांनी सर्व आवरून पुन्हा तयार झाले. त्यांनी जेवण घेतले, तोपर्यंत अकरा वाजले होते.

कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस असल्याचे त्यांना समजलं. पवार तडक शिंदेकडे गेले. त्यांनी रात्री बारा वाजता आमदार शिंदेंचा वाढदिवस साजरा केला. पवारांच्या उपस्थित केक कापण्यात आला. रात्री भिजत सभा ऐकलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी झोपेत होते. पण पवार मात्र, लवकर उठून प्रचारासाठी रवानाही झाले होते. या बड्डेच्या सरप्राईजने शशिकांत शिंदे नक्कीच हेवनली फिल करत होते पण याचा काही उपयोग झाला नाही. 

एवढी शरद पवारांची सभा होऊन बड्डे होऊन सुद्धा, विधानसभेला शिवसेनेच्या महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंचा पराभव केलाच.  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.