ठाकरेंची साथ न सोडलेल्या १६ आमदारांची ही यादी…

शिवसेनेत बंडखोरी झाली… आमदार सुरतला गेले. त्यादिवशी सगळ्यात पहिला आकडा कानावर आला होता १२ आमदार. दिवस सरला तसा आकडा वाढत गेला, मग आमदार सुरतहून गुवाहाटीला गेले.

या सगळ्याला आता आठवडा उलटला आणि गुवाहाटीत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची संख्या झाली ४०.

२०१९ च्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार निवडून आले ५६, त्यातल्या आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानं ही संख्या झाली ५५. मग पोटनिवडणूक झाली आणि ठाकरेंकडून निवडणूक लढवलेल्या ऋतुजा लटके विजयी झाल्या.

आता ही सगळी आकडेवारी मांडण्याचं कारण काय? तर, शिंदे गटातले म्हणजे ज्यांना निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव दिलंय त्या पक्षातले खासदार कृपाल तुमाने यांनी ठाकरेंकडचे आणखी १० आमदार आमच्याकडे येतील असं वक्तव्य केलंय. ते म्हणाले,

“दसऱ्याच्या वेळेसच दोन्ही खासदार आमच्यासोबत येणार होते. मात्र तेव्हा न आलेले २ खासदार आणि १० आमदार हे आमच्यासाबेत तुम्हाला दिसतील. त्यांनी आमच्याच चिंन्हावर निवडणूक लढवली असून ते आमचेच आहेत.”

मग प्रश्न पडतो, की उद्धव ठाकरेंसोबत सध्या आहे तरी कोण ? बंडाचं पेव फुटलेलं असताना या १६ आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्यामागं नेमकी कारणं काय आहेत ?

१) आदित्य ठाकरे –

या प्रश्नाचं सगळ्यात साहजिक उत्तर म्हणजे आदित्य ठाकरे. युवासेना प्रमुख असलेले आदित्य हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. पाहिल्याच आमदारकीत त्यांना मंत्रिपद मिळालं, पण त्याही पलीकडे ‘ठाकरे’ असण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहेच.

२) सुनील राऊत –

नैतिकतेचं दडपण असणारं दुसरं नाव म्हणजे सुनील राऊत. विक्रोळीतून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले सुनील राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू. आपले बंधू शिवसेनेचा किल्ला लढवत असताना, बंडखोर आमदार बंडखोरीसाठी संजय राऊत यांना जबाबदार धरत असताना सुनील राऊत यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहणं स्वाभाविक आहे.

३) नितीन देशमुख –

एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेल्यानंतर चर्चेत आलेलं पहिलं नाव होतं, ते म्हणजे नितीन देशमुख. त्यांच्या पत्नीनं देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यात त्यांना हार्ट अटॅक आल्याची बातमीही आली. मात्र दोनच दिवसांनी देशमुख राज्यात परतले.

त्यांनी आपल्याला जबरदस्ती तिकडे नेल्याचा, अटॅक आल्याचा बनाव रचल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेत त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं जाहीर केलं. देशमुख हे अकोल्यातल्या बाळापूर मतदारसंघाचे आमदार असून, ही त्यांची आमदारकीची पहिलीच टर्म आहे.

४) कैलास पाटील –

उस्मानाबादचे कैलास पाटीलही २०१९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. शिंदे गटातले आमदार सुरतला जात असताना, आपण लघुशंकेचं कारण सांगून तिथून सुटका करुन घेतली आणि कधी चालत, तर कधी ट्र्कमधून मुंबई गाठली आणि उद्धव ठाकरेंना भेटलो आणि आता त्यांच्यासोबतच राहणार आहोत, असं कैलास पाटील यांनी सांगितलेलं.

५) राहुल पाटील –

सोमवारी दुपारी एक बातमी आली, ती म्हणजे परभणीचे आमदार राहुल पाटील गुवाहाटीला जाणार. मात्र काही तासांनीच खुद्द राहुल पाटील यांनीच या बातमीचं खंडन केलं.

१९९० पासून परभणीत शिवसेनेचं वर्चस्व आहे. परभणीतून पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराला हरवलं होतं, तर २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारचा मोठा मताधिक्यानं पराभव केला होता.

६) अजय चौधरी –

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर लगोलग चर्चेत आलेली काही नावं होती, त्यात अजय चौधरी यांचं नाव होतं. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंवर पहिली कारवाई केली, ती म्हणजे त्यांना गटनेतेपदावरुन हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती झाली.

२०१४ मध्ये चौधरी शिवडी मतदारसंघातून निवडून गेले, या यशाची पुनरावृत्ती त्यांनी २०१९ मध्येही केली. विभागप्रमुख पदापासून सुरुवात करणारे चौधरी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

७) सुनील प्रभू –

मुंबईचे माजी महापौर असणारे सुनील प्रभू, शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांचे खाजगी सचिव म्हणून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या प्रभू यांना शिवसेनेनं नगरसेवकपदाची संधी दिली. ४ वेळा नगरसेवक झाल्यानंतर, त्यांनी मुंबईच्या महापौरपदापर्यंत मजल मारली.

२०१४ मध्ये दिंडोशी मतदारसंघातून ते आमदार झाले आणि २०१९ मध्ये त्यांनी ४४ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. शिवसेनेनं त्यांच्यावर सध्या मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी दिली आहे.

८) उदयसिंग राजपुत –

कन्नडचे आमदार उदयसिंग राजपुत यांचं शिवसेनेसोबत असलेलं नातं तसं इंटरेस्टिंग आहे. कन्नडमधून ते २००४ ला अपक्ष म्हणून लढले आणि अवघ्या २ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून लढले आणि यावेळी ४ हजार मतांनी पराभव झाला. २००९ मध्ये बाजी मारलेली मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी.

