म्हणून एकनाथ शिंदेंना गटाला “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” हे नाव देणं अवघड जाईल..

आत्ताची लेटेस्ट बातमी म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं. आज ४ वाजता ते याबाबत घोषणा करणार आहेत.

या गटाला नाव काय देण्यात आलं आहे तर,

“शिवसेना बाळासाहेब ठाकरे”

शिवसेना बाळासाहेब ठाकरे अस नव्या गटाचं नाव असणार आहे अशी बातमी आहे मात्र ती सूत्रांच्या हवाल्यानुसार. प्रत्यक्षात या बातमीची पडताळणी अजून झालेली नाही. तरिही समजा एकनाथ शिंदे गटाने शिवसेना – बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलच तर मात्र नैतिक व कायदेशीर अशा दोन्ही बाजूंनी एकनाथ शिंदेना बाळासाहेबांच नाव वापरणं अवघड जाणार आहे..

नैतिकता का आडवी येवू शकते, तर बाळासाहेब हयात असताना त्यांनी राज ठाकरेंना देखील आपलं नाव आणि फोटो वापरून नये म्हणून सांगितलं होतं. तशी सुचनाच बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती.

तर पहिला किस्सा असा आहे की,

आपलय राजकीय प्रवासाची सुरुवात राज यांनी अर्थातच शिवसेनेपासून केली. भारतीय विद्यार्थी सेनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली, पुढं शिवसेनेच्या वाटचालीतही राज यांचा करिष्मा चालला. मात्र कालांतरानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली दरी वाढत गेली.

महाबळेश्वरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. या आणि इतर वादांची परिणीती अखेर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यात झाली.

२७ नोव्हेंबर २००५ ला राज यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. मार्च २००६ मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. मात्र या कालावधीत आणि नंतरही राजसमर्थक विरुद्ध शिवसैनिक असे अनेक राडे महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत पाहायला मिळाले.

मनसे स्थापन व्हायच्या आधी अनेकदा राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी लावलेल्या फ्लेक्स किंवा बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असायचा. खाली मजकूर काहीही असला तर भगवी शाल घेतलेला किंवा चष्मा घातलेला बाळासाहेबांचा फोटो हमखास असायचा.

२३ जानेवारी २००६ ला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये बाळासाहेबांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. नारायण राणे आणि राज ठाकरे या सेनेच्या बंडखोरांबाबत बाळासाहेब काय बोलतात, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं.

त्यात त्याच दिवशी सकाळी राज ठाकरेंनी बाळासाहेबांची भेट घेतली होती.

त्यावेळी मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन उपस्थित होते. बाळासाहेबांनी भाषणाला सुरुवात करताना, ‘नेहमी माझ्या आजूबाजूला राज आणि उद्धव असायचे, आज प्रमोद महाजन आहेत’ असा टोला हाणला.

त्यानंतर ते म्हणाले,

‘राज या विषयावर मी फार बोलणार नाही, मी दिलेल्या पदांचा त्यानं त्याग केला, शिवसेना सोडली, त्याला काय हवं ते करु द्या, त्याला त्याचा पक्ष स्थापन करू द्या, आमच्यावर काय तोफ डागायची डागू द्या. त्याची तोफ धडाडल्यानंतर आम्ही आमचा तोफखाना बाहेर काढू.’

मग बाळासाहेबांनी मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्सचा विषय काढला. ते म्हणाले, 

‘बॅनर राजसमर्थकाचा आणि त्यावर फोटो मात्र आपला. या प्रकारामुळं शिवसैनिक वितळतो, त्याच्या मनात गैरसमज निर्माण होतो. त्यामुळं माझं एकच सांगणं आहे, की बॅनरवर तुझा फोटो छाप, इतर कुणाचाही छाप, पण माझा फोटो छापलेला चालणार नाही.’

एवढं बोलून बाळासाहेब थांबले नाहीत, त्यांनी राज यांना टोमणाही मारला. बाळासाहेब म्हणाले,

‘एवढंच जर माझ्यामुळं अडत असेल, तर परत ये, लाजू नको.’

यानंतर राज समर्थकांनी बाळासाहेबांचा फोटो आपल्या बॅनरवर छापणं थांबवलं.

मात्र या वादावर पूर्णविराम काही लागला नाही,

२०२० मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या झेंड्याचा रंग बदलला आणि हिंदुत्वाचा मुद्दा अजेंड्यावर घेतला. तेव्हा काही मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मिडीया पोस्टमध्ये राज ठाकरेंसोबतच बाळासाहेबांचा फोटोही वापरला होता. यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. तेव्हा मनसे नेत्यांनी याबाबत माहिती घेतली जाईल अशी प्रतिक्रिया दिली होती.

त्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांनी राज यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा केल्यामुळं शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची ठिणगी पडली होती.

आत्ता दूसरा कायदेशीर मुद्दा म्हणजे बाळासाहेब ठाकरे अस नाव वापरण्याचा अधिकार एकनाथ शिंदे गटाकडे आहे का..

तर याबाबत विधीमंडळ गट आणि पक्ष याबाबतचे राजकारण आपल्याला दोन दिवसांपासून कानावर येतच आहे. विधीमंडळात पक्ष फुटला तरी पक्षाची एक घटना आहे एक चौकट आहे. त्यामुळे सहजासहजी बाळासाहेबांच नाव एकनाथ शिंदेना वापरता येणार नाही.

अन् त्याहूनही महत्वाच म्हणजे उद्धव ठाकरे हे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र नसून ते त्यांचे कायदेशीर वारसदार आहेत. अशा वेळी आपल्या वडिलांच्या नावाचा, फोटोचा वापर कुठे करावा व कुठे नको, कोणी करावा व कोणी नाही याचे अधिकार त्यांच्याकडेच येतात. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबाचं नाव वापरण्याच्या कृतीला ते विरोध करू शकतात. व कायदेशीररित्या ती लढाई जिंकू देखील शकतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.