ठाकरेंकडे कार्यकर्ते तर शिंदेंकडे लोकप्रतिनिधी… निवडणूक आयोगाकडे कुणी काय दावे केले?
शिवसेना पक्षातून बाहेर पडलेला शिंदेगट सत्तेत बसला आणि त्यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला. शिवसेना हा पक्ष आणि त्याचं चिन्ह असलेला धनुष्यबाण हा आपल्याला मिळावा अशी त्यांची मागणी आहे. हे सर्व प्रकरण निवडणूक आयोगासमोर आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी आजचा दिवस ही शेवटचा असल्याचं सांगितलं होतं.
आज दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर आपापला लेखी युक्तिवाद सादर केलाय. दरम्यान, या युक्तिवादात दोन्ही गटांकडून काय म्हटलं गेलंय ते बघुया.
आधी ठाकरे गटाकडून लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला. या युक्तीवादामध्ये ठाकरे गटाने शिवसेना हा पक्ष आपलाच असल्याचा दावा केलाय. केवळ खासदार, आमदार आणि नेते सोडून गेले म्हणजे पक्ष संपला असं होत नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
अगदी कुठल्याही पातळीवर तपासलं तरी न्यायाची बाजू ही आमचीच असल्याचं ठाकरे गटानं म्हटलंय.
११२ पानांच्या युक्तिावादात ठाकरे गटाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडाची माहिती दिलीये. अगदी २० जून २०२२ म्हणजे ज्या रात्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला रवाना झाले होते तो दिवस. याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं मुख्य नेतेपद हे शिवसेना पक्षाच्या घटनेत नाही आहे असा दावाही ठाकरे गटाने केलाय.
आपली बाजू बरोबर आहे हे सांगतानाच या लेखी युक्तिवादात ठाकरे गटाने शिंदेगटाचा पक्ष आणि पक्षचिन्हावरचा दावाही चुकीचा असल्याचंही म्हटलंय.
शिवाय ठाकरे गटाचे नेते अॅडव्होकेट अनिल परब यांनी माध्यमांसमोर ठाकरे गटाची बाजू मांडली आहे. त्यावेळी ते म्हणाले,
“पक्ष हा आमदार, खासदार, नेत्यांचा नसून तो कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा असतो. त्यासंदर्भातले पुरावे आम्ही निवडणूक आयोगासमोर सादर केले आहेत. जवळपास ३ लाख पदाधिकारी आणि २० लाख प्राथमिक सदस्यांचं प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलंय त्यामुळे, आमची बाजू सत्याची आणि योग्य असल्यानं निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे.”
‘१० व्या शेड्युल नुसार या लोकांनी पक्ष सोडला, त्यामुळे ते पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत’ असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
ही झाली ठाकरे गटाची बाजू… शिंदेगटाने लेखी युक्तिवादात काय म्हटलंय ते बघुया.
काय म्हटलंय हे बघण्यापुर्वी एक गोष्ट म्हणजे शिंदेगटाने लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी शेवटचा तास बाकी असेपर्यंतही युक्तिवाद सादर केला नव्हता. अगदी काही मिनीटं शिल्लक असताना शिंदेगटाकडून लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला.
शिंदे गटाचा युक्तीवाद हा १२४ पानांचा आहे. शिंदे गटाने अगदी थेटपणे आकड्यांचा मुद्दा मांडलाय.
लोकप्रतिनिधींची संख्या ही आमच्याकडे अधिक आहे. त्यामुळे, पक्ष आणि पक्षचिन्ह यावर आमचा अधिकार असल्याचा दावा शिंदेगटाकडून करण्यात आलाय.निवडणूक आयोगानेही निकाल देताना संख्याबळ लक्षात घ्यावं अशी विनंतीही शिंदे गटाकडून करण्यात आलीये.
तर संघटनात्मक पक्षाचा ठाकरे गटाचा दावा अयोग्य कारण निवडी लोकशाहीला धरून नाहीत असा दावा शिंदेगटाने केलाय.
शिंदेगटाने ४० शिवसेना नेते, ६ उपनेते, १३ खासदार, ४० आमदार, ४९ जिल्हाप्रमुख, ८७ विभाग प्रमुख असे प्रतिनिधी सभेतले लोक आपल्या बाजूने आहेत असं शिंदेगटाने म्हटलंय.
कोणत्या गटाने किती प्रतिज्ञापत्र सादर केली?
ठाकरे गटाने आतापर्यंत १६० राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, २,८२,९७५ संघटनात्मक प्रतिनिधी, १९,२१,८१५ प्राथमिक सदस्य अशा एकूण २२,२९५० पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र ही निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत.
शिंदेगटाने आतापर्यंत १२ खासदार, ४० आमदार, ७११ संघटनात्मक प्रतिनिधी, २०४६ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि ४,४८,३१८ प्राथमिक सदस्य अशा ४,५१,१२७ पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत.
हे ही वाच भिडू:
- शिंदे गट जिंकणार असा दावा होतोय ती ‘सादिक अली’ केस काय होती ?
- शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या भांडणात भाजपने डाव साधलाय का ?
- शरद, मुलायम, लालूप्रसाद : यादव त्रिकुटीशिवाय ओबीसी राजकारण संपणार ?