या दोन बहिणी कॉटनच्या साड्या विकून १६ हजार घरं चालवतायेत

परवा घरी हळदी कुंकू होतं. उखाळया पाखाळ्या करायला आणि पक्वान्न खायला लय बायका आलेल्या. त्यात म्हात्रे काकूंची नुकतंच लग्न झालेली सून पण होती. पहिलंच वर्ष होतं त्यामुळे उत्साहात वाटली.. जरा मॉडर्नही वाटली. तिने नेसलेली साडी पण भारी होती. फार डिजायनर नव्हती पण एकदम क्लासी..

तिला जाऊन विचारलं तर म्हणाली ऑनलाइन घेतलीये, सुता ब्रॅंडची आहे.

पुढे ती असंही म्हणाली की, “अशा साड्या मी हल्ली रोज नेसते, कम्फर्टेबल आणि क्लासी वाटतात” तिचं हे बोलणं ऐकून मला जरा आश्चर्यच वाटलं.. साड्या आणि रोज? मग सर्च करून पाहिलं तर, आपण ‘ब्रॅंडेड आहे’ असं म्हणत मिरवावा असाच हा ब्रॅंड होता.

अजून जरा माहिती घेतल्यावर कळलं, की हा ब्रॅंड दोन बहीणींनी उभा केलाय.

आणि म्हात्रे काकूंच्या सूनेसारख्या अशा अनेक मुली आणि महिला आहेत ज्या ह्या ब्रॅंडच्या साड्या खरंच रोज नेसतात.

सुजाता आणि तानिया बिसवास ह्या दोघींनी मिळून ‘सुता’ ब्रॅंड उभा केला. ब्रॅंडच्या नावाची त्यांचा कन्सेप्टही अनोखा होता. सुजाता नावातला ‘सू’ आणि तानिया नावातला ‘ता’ घेऊन ‘सुता’ (SuTa) हा शब्द तयार होतो. शिवाय ‘सुता’ या शब्दाचा अर्थ होतो धागा ज्याला इंग्लिशमध्ये आपण थ्रेड असं म्हणतो.

 त्यामुळे त्यांच्या ब्रॅंडचं नाव हे त्यांच्या प्रॉडक्टशी डायरेक्ट कनेक्ट होणारं होतं. पण गंमत म्हणजे ह्या दोघींचाही साड्यांशी, फक्त त्या नेसण्यापुरता संबंध होता. हा आता साड्या म्हणजे बायकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो खरा, पण आर्ट, कल्चर आणि फॅशनची सांगड घालून एखादा पारंपारिक म्हणजेच साड्यांचा बिसनेस थाटावा असं त्यांच्या डोक्यातही नव्हतं आणि ते तितकंसं सोप्पंही नव्हतं. 

बरं, ह्या दोघी आधी काय करत होत्या तर, इंजिनियरिंग.

आता हल्ली आजू बाजूला आपल्याला असे बरेच कार्यकर्ते सापडतात जे इंजिनियरिंग अर्धवट सोडून भलतंच काहीतरी करत असतात. त्यातल्या कोणाला इंजिनियरिंग जमतच नसतं, कोणाला करमतच नसतं, कोणाला इंजिनियरिंग करण्यात किक वाटत नसते तर कोणाला दुसरंच काहीतरी अचानक क्लिक होतं. ह्या शेवटच्या, काहीतरी ‘क्लिक’ होण्याच्या कॅटेगरीतच ह्या दोन बहिणी मोडतात. शिवाय ह्या दोघींनी कॉरपोरेट क्षेत्रातही काही वर्ष काम केलं होतं.

१ एप्रिल २०१६ साली सुजाता आणि तानिया या दोघींनीही आपल्या कॉर्पोरेट विश्वाला राम राम ठोकत सुता उभं केलं आणि त्याला वाढवण्याचा निश्चय केला.

सुजाता आणि तानिया ह्या दोघींचं बालपण भुवनेश्वर, ओडीशामध्ये गेलं. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते. ह्या नोकरीमुळे त्यांचं अख्ख कुटुंब देशाच्या वेग वेगळ्या भागात राहिलं. आणि म्हणूनच दोघींनी देशाच्या अनेक भागातली संस्कृती, माणसं सगळं काही जवळून अनुभवलं होतं, साहजिकच वेगवेगळी ठिकाणं, तिकडचं राहणीमान, प्रत्येक ठिकाणचं वे ऑफ लिविंग हे सगळं एक्सप्लोर करण्याची त्यांना आवडही लागली.

