नवाजुद्दीन तर आता म्हणतोय, पण बॉलिवूड नेहमीच काळा-गोरा भेद करत आलंय

नुकतंच बॉलिवूड अभिनेता नावाजूद्द्दीन सिद्दीकी याने असं विधान केलंय ज्याने बॉलिवूडचा अजून एक चेहरा समोर आलाय. हा चेहरा म्हणजे ‘वर्णभेद’. नवाजूद्द्दीन सिद्दीकीला एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडच्या नेपोटिझमबद्दल विचारलं गेलं. तेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये नेपोटझम चालतंच मात्र सोबतच रेसिझम देखील बरंच चालतं, असं म्हटलंय. 

मला एक काळी अभिनेत्री सांगा जी सुपरस्टार आहे? असं म्हणत नावाजूद्द्दीनने आवाज उठवला आहे.

तसं तर वर्णभेद हा मुद्दा बॉलिवूडसाठी काही नवीन असा नाहीये. राहून राहून वरती येणारा असा हा मुद्दा आहे. एक गोष्ट जेव्हा वर्षानुवर्षे तशीच पुढे येत असेल तर याचा अर्थ खूपदा त्याबद्दल बोललं गेलं असताना तो मुद्दा काही संपलेला नाहीये हे दिसतं. म्हणून या वर्णभेदाबद्दल परत एकदा जाणून घेणं गरजेचं आहे. त्याची पार्श्वभूमी बघताना ज्यांना ज्यांना या संकटाला सामोरं जावं लागलंय, त्यांनी या मुद्याला कशी लढत दिली, हे समजून घेणं आवश्यक ठरतं.

बॉलिवूडमध्ये चालणारा हा भेद काही अलीकडचा नाहीये. या भेदाची पाळेमुळे १९०० च्या शतकातही आढळतात. ‘स्मिता पाटील’ तर माहीतच असेल. आपल्या नॅच्युरल आणि सहाजिक अंदाजाच्या अभिनयासाठी त्यांना आजही ओळखलं जातं. मात्र त्यांनाही बॉलिवूडमध्ये रंगभेदाचा त्रास सहन करावा लागला असल्याचं दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सांगितलं होतं.

एक किस्सा सांगतो…

१९८० मध्ये दिल्ली फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्मिताचा ‘चक्र’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार होता. त्या बहीण अनिता आणि मैत्रिण पूनम ढिल्लों यांच्यासोबत फेस्टिव्हलला गेल्या, पण तिघीही त्यांचा डेलिगेट बॅज आणायला विसरल्या होत्या. स्मिता आणि पूनम यांनी अभिनेत्री असल्याचं सिक्युरिटीला सांगितल्यावर पूनमला आत जाऊ दिलं, पण स्मिता यांना थांबवण्यात आलं. स्मिता फिल्मस्टारसारखी दिसत नसल्याचं सुरक्षा रक्षकांनी सांगितलं होतं. 

मात्र स्मिता त्यांच्या लूकबद्दल कधीही स्वतःला कमी समजत नव्हत्या. किंवा त्याबद्दल त्या कुणाचंही ऐकून घेत नव्हत्या. त्यांनी स्वतःच्या कामाने सिद्ध करून दाखवलं होतं की अभिनयाला रंग-रूपाच्या मर्यादा नसतात. तरीही अनेकदा त्यांना चित्रपट घेताना त्यांच्या रंगाचा विचार केलाच जात होता, असंही महेश भट्ट यांनी सांगितलं होतं.

WhatsApp Image 2022 03 27 at 7.50.09 PM

कोल्हापुरात जन्मलेल्या मराठमोळ्या ‘उषा जाधव’ या अभिनेत्रीही तिच्या सुरुवातीच्या काळात याच गोष्टीला सामोरं जावं लागलं होतं. वीरप्पन, भूतनाथ रिटर्न्स, ढग अशा अनेक हिंदी, मराठी आणि तामिळ चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीला देखील “आम्हाला गोरी आणि सुंदर नायिका हवी” असं म्हणत आल्या पाऊली परत पाठवून दिलं जायचं. त्यांचा अभिनय बघण्यापूर्वी रूपाच्या आधारावर त्यांना जज केलं जायचं.  

WhatsApp Image 2022 03 27 at 7.55.36 PM

नव्वदच्या दशकातील अभिनेत्री जसं की ‘बिपाशा बसू’ आणि ‘शिल्पा शेट्टी’ यांना देखील रेसिझमच्या टीकांना सामोरं जावं लागलेलं आहे. एक आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तर एक वाढत्या वयातील तारुण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री. मात्र त्यांना त्यांच्याच को-अभिनेत्रींनी नावं ठेवल्याचं माध्यमांमध्ये दिसतंय. बिपाशा बसूला एकदा करीन कपूरने ‘काळी मांजर’ म्हणत उल्लेखलं होतं. 

