तेजिंदर बग्गा यांच्यात असं काय आहे की, त्यांच्या अटकेने दिल्ली तापलीये ?

आज सकाळपासून ट्विटरवर ४-५ ठराविक हॅशटॅग्स ट्रेंडिंगवर आहेत. #iStandWithTajinderBagga, Punjab Police, Delhi Police, Kejriwal… बस्स. याच टॅग्सने इंडिया ट्रेंड्स भरलेलं आहे.

झालंय असं की…

भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अटक केलीये. भाजपचे आणखी एक नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून यासंबंधी माहिती दिली. ज्यात सांगितलंय की, बग्गा यांना अटक करण्यासाठी सुमारे ५० जवान आले होते. त्यांच्या अटकेनंच राजकीय वातावरण खूप तापलंय. 

म्हणून म्हटलं, नक्की घटना काय ते पाहावं आणि ज्यांच्या अटकेने हे होतंय ते ‘तेजिंदर पाल सिंह बग्गा’ आहेत कोण? हे जाणून घ्यावं. 

आधी अटकेचं कारण जाणून घेऊया…

तेजिंदर बग्गा यांना अटक होण्याचं कारण आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. 

बग्गा यांनी केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आहे. शिवाय धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता, असंही आरोपात म्हटलंय. आम आदमी पार्टीचे नेते सनी सिंह यांनी ही तक्रार केली होती. 

तेजिंदर बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर निशाणा साधला होता. बग्गा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचं वर्णन काश्मिरी पंडितविरोधी असं केलं होतं. रिपोर्ट्सनुसार, बग्गा यांनी केजरीवाल यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोपही केला होता. 

त्यानंतर ४ एप्रिल रोजी पंजाबच्या मोहालीमध्ये बग्गा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. 

तेजिंदर बग्गा यांच्यावर…

१५३-अ : धर्म, जात, स्थळ इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणं

५०५ : निवेदनं, अफवा किंवा अहवाल प्रकाशित करणं किंवा प्रसारित करणं

५०६ : गुन्हेगारी धमकी देणं

यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर पंजाब पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने बग्गा यांना दिल्लीतील राहत्या घरातून अटक केली आहे. बग्गा यांच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १२ गाडयांमधून ५० पोलीस दिल्लीत त्यांच्या घरी पोहोचले होते.

पोलिस आधी बोलायला म्हणून आत गेले. काही वेळ बग्गा यांच्याशी बोलल्यानंतर अचानक बाहेरून मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी घरात घुसले. आणि बळजबरीने बग्गा यांना सोबत नेलं. बग्गा यांचा मोबाइलही पोलिसांनी जप्त केला, जेणेकरून ते कोणाशीही संपर्क साधू शकणार नाहीत.

पुढची घटना जाणून घेण्याआधी हे बघणं गरजेचं आहे की, ज्या व्यक्तीच्या अटकेमुळे राजकारण तीव्र झालंय, त्या तेजिंदर बग्गा यांचा इतिहास काय आहे…

बग्गा यांनी खूप कमी वयात राजकारणात प्रवेश केला. अगदी वयाच्या १६ व्या वर्षी ते भाजप युवा मोर्चाशी संबंधित होते. याशिवाय ते ‘भगतसिंग क्रांती सेने’चे संस्थापक सदस्यही आहेत. वयाच्या २३ व्या वर्षी ते युवा मोर्चाचे सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य बनले. 

यानंतर २०१७ मध्ये त्यांना दिल्ली भाजपचे प्रवक्ते बनवण्यात आलं होतं. सर्वात कमी वयात म्हणजे ३१ वर्षी त्यांची नेमणूक झाली होती. २०२० मध्ये त्यांनी दिल्लीच्या हरी नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण ‘आप’च्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. सध्या बग्गा हे भाजपच्या युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव आहेत.

शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर दहावीनंतर त्यांनी शाळा सोडली होती. त्यानंतर त्यांनी इग्नू इथून बॅचलर्स प्रिपरेटरी प्रोग्रॅम केला. हा अभ्यासक्रम बारावी उत्तीर्ण नसलेल्यांसाठी असतो. बग्गा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात, तिथे त्यांचे ९ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

इतकंच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांना फॉलो करतात.

