शरद पवारांवर हल्ला करणारा सध्या काय करतो ?

२०११ सालचा काळ.

डॉ.मनमोहन सिंग यांच्या सरकारवर एका मागोमाग एक घोटाळ्याचे भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. संपूर्ण देश अण्णा हजारेंच्या आंदोलनानी पेटून उठला होता. अरविंद केजरीवाल, किरण बेदी, बाबा रामदेव ही मंडळी यात सगळ्यात आघाडीवर होती.

भारताचं नवं स्वातंत्र्ययुद्ध आणि अण्णा हजारे त्याचे दुसरे गांधी असल्याचं चित्र मीडियाने उभा केलं होतं. अख्खी तरुणाई या आंदोलनात उतरली होती. सगळेच राजकारणी हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांना हटवल्याशिवाय देशाचं कल्याण होणार नाही असंच या सगळ्यांचं म्हणणं होतं.

२४ नोव्हेंबर २०११,

त्याकाळी सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले शरद पवार दिल्लीतील एनडीएमसी येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. तेव्हा तिथे हजर असणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देऊन निघत असताना अचानक त्यांच्यावर एका पगडीधारी शीख व्यक्तीने हल्ला केला आणि त्यांना चपराक लगावली. लगेच त्याला आसपासच्या लोकांनी पकडले.

सुदैवाने वयोवृद्ध शरद पवारांना काही झालं नाही. त्यांना सुरक्षितपणे घटनास्थळावरुन बाहेर नेण्यात आले. पण तो तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन जोरदार घोषणा देत होता. त्याला सुरक्षारक्षकांनी धरल्यावर त्याने स्वतःची नस देखील कापून घेण्याचा प्रयत्न केला.

अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. वाढती महागाई व भ्रष्टाचारामुळे कृषीमंत्र्यांवर हल्ला केला असल्याचं त्याने सांगितलं.

फक्त शरद पवार यांच्यावरच नाही तर एका आठवड्याभरापूर्वी दिल्लीतच कोर्टाच्या बाहेर टेलिकॉम घोटाळ्यामुळे कारावासात असलेल्या माजी मंत्री सुखराम यांच्यावर देखील त्याने हल्ला केला होता.

हा हल्ला खरोखर महागाई, भ्रष्टाचाराला वैतागून केला होता की यामागे काही मोठा प्लॅन आहे याची पोलिसांनी चौकशी केली पण तस काही आढळून नाही आलं.

या छत्तीस वर्षांच्या युवकच नाव होतं अरवींदर सिंग, त्याला हरविंदर सिंग म्हणूनही ओळखलं जात होतं.

दिल्लीच्या रोहिणी भागातील विजय विहार मध्ये आई आणि बहिणीसोबत राहणारा हा मध्यमवर्गीय पंजाबी तरुण. त्याचा ट्रान्सपोर्टचा बिजनेस होता. आसपासच्या लोकांच्या म्हणण्यानुसार तो तसा चांगला माणूस होता. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती.

रोज टीव्हीवर सुरु असलेले अण्णा हजारेंचं आंदोलनं यामुळे त्याच्या डोक्यात भ्रष्टाचार संपवण्यासाठी क्रांती टाईपच खुळ डोक्यात बसलं होतं. यातूनच त्याने सुखराम आणि शरद पवार यांच्यावर हल्ले केले होते. त्यांच्या गल्लीतल्या दुकानदाराने देखील सांगितलं की जेव्हा तो किराणा मालच सामान विकत घेण्यासाठी यायचा तेव्हा वाढलेल्या किंमती बघून सर्व नेत्यांना शिवीगाळ करायचा.

त्याच्या घरच्यांचं म्हणणं होतं की अरविंदर हा मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. त्याला काही वर्षांपासून वैद्यकीय उपचार चालू आहेत.

अटक झाल्या झाल्या अरविंदरने त्याच्या बहिणीला आपले मेडिकल सर्टिफिकेट्स तयार ठेवायला सांगितले. पुढे जेव्हा त्याला कोर्टात आणण्यात आलं तेव्हा त्याच्या वकिलाने हि सर्व कागदपत्रे दाखल केली. अरविंदर सिंगने कोर्टात हल्ला करण्यापूर्वी पाच मिनिटे मला झटका आला होता व त्याच आवेगात मी शरद पवारांना मारले असं सांगितलं.

