जग गाजवणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनवर लग्नात भांडी घासायची वेळ आली आहे!

वर्ल्ड चॅम्पियन असं म्हंटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल? 

सायना, सचिन सारखी एखादी व्यक्ती , पिळदार शरीर, अंगात भारी भारी ब्रँड घातलेली, पायात इंपोर्टेड शूज घालणारी व्यक्ती. थोडक्यात थोडीफार बडेजावकी मिरवणारी व्यक्ती..

पण लोकांचं उष्ट खरकटं काढणारी वर्ल्ड चॅम्पियन डोळ्यासमोर आली तर… होय !

सुनीता देवी अशीच एक वर्ल्ड चॅम्पियन आहे. जीची स्टोरी २- ३ दिवसांपासून व्हायरल होत आहे.

हरियाणाची सुनिता सध्या लोकांची उष्टी खरकटी काढण्याचं काम करते आहे. खरकटी भांडी धुण्याचं, जेवण बनवण्याचं काम करतेय. थोडक्यात वर्ल्ड चॅम्पियन असणारी सुनीता कामवाली बाई बनली आहे.

हीच सुनीता जिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पण आज दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न तिच्यासमोर आहे. काही दिवसांपासून सुनीताची स्टोरी माध्यम आणि वृत्तवाहिन्यांवर चर्चेत आहे.

हरियाणाच्या रोहतकच्या सीसार खास गावच्या सुनीता देवीला, स्ट्रेंथ लिफ्टिंग मध्ये २० पेक्षा जास्त पदक जिंकली आहेत. पण आज तिला घरोघरी जाऊन काम करणं भाग आहे. दोन वेळेच्या भाकरीसाठीही तिला खूप संघर्ष करावा लागतोय. घरच्या दारिद्र्यामुळे सुनीताला बर्‍याच वेळा भाकरी आणि मिरची खाऊन जगावं लागतयं.

सुनीताचे आई वडील मजूर आहेत. जनसत्ता या वृत्तपत्राने पहिल्यांदा सुनीताची स्टोरी फ्लॅश केली. जनसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते की,

मेरे पिता मजदूर हैं और मां घरेलू सहायिका के तौर पर काम करती हैं. जब भी उन्हें स्थानीय कार्यक्रमों या समारोहों में खाना पकाने का काम मिलता है, तो मैं मां की भी मदद करती हूं. मैं घर का काम भी करती हूं और जीवन यापन के लिए दूसरों के घर जाकर उनके यहां बुजुर्गों की सेवा भी करती हूं.

आता यापेक्षा बेक्कार काय असू शकत का?

स्ट्रेंथ लिफ्टिर असलेली सुनिता स्वत:ला फिट ठेवण्यासाठी झाडाच्या फांद्या व विटा घेऊन सराव करते. म्हणजे तुम्ही ही तिची लोकल जिम म्हणू शकता. तर मिरची भाकरी हा तिचा डाएट आहे. आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीत ती, विश्वविजेती आहे.

सुनीताची आई जमुना देवी सांगतात की,

‘२०२० मध्ये वर्ल्ड स्ट्रेंथ लिफ्टिंग चँपियनशिपमध्ये बँकॉकला पाठविण्यासाठी सुनीताला एका खासगी सावकाराकडून १.५ लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. आम्ही तेच कर्ज फेडण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत.’

आणि बँकॉकला झालेल्या याच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुनीताने सुवर्ण पदक जिंकलं. त्याशिवाय छत्तीसगडमध्ये आयोजित नॅशनल स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०१९ मध्ये सुवर्ण पदक आणि पश्चिम बंगालमधील नॅशनल स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१ मध्ये रौप्यपदक देखील जिंकले आहेत.

स्थानिक आमदारांपासून ते केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सुनीताच्या कर्तृत्वाचे कौतुक केलय आणि मदतीचे आश्वासन दिलयं, पण आजपर्यंत तिला कोणतीही मदत मिळालेली नाही.

जेव्हा सुनीताची ही न्यूज फ्लॅश झाली तेव्हा तिच्या मदतीसाठी लोकांनी सोशल मीडियावर अपील केल. काही युजर्सनी त्यांच्या ट्विटमध्ये सोनू सूद आणि केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना टॅग करत मदतीचं आवाहन केलं.

सुनीताची ही अवस्था का झाली यासाठी एका खासगी वाहिनीने सुनीता आणि क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना आपल्या कार्यक्रमात समोरासमोर आणले. या कार्यक्रमात क्रीडामंत्र्यांनी आपल्याच अडचणी सांगितल्या. सुनीताला सल्ला देताना ते म्हंटले की,

जे खेळ ऑलिम्पिक किंवा एशियाडमध्ये खेळले जात नाहीत त्यांना केंद्र सरकार मदत करू शकत नाही, या खेळांसाठी राज्य सरकारच मदत करू शकते. त्यामुळे तू अशा खेळांवर फोकस कर जे ऑलिंपिक किंवा एशियाडमध्ये खेळले जातील. पण मी मदत करण्याचा प्रयत्न करेन, तुम्ही मला येऊन मला भेटा.

आता जरा विचार करा, जी वर्ल्ड चॅम्पियन आपलं दीड लाखांचं कर्ज फेडण्यासाठी घरकाम करते आहे, ती दिल्लीच्या वाऱ्या करायला कुठून पैसे आणणार? एखाद्या वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या खेळाडूपर्यंत राज्य अथवा केंद्र पोहचू शकत नाही का? आणि ज्या स्पर्धेत आपण वर्ल्ड चॅम्पियन बनलोय तो खेळ सोडून दुसरा खेळ खेळा असा सल्ला देणे त्या खेळाडूचा आत्मविश्वास मोडण्यासारखं नाही का?

बरं इथं सुनीता ही एकटीच अशी खेळाडू नाहीये. देशातील बऱ्याच खेळाडूंची स्थिती आधीच खराब होती, आणि त्यात कोरोनाने तर अजूनच खराब झाली आहे. असे खेळाडू चहा विकणे, समोसे तळणे, सुतारकाम करणे आणि वीटभट्ट्यांमध्ये काम करतायत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.