वयाच्या फक्त ३५ व्या वर्षी रिटायरमेंट घेतली, सुरेश रैनाचं नेमकं काय चुकलं ?
१५ ऑगस्ट २०२०, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनं एक इंस्टाग्राम पोस्ट टाकली आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेन्ट घेतली. सगळीकडे धोनीच्या रिटायरमेंटची चर्चा सुरू झाली. तेवढ्यात आणखी एक इंस्टाग्राम पोस्ट आली, ज्यात आणखी एका भारतीय खेळाडूनं रिटायरमेंट जाहीर केली होती..
दोस्तीखातर. हा खेळाडू होता सुरेश रैना.
मैदानावर कायम चर्चेत असणारी धोनी-रैनाची दोस्ती यावेळी पुन्हा एकदा जिंकली. या गोष्टीला आता दोन वर्ष होऊन गेली, दर १५ ऑगस्टला क्रिकेट फॅन्स धोनीबद्दल पोस्ट टाकतात, त्याच्यावर लेख लिहिले जातात. रैना मात्र फेसबुक मेमरीपुरताच लोकांच्या लक्षात राहतो.
सप्टेंबर महिन्यात रैनानं आपण क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅट्समधून रिटायर होत असल्याची घोषणा केली, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तो आयपीएलमधूनही रिटायर झाला. गेल्यावर्षीही रैना आयपीएलचा भाग नव्हता, त्यामुळे तो मैदानात न दिसण्याची थोडी सवयही झाली होती.
पण त्यानं रिटायरमेंट जाहीर करणं मात्र धक्का देणारं ठरलं.
उत्तरप्रदेशमध्ये आर्मी ऑफिसरच्या घरात जन्मलेल्या रैनाचं बालपण फार भारी नव्हतं. तो हॉस्टेलला राहत होता, तेव्हा तिथल्या पोरांच्या त्रासाला कंटाळून त्यानं शिक्षणच सोडून द्यायचं असं अनेकदा ठरवलं होतं. पण रैनानं लाऊन धरलं, अडचणी काय येत जात राहिल्या. एज ग्रुप क्रिकेट, भारताकडून अंडर-१९ वर्ल्डकप आणि त्यानंतर इंटरनॅशनल डेब्यूट, रैनानं अगदी टिपिकल प्रवास केला.
पण या सगळ्यात जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा तिचं सोनंही केलं. ओपनिंगला गंभीर, मिडल ऑर्डरमध्ये युवराज असे दोन लेफ्टी बॅट्समन असताना रैनाला संघातली जागा टिकवणं अवघड होतं. अशावेळी कुठल्याही प्लेअरकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे परफॉर्मन्स करणं.
या परफॉर्मन्सच्या बाबतीत मात्र रैनाचा नाद नव्हता. ४-५ नंबरला बॅटिंग करताना एकतर हाणामारी करायची, नाहीतर मग थांबून खेळायचं या दोन्ही गोष्टी त्याला परफेक्ट जमायच्या. त्यात त्याची पार्टटाइम बॉलिंग हा कॅप्टन आणि टीम दोघांसाठीही बोनस असायचा.
एखाद्या बॉलरचा दिवस खराब सुरु असेल, तर धोनी रैनाकडे बॉल द्यायचा.
रैना ओव्हर्सचा कोटा भरून काढायचाच पण विकेट्सही घ्यायचा. फक्त फिल्डिंगच्या जोरावर टीममध्ये येतील असे काही प्लेअर्स असतात. यात पहिलं नाव कायम जॉन्टी ऱ्होड्सचं येतं. कारण फिल्डिंगच्या बाबतीत जॉन्टी ऱ्होड्स म्हणजे एन्ड विषय. पण याच जॉन्टीचा आवडता फिल्डर कोण होता, तर सुरेश रैना. पॉईंट, स्लिप, कव्हर किंवा मिड ऑन मिड ऑफ, रैना कुठंही थांबला तरी तो एरिया सेफ होऊन जायचा.
टेस्ट क्रिकेटमध्ये रैनाला फार संधी मिळाली नाही, त्याचं कारण अर्थात त्याच्या डिफेन्समध्ये असलेले कच्चे दुवे हेच होतं. धोनी टेस्टमधून रिटायर झाल्यानंतर रैना फक्त एक टेस्ट मॅच खेळला आणि त्या मॅचच्या दोन्ही इनिंग्समध्ये शून्यावर आऊट झाला. वनडे मध्येही शॉर्ट बॉलसमोर येणारं अपयश त्याच्या करिअरसाठी धोकादायक ठरलं. तरीही रैना २२६ वनडे मॅचेस खेळला. कारण त्याच्याकडे मॅच फिरवण्याची ताकद होती, तो मोठ्या पार्टनरशिप तर सहज करायचा आणि तिन्ही डिपार्टमेन्टमध्ये आपलं शंभर टक्के योगदान द्यायचा.
