पुण्यात ८ हजाराची नोकरी होती ती सोडली, गावात आलो. आज २ कोटींचा टर्नओव्हर आहे.

“पुण्यात नोकरी करतो” या शब्दाला खूप चांगल मार्केट आहे. मुलगा काय करतो तर पुण्यात जॉबला आहे. पुण्यात मुलाला महिना आठ ते दहा हजार मिळत असतात. त्यात तो मुलगा कॉटबेसीसवर रहायला तीन हजार घालवतो. महिन्याच्या मेसला तीन हजार घालवतो. कंपनीतून घरी येण्याजाण्यात हजार दोन हजार जातात. बाकीचा खर्च उधारीवरच भागवावा लागतो. तरिही पुण्यात जॉबला आहे हा आपल्याकडे प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला जातो.

या चक्रातून सुटून काहीजण वेगळं काहीतरी करतात. तर काहीजण याच चक्रात अडकून स्वत:ला संपवतात. 

कधीकाळी पुण्यात महिना आठ हजार कमावणारा नंतर अक्कल येवून गावी आलेला. स्वत:च भांडवल स्वत: उभा करणारा एक तरुण. अजित पवार हे त्याच नाव. सांगली जिल्ह्यातल्या ऐतवडे खुर्द या गावचा. 

अगदी काही वर्षांपुर्वी जो आठ हजार कमवायचा तो आज लाखोंचा पगार वाटतो.

त्यांची ही गोष्ट त्याच्याच भाषेत. 

माझं नाव अजित पवार. शिक्षण पुर्ण करून मी सगळे जातात तस पुण्याला गेलो. महिना आठ हजाराची नोकरी मिळाली. महिन्याचा खर्च भागवत कसेतरी दिवस काढू लागलो. पोरगं कामाला लागलं की घरात चार पैसे येतील अस घरातल्यांना वाटत होतं पण इथं मलाच घरातून पैसे मागायची वेळ येत होती. आठ हजारात जेवणखाणं देखील भागू शकत नव्हतं. 

अशा वेळी जॉब सोडायचा विचार मनात यायचा. पण पुणे सोडून गावाला गेलं की लोकं मयताला आल्यासारखे भेटायला येतात. हा कायतरी पाप करून आला. याला जमलं नाही. हा पळपूटा निघाला म्हणून नजरा असतात. तरिपण धाडस केलं आणि पुण्यातला जॉब सोडला. कर्नाटकातल रोड बनवणारी एक कंपनी होती त्या कंपनीत १२ हजारावर काम करू लागलो. त्या कंपनीनंतर दूसऱ्या कंपनीत जॉब सुरू केला. 

डोक्यात वेगळं काहीतर करावं अस यायचं पण मार्ग सापडत नव्हता.

मी जिथं कामाला होतो त्या कंपनीनं घोडावत कॉलेजच होस्टेल बांधायच काम हातात घेतलेलं. घोडावत कॉलेजच्या होस्टेल बांधकामासाठी गेल्यावर तिथ शौचालयाचा मॉडेल पाहिलं आणि तिथच आयडिया आली. 

कमी किमतीत टिकावू शौचालयाच हे मॉडेल ग्रामीण भागात खपण्यासारखं होतं. आपणही या व्यवसायात उतरू शकतो हा विचार आला. मग शौचालयाची जी काही माहिती मिळते ती गोळा करत गेलो. 

शौचालय कसे बनवतात. त्याला भांडवल किती लागणार. मार्केट कुठं आहे. किती पैसे मिळू शकतील असा सगळा अंदाज बांधल्यानंतर या व्यवसायात पडायचं ठरवलं. पण पहिला विरोध झाला तो घरातूनच. 

वडिल शेतकरी असल्यामुळे ते म्हणले,

आत्ता गावची संडास आपण बांधायची का? थोडी तरी लाज बाळग. एवढं शिकलास ते काय संडास बांधायला का? 

झालं. शौचालय बांधायचं म्हणजे हलक्या प्रतीचं काम वाटत होतं. वडिलांच्या जागी वडिल बरोबरच होते विरोध तर कुठल्यापण व्यवसायाला होणारच म्हणून सहन केलं. घरातल्या विरोधामुळ घरातनं भांडवल मिळण्याची शक्यता कमी होती. 

त्याच वेळी महाराष्ट्रात मराठा क्रांन्ती मोर्चा निघत होता. सांगली सातारा कोल्हापूर भागात लाखोंच्या गर्दीत मोर्चे निघणार होते. मी ठरवलं मोर्चामध्ये टोप्या विकायच्या. सांगली कोल्हापूरच्या मोर्चात टोप्या विकल्या. मित्रमंडळीकडून पैसे घेतले आणि हातात नाममात्र का होईना गुंतवता येतील ऐवढे पैसे गोळा झाले. 

बऱ्यापैकी भांडवल गोळा झाल्यानंतर प्रश्न होता तो जागेचा.

मित्राने दोन गुंठे जागा दिली आणि तिथेच शौचालय बांधणीचा व्यवसाय उभा करायचं ठरलं. सुरवातील दोन कामगार घेतले. शौचालयांच मार्केटिंग करायचं का बांधायचे असा प्रश्न होता. दोन्हीपैकी एकीकडं वेळ द्यायला लागणार होता. मी मी रात्रभर शौचालय बांधणीच काम करायचो आणि दिवसा मार्केटिंग करत फिरायचो. त्याच वेळी स्वच्छ भारत अभियान देखील जोरात सुरू होतो. गावात शौचालय असावं म्हणून जागरूकता होत होती. रोज मार्केटिंगमधून शौचालयाची जाहिरात करायची. घरात काय खुळ लागलं म्हणून शिव्या खायच्या आणि रात्री बांधणीच काम करत रहायचं. हाच दिनक्रम नेटाने चालू ठेवला. 

हळुहळु गावागावात जाहिरात होवू लागली. एकतर १२ हजारात संपुर्ण शौचालय फिटिंग होवून मिळायचं. कमी किंमतीत टिकावू काम होत असलेलं पाहून लोक इंटरेस्ट घेवू लागले काम मिळू लागलं. एकामागून एक ऑर्डरी येवू लागल्या. 

दोन वर्षाहून अधिक काळ झाला. आज कामासाठी एक ट्रक घेतलाय. घरात चारचाकी घेतली. दोन वर्षात २ कोटींचा टर्नओव्हर झाला. ७०० पेक्षा जास्त शौचालय जोडले गेलेत. एकेकाळी मी पुण्यात आठ हजारावर काम करत होतो आज महिना लाखभर पगार गावात असून वाटतो. कधीकधी वाटतं नोकरी करत असतो तर आज महिन्याला १५ हजारापेक्षा जास्त कमावता आलं नसतं. पण धाडस केलं, बाहेर पडलो. 

लोकांना वाटतं गावात राहिलं की मोठ्ठ होतं नाही. पडेल ते काम केलं आणि चिकाटी दाखवली तर पुणे काय आणि गाव काय सारखच असत. आज सांगली जिल्ह्यातल्या माझ्या ऐतवडे खुर्द गावात माझी कृषीरत्न शौचालय नावाची कंपनी आहे हे मी अभिमानाने सांगू शकतोय. 

माझा पत्ता. 

अजित पवार 

कृषीरत्न शौचालय

पिन नं 415401

ऐतवडे खुर्द ता. वाळवा जि. सांगली.

शब्दांकन : संतोष कनमुसे.

हे ही वाच भिडू

2 Comments
  1. Vaibhav Salalkar says

    Number milel ka tumcha?

Leave A Reply

Your email address will not be published.