१९९६ ला दहावी पासआऊट झालेली पोरं wtsapp वर एकत्र आली आणि बिझनेस उभा राहिला. 

ते सर्वजण १९९६ ला दहावी पासआऊट झाले. आज २०१९. बावीस वर्ष झाली. या मधल्या काळात शिकली. आई वडिलांच्या स्वप्नाप्रमाणे स्वत:च्या क्षेत्रात काहीतरी करुन दाखवलं. लग्न झाली. पोरं झाली. आत्ता मुलं शाळेत जावू लागली. पुण्यासारख्या शहरात स्वत:चे फ्लॅट झाले. रोज फिरायला चारचाकी आली. सगळं कस चांगल चालू होतं. मग एकदिवस wtsapp आलं, वर्गमित्रांचा ग्रुप निघाला.

ग्रुपच नाव होतं,

“व्हर्चूअल कट्टा”

हडपसरच साधना विद्यालय. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचे संस्कार होणारी हि शाळा. या ग्रुपवर असणाऱ्या २०-२२ जणांनी आपआपल्या क्षेत्रात नाव कमावलेलं होतं. त्यातले हे पाचजण,

हि त्या पाचजणांची गोष्ट.

पहिल्या मुलाचं नाव अनिकेत गायकवाड. अनिकेत गायकवाड यांच्या वडिलांचा फुलांचा व्यवसाय होता. फ्लॉवर डेकोरेशनच काम ते करायचे. अनिकेत गायकवाड शहराची गरज ओळखून रियल इस्टेटच्या धंद्यात पडले. रियल इस्टेट म्हणल्यानंतर नाके मुरडणारी लोक असताना अनिकेत गायकवाड या माणसाने फक्त प्रामाणिकपणा स्वत:सोबत जपला. पुरेस भांडवल नसताना याच एका गोष्टींच्या जोरावर त्यांनी चांगल नाव कमवलं. आपल्या बिझनेसमध्ये ते सेट झाले.

दूसऱ्या मुलाचं नाव अजय ढाणे. अजय ढाणे यांचे वडिल कामगार. शिक्षण हेच पुढं घेवून जावू शकत ओळखून ते MCS झाले. आयटी फर्ममध्ये चांगल्या हुद्यावर गेले. पुढे जॉब सोडून स्वत:ची आयटी कंपनी काढली. आपल्या बिझनेसमध्ये ते देखील सेट झाले.

तिसऱ्या मुलाचं नाव सुमित बनकर. त्याचे वडिल PMT मध्ये कामाला. त्याने फायनान्स मध्ये MBA केलं. शेअर मार्केट आणि इन्वेस्टरच्या भूमिकेत तो गेला. पुढे एज्युकेशन फिल्डमध्ये नाव कमावलं. तो देखील सेट झाला.

चौथ्याचं नाव प्रदिप कामथे. आज हडपसरमध्ये नावाजलेले CA म्हणून प्रदिप कामथे यांच नाव घेतलं जातं. त्यांचे वडिल देखील कामगार. शिकून CA होवून स्वत:च्या आयुष्यात ते चांगलेच सेट झाले. चांगल नाव कमवलं.

राहिला तो पाचवा मित्र. त्याच नाव संदिप गार्डे. संदिप गार्डे व्यवसायात शिरले. अॅग्रीकल्चर रिलेडेट वस्तूंच्या विक्रीतून स्वत: डिस्ट्र्यूब्यूटर झाले. पुढे टायरचे देखील चांगली दुकानें उभा राहिली. ते देखील सेट झाले.

आपआपल्या आयुष्यात सर्वजणच सुखानं जगू लागलेली. नाव कमावून, घर कुटूंब सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतं प्रतिष्ठेच आयुष्य सुरू झालं होतं. आयुष्यभर केलेल्या कष्टांच फळ आत्ता कुठे मिळू लागलं होतं.

या वयात आपण काय करु शकतो तर आपण जुन्या आठवणी म्हणून एक wtsapp ग्रुप काढतो. एकमेकांची चेष्टा करत वेळ मारून नेतो. ते देखील असच करत होते. याचा अर्थ असा नाही की हे एकमेकांना भेटतच नव्हते. सातववाडीत असणारा हक्काचा कट्टा या मित्रांना नेहमीच जवळचा वाटायचा.

एकदिवस ग्रुपवर विषय निघाला तो आईस्क्रिमचा.

लहान असताना पॉटचं आईस्क्रिम मिळायचं. पॉटच आइस्क्रिम म्हणजे बाहेरून एअर प्रेशर न देता केलेलं हॅन्डमेड आईस्क्रिम. जून्या आठवणी सुरू झाल्या. आत्ताच्या आईस्क्रिमचा सर्वात मोठ्ठा तोटा होता तो म्हणजे एक लिटरचं आइस्क्रिम घेतलं आणि ते वितळल तर ते अर्धा लिटरचं भरतं. निम्या आइस्क्रिमध्ये निम्मी हवा असते. साहजिक पूर्वीच्या काळी जे आईस्क्रिम लागायचं ती चव आत्ताच्या आईस्क्रिमला नसायची.

विषय वाढत गेला आणि तो थांबला, तो आपणच सुरू करूया का? या मुद्यावर.

आपणच सुरू करुया !!!

बोलायला खूप छोटं वाक्य होतं. ग्रुपवरच्या सर्वच जणांनी या गोष्टीला पाठिंबा दिला. ग्रुपवरचे पाच जण पुढे आले आणि बाकींच्यानी त्यांच्यासोबत शक्य ते प्रयत्न करायचे ठरवले. दूसऱ्याच दिवशी या पाच जणांनी हडपसरच्या सातववाडीचा कट्टा गाठला. लहानपणापासून हा कट्टा प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार. ठरलं आपण पॉट आईस्क्रिमचा बिझनेस सुरू करायचा हे ठरलं.