टी २० क्रिकेट जेव्हा नुकतंच रुळत होतं, तेव्हा भारताकडे हार्ड हिटर नाहीत, आपल्याकडे सगळे टुकूटुकू खेळणारेत, धोनी, युवराज आणि सेहवाग काय काय करणार ? असे लई प्रश्न लोकांना पडले होते. पण रैनानं दाखवून दिलं होतं या फॉरमॅटमध्ये भारताचे पहिले सुपरस्टार आपण आहोत.
रैनाच्या बॅटिंगमध्ये नजाकत होती. एकतर गडी खेळायचा लेफ्टी, त्यामुळं बॅटिंग बघायला आणखी मजा यायची. विशेषतः त्याचा इन्साईड आऊट कव्हर ड्राईव्ह आणि फक्त टायमिंगच्या जोरावर मारलेला पंच. या दोन शॉटच्या जोरावरच रैनानं कित्येक रन्स केले असतील. याच टी२० क्रिकेटनं रैनाचं करिअर तारलं आणि त्याला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, आयपीएल.
आयपीएलनं रैनाला खऱ्या अर्थानं सुपरस्टार बनवलं.
चेन्नई सुपर किंग्सकडे पहिल्या सिझनला कुणी आयकॉन प्लेअर नव्हता. मात्र रैना आणि धोनीची जोडी जमून आली आणि कट्टर सीएसके फॅनबेस तयार झाला. घामामुळं अंगाला घट्ट चिटकलेली पिवळी जर्सी ही रैनाची ओळख बनली. सगळ्या चेन्नईचा चिन्ना थला म्हणून रैनाही फेमस झाला. इतर प्लेअर्स सेट व्हायला वेळ घेत असताना रैना थेट पहिल्या बॉलपासून तुटून पडायचा.
चेन्नईकडून सगळ्यात जास्त रन्स आजही त्याच्याच नावावर आहेत. रैनानं आयपीएल अशी गाजवली की त्याला आजही मिस्टर आयपीएल म्हणून ओळखलं जातं. हेडन आणि धोनी टीममध्ये असताना सुद्धा रैनाच्या हिटींगची चर्चा व्हायची, हे यश त्यानं कमावलं होतं. त्यात पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये २२७ रन्सचं टार्गेट चेस करताना त्यानं मारलेले २५ बॉल ८७ रन्स तर कुठलाच क्रिकेट चाहता विसरू शकत नसतोय.
रैनाला न विसरण्याचं आणखी एक कारण म्हणजे, रैना फिल्डिंगला कुठल्याही कोपऱ्यात उभा असला तरी विकेट मिळाल्यावर बॉलरला पहिली मिठी हाच मारायचा.
स्ट्राईकवरच्या बॅट्समनची फिफ्टी किंवा सेंच्युरी झाली, तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद याच्या चेहऱ्यावर असायचा. सेल्फलेस क्रिकेटर म्हणून पहिलं नाव कायम रैनाचंच येत राहील. पण इतकं टॅलेंट असूनही रैनाला त्याला न्याय देता आला नाही असं राहून राहून वाटतं.
कारण पुढं जाऊन त्याच्या शॉर्ट बॉलसमोरच्या विकनेसचा फायदा नवखे बॉलरही घ्यायला लागले. त्याच्या बॅटिंगमध्येही ती आधीची धार राहिली नाही, त्यात जेव्हा धोनी रैनाला शॉर्ट फाईन लेग किंवा शॉर्ट थर्ड मॅन अशा बॉल जास्त वेळा न येणाऱ्या पोझिशनवर उभा करायचा तेव्हा लई वाईट वाटायचं.
२०२२ च्या आयपीएल ऑक्शनआधी चेन्नईनं रैनाला रिटेन केलं नाही, लिलावात घेतील असं वाटलं, तर चेन्नई सोडा कुठल्याच टीमनं रैनावर बोली लावली नाही. मिस्टर आयपीएल आयपीएलमध्येच अनसोल्ड गेला. आता तो जगभरातल्या टी२० लिग्समध्ये खेळेल असं सांगितलं जातंय.
ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही रैना दिसला, तर आश्चर्य वाटू देऊ नका. पण आपल्या पिढीनं रैनाला स्टार होतानाही पाहिलं आणि त्याचा डाउनफॉलही. काल-परवाच भारत पाकिस्तान मॅचमध्ये मिडल ऑर्डर गंडली, तेव्हा स्क्रीनसमोरच्या गर्दीतून एक आवाज आला, ‘रैना पाहिजे होता यार..’ आपला युवराज सिंग एका जाहिरातीत म्हणाला होता, ‘जब तक बल्ला चलता है, थाट है. जब बल्ला नही चलेगा तो…’ रैनाचं करिअर पाहिलं की हेच वाक्य आठवतं. तुमची आवडती रैनाची इनिंग कोणती ? कमेंट करुन नक्की सांगा.
हे ही वाच भिडू :
- फक्त एक सुटलेला कॅच नाही, तर ही आहेत भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाची कारणं…
- सुरेश रैना ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेला आणि मैदानावरच्या मैत्रीची कहाणी अधुरी राहिली…