पोलिसांनी कस्टडीची मागणी केली पण न्यायाधिशांनी ही केस एवढी गंभीर नसल्याचं सांगत त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावून जामीन दिला.

अरविंदर सिंगला बाय पोलार रोग असल्याची शक्यता असून याबद्दल त्याची मानसोपचार तज्ञांकडून चौकशी व्हावी असे कोर्टाने आदेश दिले.

देशभर खळबळ उडाली. महाराष्ट्रातून या निर्णयावर टीका झाली. हा हल्ला पवारांच्या राजकीय विरोधकांनी केला असून त्यांच्या जीविताला धोका असल्याचंही बोललं गेलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आग्रा हायवे आंदोलन करून बंद पाडला.

शरद पवारांनी मात्र मी ठीक आहे आणि हा प्रसंग विसरून देखील गेल्याच सांगितलं.

मात्र दिल्लीत वातावरण वेगळंच होतं.

भगतसिंग क्रांती सेनेचा नेता व पुढे जाऊन दिल्ली भाजपचा प्रवक्ता बनलेल्या तेजिंदरपाल सिंग बग्गा याने अरविंदरला आमचा पाठिंबा आहे असं जाहीर केलं. त्याला झालेल्या दंडाची रक्कम देखील आम्ही भरू अशी घोषणा त्यांनी केली.

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे शिरोमणी अण्णा हजारे यांना पत्रकारांनी यावर प्रश्न विचारला असता एक ही मारा ? असे उद्गार काढून आगीत तेल ओतून दिले. पवारांना मानणारे कार्यकर्ते नाराज होते. काही ठिकाणी अरविंदरसिंगला मारहाण झाल्याची देखील बातमी पसरली.

पण एकूणच अरविंदर सिंगच आयुष्य त्यानंतर बदलून गेलं होतं.

पोलीस चौकशी मागे लागली. डिप्रेशन व इतर मानसिक रोगाच्या गोळ्या चालूच होत्या. वरून  त्याने २०१२ साली जंतरमंतर येथे एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केली, त्याची देखील केस त्याच्यावर दाखल झाली. तो जेलमध्ये जरी नसला तरी रोहिणी येथील स्टेशनमध्ये जाऊन वर्दी देऊन यावी लागायची.

त्याच्यावर पवारांचा हल्लेखोर हा ठपका बसला ते कायमचा. त्याला कुठेही नोकरी व किंवा इतर काम मिळत नव्हते.

अरविंदर सिंग याने एका मुलाखतीमध्ये माझ्यावर वारंवार हल्ले होत असल्याचं देखील सांगितलं होतं. एकदा तर काही गुंडानी त्याला किडनॅप केलं व कर मधून अज्ञात स्थळी नेऊन मारहाण केली असा देखील आरोप त्याने केला.

सुरवातीला मीडियाने त्याला प्रसिद्धी दिली मात्र काही दिवसांनी नवीन विषय मिळाल्यावर अरविंदर सिंग मागे पडला.

दिल्ली पोलिसांनी देखील त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्षच केले. हाच मौका साधून अरविंदर सिंग गायब झाला. जेव्हा हे लक्षात आले तो पर्यंत उशीर झाला होता. पोलिसांची चक्रे फिरली, त्याच्या पंजाबमधील मुळ गावी, त्याच्या नातेवाईकांच्या घरी तपास झाला पण काही उपयोग झाला नाही. एक गाजलेला गुन्हेगार अचानक गायब होतो यावरून आपल्या सुरक्षा यंत्रणांची नाचक्की झाली. अनेक प्रयत्न करूनही अरविंदरसिंग सापडला नाही.

मार्च २०१४ साली कोर्टाने त्याला फरार घोषित केले. त्याच्या अचानक गायब होण्यावरही राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा करण्यात आली.

पुढची पाच वर्षे तो गायब होता. मध्यन्तरी सरकारे बदलली. पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. गेल्यावर्षी २०१९ नोव्हेंबर महिन्यात अचानक बातमी आली की पवारांवर हल्ला करणारा हरविंदर सिंग सापडला. हल्ल्याच्या घटनेनंतर आठ वर्षांनी दिल्ली मध्ये अरविंदर सिंगला अटक करण्यात आली. 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.