सुरेश रैना ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेला आणि मैदानावरच्या मैत्रीची कहाणी अधुरी राहिली…

१५ ऑगस्ट २०२०, स्वातंत्र्यदिनाची संध्याकाळ. लोक तसे निवांत होते, कुणी बाहेर गेलेलं, कुणी घरात मोबाईल बघत लोळत पडलेलं. तेवढ्यात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट आली… भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होण्याचा निर्णय एक इन्स्टाग्राम पोस्ट टाकून जाहीर केला होता. सगळ्या माध्यमांमध्ये धोनीच्या रिटायरमेंटची चर्चा सुरू झाली. तेवढ्यात आणखी एक पोस्ट आली… ज्यात आणखी एका भारतीय खेळाडूनं रिटायरमेंट जाहीर केली होती.. मैत्रीखातर.

तो खेळाडू म्हणजे सुरेश रैना.

क्रिकेटमधले जय-वीरू, भारताचे जयवर्धने आणि संगकारा अशी कित्येक टोपण नावं या जोडीला होती. एका सगळ्या पिढीसाठी माही-रैना ही जोडी, लव्हस्टोरीच्याही पलीकडे होती. रैना तसा बऱ्याचदा धोनीच्या सावलीत झाकोळला गेला… पण त्याच्या इतका सेल्फलेस क्रिकेटर जगात कुणीच नाही, हि गोष्ट क्रिकेट कळणारा कोणताही माणूस झटक्यात मान्य करेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर रैनाचा जलवा होता. तो असा काळ होता जेव्हा भारताच्या मिडल ऑर्डरचं टोपणनाव दहशत होतं… रैना, युवराज आणि धोनी ही तिकडी म्हणजे कहर होती. डाव्या हातानं खेळणाऱ्या फलंदाजांना बघण्यात एक लय भारी फिलिंग असते. त्यांची छोट्यातली छोटी चूकही चटकन लक्षात येते. कारण युवराज, गंभीर, हेडन, गिली आणि स्वतः गांगुलीनं ती सवय आपल्याला लावली होती. रैनाच्या बॅटिंगमध्ये ही नजाकत तर असायचीच, पण सोबतच चपळताही.

रैना आणि आयपीएल

रैनाचा खेळ टी२० क्रिकेटला साजेसा होता. साहजिकच या गड्यानं आयपीएल गाजवली. पहिल्याच सिझनला चेन्नई सुपर किंग्सनं त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आणि रैनानं आयपीएलची दुनिया बदलायला घेतली. जेव्हा केव्हा संघाला गरज असेल तेव्हा त्याच्या बॅटमधून रन अक्षरश: बरसायचे. धोनीचं नेतृत्व आणि रैनाची जिगर बघून चेन्नईच्या चाहत्यांनी या जोडीला डोक्यावर घेतलं. धोनीला नाव मिळालं थला… आणि रैनाला नाव मिळालं चिन्ना थला…

मिस्टर आयपीएल

सुरुवातीच्या काळात रैना ना कधी दुखापतीमुळं बाहेर राहिला, ना कधी त्याचा फॉर्म गंडला. घामानं अंगाला घट्ट बसलेली पिवळी जर्सी हि रैनाची ओळख बनली होती. बरं फक्त बॅटच बोलायची असं पण नाही, तो जिथं फिल्डिंगला उभा असेल तिथून रन चोरणं म्हणजे महाकठीण काम. एखादी जोडी मैदानावर खूप वेळ टिकली असेल, तर बॉलर रैना ती फोडायचं कामही करायचा. तिन्ही डायमेन्शनमध्ये सुपरहिट. कामगिरीतलं सातत्य आणि जबरदस्त खेळी यामुळं रैनाला नाव पडलं… मिस्टर आयपीएल.

२०१६ आणि २०१७ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमध्ये सहभागी नव्हती. तेव्हा रैनानं गुजरात लायन्सचं नेतृत्व केलं, तर धोनीनं पुण्याचं. गुजरात विरुद्ध पुणे मॅच असली, की लोकं हातातली कामं टाकून मॅच बघायची. नेहमी रैना आणि धोनी हसत हसत टॉसला यायचे आणि त्यांना असं पाहून लय खास वाटायचं.

रैनानं आयपीएलमध्ये आतापर्यंत २०५ मॅचेसमध्ये ५५२८ रन्स केले. चेन्नई सुपर किंग्सनं जेव्हा एकूण १६५ मॅचेस खेळल्या होत्या, तेव्हा त्यानं फक्त एक मॅच मिस केली होती. असा असतो फॉर्म, फिटनेस आणि फ्रेंडशिप.

२०२० मध्ये आला ट्विस्ट

युएईमध्ये झालेल्या आयपीएलवेळी रैना स्पर्धा सुरू होण्याआधीच भारतात आला. त्याचं आणि चेन्नईचं, विशेषत: धोनीचं फाटलं अशा चर्चा होऊ लागल्या. त्यातच त्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफ्ससाठी पात्र ठरली नाही. २०२१ च्या आयपीएलमध्ये रैना चेन्नईत होता, पण एक फिफ्टी सोडली तर बॅट फारशी बोललीच नाही. चेन्नई जिंकली पण फायनल मॅचमध्ये रैना टीममध्ये नव्हता. 

रैना एक वाक्य बोलला होता… ‘जर माही भाई पुढची आयपीएल खेळणार नसतील, तर मी सुद्धा खेळणार नाही.’ त्याचं आणि धोनीचं फाटलंय म्हणणारे शांत झाले.

जेव्हा २०२२ च्या मेगा ऑक्शन आधी चेन्नईनं रैनाला रिटेन केलं नाही, तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण असं वाटलं होतं की ऑक्शनमध्ये तरी चेन्नई सुपर किंग्स रैनाला टीममध्ये घेईल… पण तसं झालं नाही. रैनाचं नाव पुकारलं गेलं आणि कुठल्याच टीममधून बोली लागली नाही, रैना अनसोल्ड गेला. धोनी आणि रैना फेअरवेल मॅच एकत्र खेळतील.. हे पाहणं स्वप्नच राहिलं.

आपला युवराज एकदा म्हणला होता… ‘जब तक बल्ला चल रहा है, तब तक थाट है…’

मिस्टर आयपीएल आता आयपीएलमध्ये दिसणार नाही समजलं आणि युवराजच्या वाक्याची आठवण आली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.