पाचही जण वेगवेगळ्या क्षेत्रातले. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी वाटून घेतली. भारतात कोण कोण पॉट आईस्क्रिमचा व्यवसाय करत इथपासून ते रोज रात्री वेळ काढून पुण्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यात जावून आईस्क्रिम खाण्यापर्यन्त हा प्रकार सुरू झाला. इतका की या पाच जणांनी पुढचं वर्षभर घरी जेवायचं देखील सोडून दिले होतं. रोज रात्री नव्या आईस्क्रिमचा ब्रॅण्ड शोधायचा आणि प्रत्येक प्रकारचं आईस्क्रिम खावून बघायचं.

फक्त पुण्यापुरता हा शोध राहिला असता तर मान्य करण्यासारखं होतं पण दिल्लीपासून ते केरळ पर्यन्त वेगळ काय मिळतं आणि लोकल काय मिळतं. पटलं तर धंदा कसा चालतो आणि माणसं किती लागतात. प्रत्येकाच्या बाजूने वेगवेगळ्या चर्चा आणि वेगवेगळी मतं हे पाचजण शोधत होते.

अखेर ठरलं. पॉट आईस्क्रिमचाच बिझनेस सुरू करु शकतो. वर्षाभराचं कष्ट म्हणजे हडपसरच्या डि.पी.रोडवर आईस्क्रिमच पहिलं दूकान सुरू झालं त्याचं नाव,

“सावळाहरी”

विठ्ठलाच्या नावाने सुरू केलेल्या या व्यवसायाचं उद्धाटन या पाचही जणांनी आपल्या आईंच्या हस्ते केलं. म्हाताऱ्या आयांना कौतुक वाटलं की वयाच्या चाळीशीत पोहचलेल्या पोरांनी पुन्हा एक बिझनेस सुरू केलाय.

1564751888050 XX1A9514

पण सावळाहरी हा काही एका दिवसात उभा राहिलेला ब्रॅण्ड नाही तर त्यासाठी या पाच जणांनी शाळेपासून एकमेकांवर टाकलेला विश्वास कारणीभूत होता. वर्ष दिड वर्षे आईस्क्रिम सारख्या विषयाचा अभ्यास केला. प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर मनासारखं आईस्क्रिम तयार होत नाही तोपर्यन्त ते आईस्क्रिम विकायचे नाही असा निर्णय घेण्यात आला होता. कारण हा उद्योगच “पहिल्यासारखं मिळत नाही” या वाक्यामुळे सुरू झाला होता. मनासारखं होण्यासाठी या पाच जणांनी स्ट्रॉबेरी महाबळेश्वरवरुन, पेरू आणि अंजीर सासवड वरुन, आंबा रत्नागिरीतूनच, अननस कर्नाटकातून घेण्यास प्राधान्य दिले. जिथलं खरं तिथलच घ्यायचं असं सर्वाच मत.

या खरेपणामुळेच पुण्यात सावळाहरीच्या एका वर्षात ९ शाखा सुरू झाल्या.

या ९ शाखांमधून सुमारे १०० लोकांना रोजगार मिळाला आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, बारामती, सातारा अशा आसपासच्या शहरात हा ब्रॅण्ड विस्तारण्यासाठी सज्ज झाला. इतकच नाही तर अजमेरच्या एका गिऱ्हाईकाने सावळाहरी चा ब्रॅण्ड राजस्थानात घेवून जाण्याची देखील तयारी केली.

एका वर्षाच्या आत “सावळाहरी” हा आईस्क्रिमधला सर्वात विश्वासू ब्रॅण्ड बनला तो या पाच जणांच्या एकमेकांच्यावर असणाऱ्या विश्वासामुळेच.

आपला देखील ग्रुप असेल. सेट झालो म्हणून आपण पण कधीकधी नोकरी आणि शनिवार रविवार सुट्टीचा विचार करत शांतपणे रहात असू. हे पाच जण देखील आपआपल्या धंद्यात निवांत राहू शकले असते पण त्यांनी “ठरवलं” आणि एक उत्तम बिझनेस उभा राहिला.

आमचं ठरलय हे वाक्य कधीकधी राजकारणात नाही तर दोस्ती आणि दुनियादारीत देखील महत्वाच ठरु शकत हेच खरं.

हे हि वाच भिडू. 

6 Comments
  1. Chetan says

    खूपच छान अन प्रेरणादायी, यातले अजय सर आमच्या प्रोजेक्ट मध्ये मॅनेजर होते, अतिशय उत्साही व्यक्ती, आज खूपच आनंद झाला हे वाचून..

  2. Madhavrao Bhoite says

    I read your history of Savla Hari pot ice cream.Its really amazing.
    I appreciate your hard work and dedication.wish you all the best for the future success.

  3. Prashant Patil says

    Happy to read and inspired from this. All five friend are really Great.

  4. Yogesh Borkar says

    खूप छान आणि प्रेरणादायी पण तितकाच खडतर प्रवास असेल हा. चांगल्या कामात देव सुद्धा साथ देतो. मेहनतीची जोड हवी. सावळा हरी बरोबर काम करायला आवडेल.

  5. Gaurav Wargat says

    Excellent job sir…… keep it up….

  6. Yashshree yogesh apte says

    Want to work with u at sangli

Leave A Reply

Your email address will not be published.