२०१४ मध्ये हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेनं तिकीट दिलं, तर राजपुत यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. या निवडणुकीत राजपूत फक्त दीड हजार मतांनी पराभूत झाले.

२०१९ मध्ये त्यांना शिवसेनेनं संधी दिली आणि आपल्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधवांचा १९ हजार मतांनी पराभव करत यश मिळवलंच.

बंडखोरीच्या चर्चा सुरू असताना, त्यांनी उद्धव ठाकरेंना किमान १५ वेळा वर्षावर भेटलो, त्यांच्यामुळेच विधानसभेत जायची संधी मिळाली, असं वक्तव्य केलं होतं.

९) रमेश कोरगावकर –

भांडुप वेस्ट या शिवसेनेच्या पूर्वापारच्या बालेकिल्ल्यातून निवडून आलेलय रमेश कोरगावकर यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे. २००२ मध्ये पहिल्यांदा त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला होता. ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर कोरगावकर यांना २०१९ च्या निवडणुकीत आमदारकीची संधी मिळाली आणि ती त्यांनी गाजवली.

१०) रवींद्र वायकर –

उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक नाव म्हणजे जोगेश्वरी ईस्टचे आमदार रवींद्र वायकर. फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडलेले वायकर सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

१९९२ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून धडक मारलेली. त्यानंतर ४ वेळा नगरसेवक, एकदा स्थायी समितीची अध्यक्षपद भुषवल्यानंतर २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

विशेष म्हणजे, डिसेंबर २०२१ मध्ये ईडीनं वायकर यांची तब्बल ८ तास चौकशीही केली होती. तरीही ते उद्धव ठाकरेंसोबतच आहेत.

११) संजय पोतनीस –

कलिनाचे आमदार असलेल्या संजय पोतनीस यांची ही दुसरी टर्म. दोन्ही वेळेस पोतनीस हे थोड्या मतफरकानं निवडून आले. २००७ मध्ये नगरसेवक झाल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी बेस्टचे चेअरमन म्हणून काम पाहिलं. त्यानंतर २०१४ आणि २०१९ ला ते आमदार म्हणून निवडून आले.

१२) प्रकाश फातर्पेकर –

२०१४ पर्यंत शिवसेनेला चेंबूरमध्ये विजय मिळवण्यात अपयश आलं होतं. मात्र २०१४ च्या निवडणुकांमध्ये प्रकाश फातर्पेकर यांनी दोन वेळचे  माजी आमदार आणि मुंबई काँग्रेसमध्ये वजन असणाऱ्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हांडोरे यांना पाणी पाजलं. 

हांडोरे यांच्यासारखा तगडा उमेदवार मित्रपक्षात असूनही फातर्पेकर यांनी शिवसेनेतच थांबण्याचा निर्णय घेतला आहे हे विशेष.

१३) भास्कर जाधव – 

उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रं आल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारं पहिलं मोठं नाव होतं, ते म्हणजे भास्कर जाधव. शिवसेनाप्रमुखांना भेटायला मातोश्रीवर भेटायला आलेल्या जाधवांची भेट लवकर झाली नाही आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोफ डागत त्यांनी सेना सोडली. 

१९८४ पासून शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या भास्कर जाधवांनी सेना सोडणं हा त्याकाळी मोठा धक्का मानला जात होता. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर २००९ मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर गुहागरमधून निवडून गेले. त्यांना राज्यमंत्रीपद, राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद आणि रत्नागिरीचं पालकमंत्री पदही मिळालं. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्याच तिकिटावर निवडणूक जिंकली.

२०१९ च्या निवडणुकीत त्यांनी हातात शिवबंधन बांधलं आणि आमदारकीची हॅटट्रिक पूर्ण केली. ज्यावेळी भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती, अगदी तशीच परिस्थिती असताना ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत, हे नक्कीच लक्षात घेण्यासारखं आहे.

१४) राजन साळवी – 

सलग तीन वेळा राजापूरमधून निवडून आलेले राजन साळवी, उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात. कोकणातून निवडून आलेले जे मोजके आमदार उद्धव यांच्यासोबत आहेत, त्यात साळवी यांचं नाव येतं.

१५) वैभव नाईक –

शिवसेनेचे जायंट किलर म्हणून वैभव नाईक ओळखले जातात. याचं कारण म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी शिवसेना नेते नारायण राणे यांचा तब्बल १० हजार मतांनी धक्कादायक पराभव केला होता. २००९ मध्ये कुडाळ मतदारसंघात राणेंनी नाईक यांचा २४ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र २०१४ ला नाईक यांनी दणक्यात कमबॅक केलं.

‘बाकीचे आमदार मंत्रिपदाच्या लालसेपोटी बंडखोर गटात गेले आहेत. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा रोवण्यासाठी कार्यकर्ते नव्हते, मात्र त्याच राणेंना गाडण्याचं काम कोकणातल्या जनतेनं केलं. शिवसेना कधीही संपणार नाही,’

असं वक्तव्य करत त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं सांगितलं आहे.

१६) ऋतुजा रमेश लटके –

अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर २०२२ मध्ये या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या.

सध्याच्या घडीला पाहायला गेलं, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेतले १६ आमदार आहेत. या आमदारांच्या आणि शिवसैनिकांच्या जोरावर त्यांना शिवसेना पुन्हा उभी करण्याचा विश्वास आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या जनतेला एक गोष्ट मात्र समजली आहे, ती म्हणजे…

राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं..!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.