ट्विटरच्याच माध्यमातून त्यांनी आजवर अनेकांवर निशाणा साधला आहे, टीका केली आहे, आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत शिवाय धमक्याही दिल्या आहेत.

भाजपमध्ये मोठं पद मिळण्याआधी बग्गा अनेकदा चर्चेत राहिले आहेत. ते पहिल्यांदा चर्चेत आले जेव्हा त्यांनी ‘आप’चे माजी नेते प्रशांत भूषण यांना झापड मारली होती. २०११ ची ही घटना. नंतर अरुंधती रॉय यांच्या पुस्तक कार्यक्रमात गोंधळ घातला होता. मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस मुख्यालयाबाहेर चहा विकला होता तर दिल्लीच्या रस्त्यांवर भडकावू पोस्टर्स लावले होते. 

अशा सगळ्या कारणांनी बग्गा बातम्यांमध्ये राहिले आहेत.

इतकंच नाही तर बग्गा यांच्यावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचाही आरोप होता. ज्यानुसार छत्तीसगडमध्ये त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसंच, भाजपच्या बिगर क्रांतिकारी नेत्यांची अपमानास्पद टीका सहन केली जाणार नाही, असंही ट्विट त्यांनी केलेलं आहे. 

आता त्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकावल्याचा आरोपावरून अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीत पंजाब पोलिसांविरोधात अपहरणाचा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 

तर पंजाब पोलिसांच्या निवेदनात म्हटलं आहे की, आरोपीला म्हणजेच बग्गा यांना पाच वेळा नोटिसा पाठवून तपासात सामील होण्यास सांगण्यात आलं. मात्र बग्गा मुद्दाम आले नाहीत. तेव्हा पंजाब पोलिसांनी आज सकाळी बग्गा यांना ‘कायद्याचं पालन’ करत त्याच्या घरातून अटक केलीये.

शिवाय पंजाबमधील भगवंत मान सरकारला भाजप नेत्यांनी घेरलं आहे. हे खूप लज्जस्पद आहे की, केजरीवाल त्यांच्या पोलिटिकल पावरचा वापर पंजाबमध्ये चुकीच्या पद्धतीने करतायेत. केजरीवाल आणि भगवंत मान खऱ्या सरदाराला घाबरले आहेत. दिल्लीतील प्रत्येकजण बग्गा यांच्याकडून उभा आहे, असं बीजेपी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 

लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे… हे काही पहिल्यांदाच झालं नाहीये जेव्हा पंजाब पोलीस दिल्लीत कुणाच्या तरी घरी पोहोचले आहेत. 

याआधी ९ एप्रिलला दिल्लीतील बीजेपी प्रवक्ते नवीन कुमार जिंदल यांच्या घरी पोलीस पोहोचले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बनावट व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी त्यांना नोटीस दिली होती. 

त्यानंतर २० एप्रिलला पंजाब पोलीस आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांच्या गाझियाबाद इथल्या निवासस्थानी पोहोचले होते. तर कांग्रेस नेता अलका लांबा देखील पंजाब पोलिसांच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जातंय. 

कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर फुटीरतावादी शक्तींशी जवळीक असल्याचा आरोप केला होता. केजरीवाल यांनी खलिस्तान समर्थकांसोबत बैठक घेतली, असं कुमार यांनी म्हटलं होतं. अलका लांबा यांनीही कुमार यांचा दृष्टिकोन योग्य असल्याचं सांगत सोशल मीडियावर वक्तव्यं केली. याबाबत आप समर्थकांच्या तक्रारीनंतर दोघांनाही पंजाब पोलिसांनी नोटीस दिली होती.  

तर आता तेजिंदर बग्गा यांना केजरीवाल यांच्याविरुद्ध वक्तव्यानेच अटक झालीये, म्हणून दिल्लीतील राजकारण तापलं आहे. त्यांना आता दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सगळा घटनाक्रम आणि त्याच्याशी संबंधित इतर धागेदोरेही तुम्हाला सांगितले आहेत. तेव्हा तुम्हाला या प्रकरणात, पंजाब पोलीस आणि बीजेपीचे आरोप याच्याबद्दल काय वाटतं? तेजिंदर बग्गा यांच्या अटकेबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.