थेटरात केवळ एक प्रेक्षक होता तरी सुलोचनाबाईंनी गायला सुरवात केली अन्…

गोरापान चेहरा, उंची मध्यम, डोक्यावर पदर, तोंडात पान असावं असा भास निर्माण करणारे लालबुंद ओठ, कपाळावर भलं मोठं कुंकू आणि आवाज.. त्या केवळ बोलत असल्या तरीही ऐकत राहावसं वाटायचं. आणि जेव्हा त्या गायच्या तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लावणीचा फड उभा रहायचा. असं सदाबहार व्यक्तिमत्व होतं सुलोचना चव्हाण यांचं.

सर्व वयोगटातील रसिक प्रेक्षकांच्या मनात सुलोचना चव्हाण यांनी लावणीविषयी प्रेम रुजवले. त्यांच्या आवाजाची जादू किती विलक्षण आहे याचा अनुभव आजही येतो आणि कायम येत राहील.

‘सोळावं वरीस धोक्याचं’ हे सुलोचना चव्हाण यांनी सुंदरपणे आपल्यापर्यंत पोहोचवलं.

इतकंच काय बालपणी ‘कोल्हा आणि आंबट द्राक्षं’ ही गोष्ट एकवेळ लक्षात नसेल. पण ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा’ हे गाणं हमखास लक्षात असायचं. खूपदा लावणीमध्ये शृंगार असतो. गीतकाराने शृंगार मांडणारे शब्द लिहिले असतात. अशावेळी अतिशयोक्ती होणार नाही, पण लावणीतला शृंगार सुलोचना चव्हाण या स्वतःच्या आवाजाने ज्या पद्धतीने पोहोचवायच्या त्याला तोड नव्हती.

त्यामुळे एखादी लावणी आणि त्यातले शब्द भिडण्याचं कारण म्हणजे सुलोचना चव्हाण यांचा आवाज. सुलोचना चव्हाण यांच्या आयुष्यात घडलेला हा विलक्षण किस्सा..

तो दिवस होता रामनवमीचा. नगर येथील श्रीरामपूर येथे रामनवमी निमित्त मोठी यात्रा भरली होती. एखादी मोठी यात्रा असली की तमाशा कलावंतांसाठी तो सुगीचा काळ असतो. त्यामुळे श्रीरामपूर येथे सुद्धा यात्रेनिमित्त तमाशाचे फड लागले होते. तमाशा पाहण्यासाठी प्रत्येक फडामध्ये लोकांची तुडुंब गर्दी होती. फडाबाहेर असणारे लाऊडस्पिकर ढोलकी, घुंगरू यांच्या आवाजाने निनादत होते. तमासगीर कलावंत संपूर्ण उत्साहात लावणी पेश करत होते. त्यांच्या अदांना उपस्थित प्रेक्षक टाळ्या, शिट्या वाजवून दाद देत होते.

सगळ्या फडांमध्ये असं आगळं वेगळं वातावरण होतं. पण एका फडात मात्र शुकशुकाट होता.

हा मेळा होता सुलोचना चव्हाण यांचा. सुलोचनाबाई पती आणि इतर वाद्यवृंद घेऊन जत्रेतल्या ओपन थेटर मध्ये आल्या होत्या. परंतु इतक्या मोठ्या कार्यक्रमाला फक्त एकच श्रोता तिकीट काढून बसला होता. बाकी सगळं थेटर रिकामं होतं.

रात्रीचे नऊ वाजले होते. इतर फडांमध्ये गर्दी असल्याने आपला कार्यक्रम बघायला कोणी येणार नाही, असा सुलोचनाबाई आणि त्यांच्या पतीने अंदाज लावला. शेवटी निर्णय झाला की.. एका माणसासाठी कार्यक्रम न करता त्या माणसाचे पैसे परत द्यायचे. परंतु त्या माणसाने सांगितलं,

“मी तुमचं गाणं ऐकायला आलो आहे, माझी विनंती‌ आहे की, कार्यक्रम रद्द करू नका. मी पैसे परत घेणार नाही.

प्रेक्षक दर्दी होता. त्यामुळे त्याचं मन मोडणं शक्य नव्हतं. अखेर सुलोचनाबाईंनी कार्यक्रम करायचा ठरवला. त्यांचा विलक्षण आवाज आसमंतात घुमला.

बाहेर कितीही गर्दी असली तरी या गर्दीला छेद देत संपूर्ण यात्रेत सुलोचनाबाईंच्या बहारदार आवाजाची जादू पसरली. समोर केवळ एकच प्रेक्षक असलेलं ते ओपन थेटर अर्ध्या तासात खचाखच भरून गेलं. इतकंच नव्हे, तर इतर फडातले कलावंत सुलोचनाबाईंना ऐकायला आले.

“बाई आम्ही आमचा फड बंद करून फक्त तुमचं गाणं ऐकायला आलोय. तुम्हाला डोळ्यासमोर गाताना बघायचंय. बाई तुम्ही गायलेली गाणी आमचं पोट भरतात. तुमच्या गाण्यांमुळेच आमच्या फडाला प्रेक्षक येतात.”

अशी भावना त्या तमाशा कलावंतांनी व्यक्त केली. त्या वेळी सुलोचनाबाई नक्कीच निःशब्द झाल्या असतील.

असं म्हणतात, तानसेनाने मेघमल्हार राग गायला आणि पाऊस बरसला. पण इथे तर सुलोचनाबाई यांच्या आवाजाने रिकामं प्रेक्षागृह हाऊसफुल झालं…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.