यामध्ये येते ती अभिनेत्री जिने अशा सगळ्या ठिकाण सडेतोड उत्तर देत ‘डार्क इज ब्युटीफुल’ मोहिमेचं समर्थन केलंय. ती म्हणजे ‘नंदिता दास’. पॅरलल सिनेमातील एक सर्वात प्रसिद्ध नाव. नंदिता बॉलिवूडमध्ये यशस्वी कारकीर्द होऊ शकली असती, परंतु बॉलिवूडच्या या चेहऱ्याची चांगली ओळख असल्याने ही अभिनेत्री जाणीवपूर्वक दूर राहिली. मात्र लढा देणं थांबवलेलं नाहीये.

“आपण नेहमी असं म्हणत असतो की तिचा रंग क्लीन आहे. जणूकाही काळा रंग म्हणजे घाण गोष्ट आहे. आणि हाच माइण्डसेट बॉलिवूडच्या गाण्यांच्या माध्यमातूनही दिसतो”, अशी टिका नंदिताने केलीये.

WhatsApp Image 2022 03 27 at 7.58.56 PM

अभिनेत्री तर अभिनेत्री मात्र अनेक दिग्गज आणि आज लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या नायकांना देखील या गोष्टीचा सामना करावा लागलाय.

साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेकांना वेड लावणाऱ्या आणि बॉलिवूडच्या चित्रपटातून बनारसच्या गल्ल्यांतील कुंदन सगळ्यांच्या मनामनात पोहोचवणारा अभिनेता ‘धनुष’ देखील यापासून दूर राहू शकलेला नाही. जेव्हा त्याला रांझना चित्रपट करायचा होता तेव्हा “बॉलिवूडमध्ये तुझा रंग चालणार नाही” असं म्हटलं गेलं होतं.

इतकंच काय ‘मनोज बाजपेयी’ देखील त्यांच्या रंगावरून खिल्ली उडल्या वाचून राहिलेले नाहीत. २००१ मध्ये आलेला त्यांचा चित्रपट ‘झुबेदा’ हा चित्रपट समीक्षकांना देखील खूप आवडला होता. चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळूनही ते बाजपेयींवरवर वर्णद्वेषापर्यंतच्या टिप्पण्या करण्यात आल्या होत्या. 

WhatsApp Image 2022 03 27 at 8.04.12 PM

 

आता ज्या अभिनेत्यापासून हा विषय सुरु झालाय तो देखील वर्णभेदापासून काही अलिप्त नाहीये. स्वतः नवाजुद्दीन सिद्दीकी देखील या विचारसरणीचा शिकार झालेला आहे. म्हणून त्यांनी याबद्दल इतक्या प्रकर्षाने आवाज उठवला आहे. आज आपल्या अभिनयाने कोणत्याही एका विशिष्ट शैलीच्या मर्यादा ओलांडणाऱ्या नवाजुद्दीनला सुरुवातीला त्याच्या रंग आणि चेहऱ्याच्या संरचनेमुळे ग्रामीण भागातल्या भूमिकां दिल्या जायच्या.

पण इंडस्ट्रीत त्याला फक्त हाच फटका बसला नाही. काही वर्षांपूर्वी त्यांना ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या वर्णद्वेषी टीकेचा फटका सहन करावा लागला होता.

“नवाजुद्दीन एक सरासरी अभिनेता आहे जो रोमान्स करण्यास असमर्थ आहे”, असं ऋषी कपूर म्हणाले होते.

तर कास्टिंग डायरेस्टर संजय चौहान यांनी नवाजुद्दीनबद्दल म्हटलं होतं की, “आम्ही चांगले दिसणारे लोक नवाजुद्दीन सोबत कामाला ठेवू शकत नाही कारण ते फार विचित्र दिसतं.”

मोठमोठया अभिनेत्यांना देखील जेव्हा अशा रंगाच्या टीकांना तोंड द्यावं लागतं तेव्हा एक दूषित मानसिकता दिसते.

भारतीय लोकांच्या विचारसरणीत काळ्या गोऱ्याचा भेद शिरला तो ब्रिटिशांपासून. मात्र आजही तो बॉलिवूडसारख्या एका ‘सोफेस्टीकेटेड कल्चर’ असलेल्या इंडस्ट्रीमध्ये दिसणं खरंच विचारात टाकणारं आहे. जर स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या आणि सामान्य जनता ज्यांचं अनुकरण करते त्या इंडस्ट्रीत या गोष्टी आजही हयात आहेत तर “आपण कुठे जातोय?” याच उत्तर शोधन गरजेचं ठरतं.

हे ही वाच भिडू :

   

Leave A Reply

Your email address will not be published.