५० पैशाच्या पेप्सीचं मार्केट ओळखलं आणि “स्कीपी आईस पॉप्स” कोटींचा ब्रॅण्ड झाला..
नकोत्या वेळी, नको तिथे झोप आणि खाज यायला लागली, टीव्हीवर अचानक, ‘आया मौसम थंडे थंडे डर्मीकूल का’, असल्या जाहिराती वाजायला लागल्या किंवा दुपारच्या वेळी लोकांच्या हातात चहा ऐवजी कोल्डड्रिंक्स दिसायला लागली, की उन्हाळा ऑफिशियली आला असं म्हणायचं असतंय.
पण आपला शाळेतला उन्हाळा पेप्सी हातात आली की यायचा. आता पेप्सी म्हणजे काय असलं काय विचारू नका. तुम्ही शाळेत गेलात की नाही अशी शंका येईल.
मधल्या सुट्टीत 2 रुपयाचा पेप्सीकोला घ्यायचा, रेंगाळत, चुपत बसायचा आणि तासाला वर्गात परत जाताना कोणाची जीभ जास्त रंगलीये ते बघायचं. काय दिवस होते ते राव…
ही पेप्सी हल्ली कुठे मिळत नाही पण हे सगळे दिवस परत आठवले ते शार्क टॅंक इंडियाचा एक एपिसोड बघताना. फक्त ह्या वेळी आपल्या पेप्सीला हे लोकं, स्कीप्पी आइस पॉप्स असं काहीतरी म्हणत होते.
ऑस्ट्रेलियात राहणारं एक जोडपं, नाव रवि काबरा आणि अनुजा काबरा.
फार कमी वेळा असं घडतं पण परदेशात पॉश लाईफ जगत असूनही त्यांना भारताची आठवण यायला लागली, आपल्या मायदेशी परतायची इच्छा व्हायला लागली. त्यांनी पुन्हा भारतात येण्याचा निर्णयही घेतला. पण हे जोडपं भारतात नुसतंच परतलं नाही तर एक भन्नाट बिझनेस आयडिया घेऊन परतलं.
झालं असं की ऑस्ट्रेलियात रहात असताना रवी काबरा यांची बहीण त्यांच्याकडे राहायला गेली होती. पुन्हा भारतात यायच्या वेळी त्यांच्या बहिणीने तिकडे आपल्या पेप्सी कोला सारखे मिळणारे पॉप्सिकल्स बॅगेत भरून भारतात आणण्याची सोय केली. रवी काबरा यांना आश्चर्य वाटलं आणि लक्षात आलं की अशा पद्धतीचं काही, हल्ली भारतात मिळतच नाही.
लागलीच त्यांनी रीसर्च केला, पुरेशी माहिती मिळवली आणि आपल्या बालपणीच्या एका आठवणीलाच ब्रॅंड बनवायचं ठरवलं.
नाव ठरवलं स्कीपी आइस पॉप्स.
रिसर्च केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की पालकांना आपल्या मुलांसाठी एका विश्वासू ब्रॅंडची गरज आहे, पॉप्सिकल्स सारखं प्रॉडक्ट जितकं चविष्ट असणं अपेक्षित आहे तितकंच ते शरीराला हानी पोहोचवणारं असू नये अशीही ग्राहकांची अपेक्षा होती. मग रवी आणि अनुजा काबरा यांनी पुरेशा रिसर्चनंतर Kabra Global Products Pvt. Ltd अन्डर स्कीपी आइस पॉप्सची स्थापना केली.
हे प्रॉडक्ट जितकं मस्त आणि मजेदार दिसतं तितकच ते आरोग्याला पोषकही आहे. ह्या प्रॉडक्टमध्ये कुठल्याही ॲडेड रंगांचा वापर केला जात नाही शिवाय कोणतेही आर्टिफिश्यल फ्लेवर्स आणि प्रीझर्वेटिव्ह्स सुद्धा वापरले जात नाहीत.
यात कोला, ऑरेंज, रासबेरी, मॅंगो ट्विस्ट, लेमन आणि बबल गम असे एकूण सहा फ्लेवर्स मिळतात. रवी काबरा कंपनीच्या सेल्सचं सगळं पाहतात तर अनुजा काबरा प्रॉडक्शन डिपार्टमेंट सांभाळतात.
या आइसपॉप्सची अजून एक लय भारी गोष्ट म्हणजे हे पॉप्सिकल्स रूम टेम्परेचरलाच विकले जातात. त्यामुळे दुकानदारांना कोल्ड स्टोरेजची व्यवस्था लावण्याचीही काही गरज पडत नाही. आपण हे आइस पॉप्स विकत घेतल्यानंतर 8 तास फ्रीझर मध्ये ठेऊन नंतर त्यांचा आस्वाद घेऊ शकतो.
आता सुरू केलं नी आलबेल झालं असं कुठल्या बिझनेसमध्ये होत नसतंय. बिझनेस म्हटलं की फायदे तोटे आलेच.
रवी आणि अनुजा काबरा यांचं हे स्टार्टअप हळू हळू मार्केटमध्ये आपलं स्थान निश्चित करत होतं तोच कोविड आणि लॉकडाउनमुळे त्यांना 11 लाखांचं नुकसान पचवावं लागलं, घरी बसावं लागलं. पण त्यातूनही बाहेर पडत त्यांनी पुन्हा जोमाने सुरवात केली आणि डायरेक्ट शार्क टॅंक इंडियाच्या सीझन मध्येच एन्ट्री मारली.
शार्क टॅंक मध्ये जाऊन आपल्या इज्जतीचा कचरा करून घेणारे लय होते पण रवी आणि अनुजा काबरा यांच्या स्कीपी आइस पॉप्सनी तर बाजी मारली आणि इतिहास रचला. रवी आणि अनुजाने सगळ्या शार्क्स कडून 1 करोड रुपयांचं डिल मिळवलं आणि ऑल शार्क्स डिल मिळवणारे ते पहिलेच होते.
थोडक्यात काय तर रवी आणि अनुजा काबरा यांचे स्कीपी आइस पॉप्स चवीला लय भारी असणार हे आम्ही न खाताच सांगू शकतोय. आणि हे आइस पॉप्स म्हणजे शाळेतल्या प्रत्येक पोरासाठी आणि बालपणीच्या आठवणीत रमणाऱ्या प्रत्येकासाठी आहेत हे नक्की.
हे ही वाच भिडू
- पेप्सी कोलाला भारतात एन्ट्री साठी जनता सरकारने एक अट घातली होती
- कॉम्प्युटरमध्ये बाप गेम्स असूनही आपली दुनिया MS Paint च्या चौकटीतच अडकली होती
- दोघांमधलं प्रॉमिस टिकण्यामागचं कारण युनिनॉर चं सिमकार्ड होतं