शिवाय त्यांना भारतातल्या वेग वेगळ्या प्रकारच्या साड्या नेसायलाही फार आवडायच्या. ह्याच आवडीचं रूपांतर मग बिझनेसच्या एका कन्सेप्टमध्ये झालं. आपाआपल्या नोकऱ्या सोडल्यानंतगर त्या बरंच हिंडल्या. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की हल्ली बायका ओकेजनली किंवा काही सणवार असतील तरच साड्या नेसणं प्रेफर करतात.

पूर्वी जशा सहज नेसल्या जायच्या तशा हल्ली साड्या नेसल्या जात नाहीत. आणि ह्याच विचारधारेला बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

सुता ब्रॅंडच्या साड्या महिलांनी सहज म्हणून नेसल्या पाहिजेत आणि त्यासाठी सुताची प्रत्येक साडी नेसायला कन्वीनियंट वाटणं, ती कम्फर्टेबल असणं आणि तितकीच ती क्लासी दिसणं. ह्यावर त्यांनी फोकस केला आणि पुढे हाच त्यांचा यूएसपी ठरला.

सुताची पहिली साडी ही एकाच रंगाची आणि मलमलची होती. पण आता सुताने, हँडलूम, कॉटन, शुद्ध मलबेरी सिल्क, लिनन अशा अनेक प्रकारच्या साड्यांचा आपल्या कलेक्शनमध्ये समावेश केलाय.  शिवाय साड्यांवरच्या नक्षीकामासाठी हँड बाटिक किंवा  ब्लॉक-प्रिंटिंग सारख्या वेग वेगळ्या टेकनिक्सचा वापरही केला जातो. त्यांनी पहिल्यापासूनच कधीच त्यांच्या क्वालिटीवर दुर्लक्ष केलं नाही. आणि साड्यांमधला साधेपणाही सोडला नाही.

त्यांचा टार्गेट ऑडियन्स तिशी ओलांडलेल्या महिलांसोबतच १८ ते २५ वयातल्या तरुणी सुद्धा आहेत. आणि फक्त महिलाच नाही तर आता त्यांनी पुरुषांसाठी सुद्धा काही विशिष्ठ प्रकारचे कुर्ते लॉंच केलेत. शिवाय साड्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडे ब्लाउज, होम डेकॉर, हँडबॅग, ज्वेलरी यांचंही कलेक्शन आधीपासून होतं, त्यामुळे प्रत्येक ट्रेंड फॉलो करणं, शिवाय जुनं आणि नवीन ह्यातला बॅलेन्स साधून ब्रॅंडला पुढे नेणं हे त्यांच्या यशाचं गणित आहे.

सुताचं अजून एक भारी वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं तगडं सोशल मीडिया. सोशल मिडियावर प्रत्येक साडी बाबतीत ते एक भारी स्टोरी लिहितात, साडी बनवण्यामागची प्रोसेस लिहितात ज्यामुळे साडी विकत घेण्याची ग्राहकांमधली ओढ अजूनच वाढते.

आज सुताची जवळ जवळ १५० जणांची मोठी टीम आहे. सोबतच १६००० विणकार आणि कारागीर त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात. हे कारागीर देशाच्या विविध भागातले आहेत.  

कामाच्या प्रोसेस बद्दल सांगताना सुजाता एका मुलाखतीत सांगते, की आमची टीम पहिल्यांदा विणकरांना भेटते, विणकार आपल्या आधी केलेल्या कामाचे नमुने दाखवतात, त्याप्रमाणे त्यांना सिलेक्ट करून छोटसं ट्रेनिंग दिलं जातं, मग त्यांना ऑन बोर्ड घेतलं जातं अणि नंतरचं सगळं काम किंवा कम्युनिकेशन हे ईमेल किंवा व्हाट्सअपच्या माध्यमातून होतं.

तानिया सांगते, की प्रत्येकासाठी पैसा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, त्यामुळे कारागिरांचा आणि कामगारांचा पगार वेळच्या वेळी देणं आम्ही सगळ्यात जास्त महत्वाचं समजतो. शिवाय गरजेला कामगारांच्या कुटुंबांचीही जबाबदारी उचलायला आम्ही मागे पुढे पहात नाही.

भविष्यात जास्तीत जास्त विणकारांना ब्रॅंड सोबत जोडून घेणं हे ‘सुता’चं ध्येय आहे.

शाळेत एक्स्ट्रा कारीक्यूलर अॅक्टिविटी म्हणून विणकाम शिकवलं जायचं, पण त्याच्याच जोरावर आज ह्या दोन बहिणी ५० कोटींचा टर्नओव्हर असणारा बिजनेस करताएत आणि १६००० घरं चालवतायत हे कौतुकास्पद आणि प्रेरणादायक आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.